प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण १ लें.
इतिहासविषयक प्राचीन कल्पना.
जगाचा इतिहास लिहिण्यास सुरूवात करावयाची ती हिंदुस्थानच्या इतिहासाच्या अनुषंगानें करण्यास हरकत नाही. हिंदुस्थानचा इतिहास लिहावयाचा झाल्यास त्या इतिहासाशीं संलग्न असे अनेक इतिहास येतात. अत्यंत प्राचीन काळचीं राष्ट्रें म्हटली म्हणजे इजिप्त व असुर हीं होत. इजिप्तचा हिंदुस्थानाच्या इतिहासाशीं संबंध बराच अनिश्चित आहे. सेसोस्त्रियस नांवाच्या एका इजिप्तच्या सम्राटानें हिंदुस्थानावर स्वारी केली होती, अशी कांही वर्षांपूर्वी एक समजूत होती; पण ती कल्पना ज्या आधारावर रचली गेली त्या आधाराची विश्वसनीयता फारशी नसल्यामुळें ही समजूत निराधार आहे असें आज इतिहासज्ञ समजतात. असुर संस्कृतीचे ख्रिस्तपूर्व ६००० वर्षापूर्वीचे संस्थापक सुमेरू म्हणून लोक होते. ते भारतीय द्राविड वंशांतील असावेत असें हाल (H.R. Hall. The Ancient History of the Near East) नांवाचा ग्रंथकार म्हणतो. आम्हांस याविषयी आज हालचें मत सांगण्यापलीकडे कांहीं करतां येत नाहीं. द्राविड- सुमेरूकल्पना वगळतां दुसरा संबंध सेमीरामीसमार्फत लावतात, असूर्या देशांच्या सेमीरामीस राणीनें हिंदुस्थानावर स्वारी केली अशीहि एक समजूत होती. ती देखील त्यागिली गेली आहे. इराणचा बादशहा कुरूस (Cyrus) याच्या पदरीं पुष्कळ हिंदू फौजेंत होते, याबद्दल हिरोडोटसच्या वाक्याचा पुरावा आहे. इराणचा कुरूस- नंतरचा एक सम्राट् दर्युस याने हिंदुस्थानचा बराच भाग काबीज केला असावा असें दिसतें. इराणी लोकांनंतरचें महत्वास पावलेलें राष्ट्र ग्रीकांचें होय. त्यांचा हिंदुस्थानाशी संबंध पूर्वीपासून जरी असला तरी शिकंदराच्या स्वारीनें दृढ झाला असें दिसतें. रोमन पातशाहिचा हिंदुस्थानाशीं प्रत्यक्ष संबंध कमी आला तरी हिंदुस्थानांतील कांही राजांचे वकील रोमन दरबारीं होते. यावरून व्यापारी संबंध पूर्वापार असावा असें दिसतें. बुध्दापूर्वीच्या चीन देशाशीं असलेल्या संबंधाचें संशोधन अद्याप झालें नाही. लाउत्सेची “ता ओ” नांवाची विचारोपासनापद्धति उपनिषन्मूलक असावी असें म्हणतात. येणेंप्रमाणें अत्यंत प्राचीन राष्ट्रांच्या इतिहासाशीं हिंदुस्थानचा संबंध सांगतां येईल आणि इजिप्ती, चिनी, आसुरी, इराणी, ग्रीक, रोमन या प्राचीन संस्कृतींचा इतिहास भारतीय इतिहासाच्या विशिष्ट कालाच्या इतिहासाच्या अनुषंगानें विवेचितां येईल, एवढेच नव्हे तर हिंदुस्थानचा यूरोपांतील लोकांशीं जो एकवंशसंभवसंबंध दिसतो त्यामुळें इतिहासाशीं अत्यंत निकट संबंध असलेल्या भाषाशास्त्र, तौलनिक दैवतशास्त्र इत्यादी शास्त्रांशीं ओळख देखील हिंदुस्थानाच्या इतिहासाच्या अनुषंगानें देतां येईल.
जगाच्या इतिहासाशीं परिचय करून देण्यासाठीं हिंदुस्थानाच्या इतिहासाच्या अनुषंगानें सुरूवात करावी हें कित्येकांस बौद्धिक औद्धत्य वाटेल. कां कीं, इतिहासाविषयीं हिंदुस्थानाची अनास्था प्रख्यात आहे. भारतीयांचा इतिहास स्पष्ट करण्यासाठीं परक्यांची मदत घ्यावयाची ही जर पद्धति आहे, तर भारतापासून प्रारंभ करून जगाची ओळख करून देण्याचा प्रयत्न आपण कसा करणार? या प्रश्नास उत्तर एवढेंच कीं. जगाच्या अत्यंत प्राचीन इतिहासावर प्रकाश पाडणारा माल म्हणजे अत्यंत प्राचीन भाषा व शब्द हे भारतांत शिल्लक आहेत. त्यांचे निरनिराळ्या काळांतले अवशेषहि शिल्लक आहेत. फक्त या अवशेषांचा पृथ्वीच्या सूर्याभोवतीं होणार्या परिभ्रमणाच्या आंकडयांशीं संबंध लावावयाचा, हा इतिहाससंशोधकांचा कर्तव्यभाग आहे.
शिवाय हेंहि लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, इतिहास लिहिण्याची कला भारतीयांस अगदीं अपरिचित होती असें नाहीं. ज्या भावना इतिहासोत्पत्तीस व इतिहासरक्षणास कारणीभूत होतात त्या भावना भारतांत जागृत होत्या.
त्या भावनांचे परिणाम ज्या स्वरूपांत आपणांस दृष्टीस पडतात त्या परिणामांस आपण आज कदाचित् इतिहास म्हणणार नाही. शिलालेखांवरील राजावली व पुराणांतील कथा व कुलपरंपरा यांस आजचे लोक इतिहास म्हणणार नाहींत. तथापि ज्या भावना इतिहासग्रंथांच्या उत्पत्तीस कारण झाल्या त्या याहि कृतींच्या उत्पत्तीस कारण झाल्या. काश्मीरची राजतरंगिणी, सिंहलव्दीपांतील वंसोग्रंथ व आसाम आराकानकडील राजांचे इतिहास, यांसारखे प्रकार पाश्चात्य लोकांस इतिहासासारखे वाटतात; परंतु राष्ट्राच्या ज्या अनेक उलाढाली झाल्या, त्यांचे वर्णन करणारे हे वंसोग्रंथ खास नाहींत. ऋग्वेदांत ज्याप्रमाणें ब्राह्मणांस गाईंचें दान करणार्या राजे लोकांच्या जंत्री सांपडतात, त्या जंत्रींस पौराणिक, काल्पनिक, भाकड कथांची जोड दिली असतां जें स्वरूप येईल तें या वंसोग्रंथांचें आहे. पुष्कळ वेळां तर ज्या कथा हिंदुस्थानांतील कित्येक राजांच्या नांवांनी खपत होत्या त्या सिंहलांतील कांहीं राजांच्या नांवांनीं दडपून दिल्या आहेत. आहोम राजांच्या इतिहासाचे आहोमी (आसामी) भाषेंतील ग्रंथ भाषांतरित झालें नाहिंत आणि त्यामुळें त्या ग्रंथांवर विवेचन करतां येत नाही; परंतु पौराणिक ग्रंथांत जे दोष असतील अथवा जे दोष बखरींत आढळतात तेच दोष तेथेंहिं असतील अशी आमची समजूत आहे.
इतिहास लिहिण्याची मनुष्याची प्रवृत्ति झाली तिचें कारण आपण काय केलें तें लिहून ठेवावें ही मनुष्याची इच्छा होय. या इच्छेमुळें हिंदुस्थानांतील अनेक राजांनीं आपले विजय शिलालेखांत कोरून ठेविले. ते सर्व इतिहास होत. इतिहासावर भारतीयांची आस्था नव्हती असें नाहीं. तथापि इतिहास या स्वरूपाचें वाङ्मय भारतांत फारसें वाढलें नाहीं, हें मात्र कबूल केलें पाहिजे. याचें मुख्य कारण राष्ट्राची इतिहासविषयक अनास्था होती असें नाहीं. वेदरक्षण झालें तें वाङ्मयरक्षणाच्या हेतूमुळें झालें असें मुळींच नाही तर प्राचीन ऋचांचा यज्ञाकडे उपयोग करण्यांत येई, यज्ञ करण्यासाठीं तें ज्ञान शिकावें लागे, अशी परिस्थिति असल्यामुळें त्या ग्रंथांचें जतन तरी झालें. भाटांचा जो वर्ग होता त्यानें राजस्थानाच्या बर्याच इतिहासाचें जतन केंलें. तथापि भाट हे वाङ्मयाचे कर्ते होते. काव्यें करणें हे त्यांचे कार्य असून इतिहासरक्षण करणें हें त्यांचें कार्य नव्हतें. त्यांचें कार्य लोकरंजन किंवा दात्याचें रंजन करण्याचें होतें. आपणांस या प्रवृत्तीमुळें थोडासा इतिहास उपलब्ध झाला आहे. करमणूक हा जेव्हां उद्देश असतो तेव्हां इतिहास हा चांगला काळजीपूर्वक रक्षिला जातो असें नाहीं जी कथानकें मनोरंजक असतात त्यांस प्राधान्य दिलें जातें. जो मोठा दिग्विजयी योध्दा असेल त्याच्या चरित्रापेक्षां ज्याच्या प्रेमविषयासंबंधानें लोकांनां अधिक मौज वाटेल त्याचेंच चरित्र रक्षिलें जातें. श्रोत्यांवर परिणाम घडवावयाचा असतो तेव्हां साध्या वर्णनापेक्षां तिखट-मीठ लाविलेलें वर्णन लोकांस सहजच अधिक आवडणार. लोकरंजनास जेव्हां प्राधान्य दिलें जातें तेंव्हां व्यक्तीचें ऐतिहासिक महत्व आणि सत्य या दोन्ही तत्वांची राखरांगोळी होते. बाजीरावाच्या मोठमोठ्या लढायांपेक्षां सामान्य लोकांस त्याच्या मस्तानीचें नांव अधिक परिचित आहे. हिंदुस्थानांत इतिहासरक्षणाचे प्रयत्न आपणांस वारंवार दृष्टीस पडतात. पण ते प्रयत्न लोकरंजन- प्रयत्नांत किंवा विशिष्ट उपासनेचा किंवा तत्वाचा पुढाकार करण्याच्या प्रयत्नांत विलीन झालेले दृष्टीस पडतात.
प्रत्येक इतिहासग्रंथामध्यें खोटें लिहिण्याची इच्छा लेखकास जास्त असते आणि पुष्कळदां खोटें लहिण्याकरितांच इतिहास जन्मास येतात. जगाची ऐतिहासिक भावना किंवा इतिहास महत्वाची जाणीव सत्य लिहिण्याच्या प्रयत्नावरून जशी दिसून येणार आहे तशीच खोटें लिहिण्याच्या प्रयत्नावरूनहिं दिसून येणार आहे. जो खोटें लिहून ठेवितो तो भावी वाचकांस फसविण्याच्या उद्देशाने लिहून ठेवितो आणि त्यास इतिहासमहत्व असल्याशिवाय तो खोटें लिहिण्याचे परिश्रम करील असें संभवत नाहीं. प्रत्येक इतिहासग्रंथांमध्यें कांहीं तरी खोटें अगर पक्षाभिमानानें अर्धेमुर्धे खरें लिहिणें दृष्टीस पडतेंच. तर जो ग्रंथ अगोदरच काव्य आहे त्यावर वैय्यक्तिक इच्छेनें किंवा आकांक्षेनें परिणाम होऊन त्याचें स्वरूप विकृत होतें हे आपल्या रामायण महाभारतादि ग्रंथांवरून व पुराणांवरून स्पष्ट होतें. खोट्या व लपंडावीच्या विधानांवरून खोटेपणाचीं व लपंडावीचीं कारणें शोधिलीं असतां आजच्या संशोधकांस इतिहास अधिक खुला होतो. त्याप्रमाणेंच आपल्या देशांतील सर्व प्रकारचे ग्रंथ घेऊन आपणांस इतिहास खुला करावा लागेल.
ग्रीकांचा प्रख्यात इतिहासकार हिरोडोटस याचें स्तोम बरेंच माजविलेलें आपणांस दृष्टीस पडतें. त्यास सत्यवक्ता म्हणणारे लोक आंधळे आहेत असें वाटावयास लागतें हिरोडोटसचा ऐतिहासिक प्रामाणिकपणा देखील वर्णिला जातो. आज आपण हिरोडोटसचा ग्रंथ वाचूं लागलों म्हणजे कर्णोपकर्णी ऐकलेल्या किती तरी गोष्टी त्यानें लिहून ठेविलेल्या दृष्टीस पडतात. शिवाय लोकरंजन हा हेतु त्याच्या ग्रंथांत प्राधान्याने दृष्टीस पडतो. त्याच्या इतिहासांत कादंबरीवजा अनेक गोष्टी त्यानें भरल्या आहेत असें दिसून येतें. जिज्ञासूस ज्ञान देण्याच्या करामतीपेक्षां टवाळ व चावट गोष्टींचे शोकी असे जे गृहस्थ आहेत त्यांनां खूष करण्याच्या करामतींवर त्याच्या ग्रंथाची लोकप्रियता रचली गेली असावी आणि त्यानेंहि लोकप्रियताच मिळविण्यासाठीं खटपट केली असावी असें ग्रंथ वाचतांना वाटतें. असें वाटण्यास एकच कारण देतो. हिरोडोटसने हिंदुस्थानांतील लोकांसंबंधाने ते मनुष्यभक्षक आहेत अशी आपली समजूत व्यक्त केली आहे (Herodotus III-99). त्यास सत्य जाणण्याची संधि होती, तथापि जी गोष्ट मनोरंजक आहे, तिच्यांतील सत्य शोधून तिचा मनोरंजकपणा कशास घालवावा या भावनेनें तरी त्यानें सत्य शोधलें नसावें किंवा मुद्दाम असत्य प्रस्तृत करण्याची त्याची इच्छा असावी असें दिसतें. हिरोडोटसचा ग्रंथ इतिहास या दृष्टीने पुन्हांमांडणी करण्यास अवश्य असा आहे. हिरोडोटसची इतिहासविषयक कल्पना फारशी उज्ज्वल दिसत नाहीं. आणि वाङ्मय या दृष्टीनें देखील हा ग्रंथ अव्यवस्थित दिसतो. तो ऐतिहासिक टीपांनी युक्त व थोड्याबहुत चावट गोष्टींनीं लोकप्रिय झालेलें असें प्रवासवर्णन होय असें आम्ही म्हणूं.
इतिहास लिहितांना ज्या काहीं क्रिया होतात त्यांकडे आपण थोडेंसें लक्ष देऊं.
(१) माहिती जमा करणें.
(२) वृत्तांचे महत्वमापन करणें.
(३) माहितीच्या अभावाच्या प्रसंगीं माहीत असलेल्या गोष्टीवरून संयोजक कल्पना करणें.
(४) लेखनीय माहितीची व्यापकता नियमित करणें.
(५) जगाच्या किंवा राष्ट्राच्या विकासक्रमाविषयीं सिध्दांत करणें.
या क्रियांपैकीं प्रत्येक क्रिया प्राचीन वाङ्मयांत झालेली दिसते. रामायण, महाभारत व पुराणें यांत जुनी माहिती जमा करून ठेवल्याचे पुरावे वारंवार दिसतात.
इतिहास कसा लिहावा यासंबंधानें विचार नेहमीं बदलत असतात. कालची स्थिति आज समजावी हें सर्वांसच वाटतें. पण कालच्या कोणत्या गोष्टीस महत्व द्यावयाचे यासंबंधाने कल्पना असेल तर इतिहास लिहिण्यास दिशा मिळेल. वृत्तांच्या महत्वासंबंधानें प्राचीनांची जी बुद्धि असेल ती अवगमिली पाहिजे. “कार्यमहत्वविवेचकता” हा इतिहासकाराचा अवश्य गुण तो प्राचीनांत होता काय हें आपणांस पाहिलें पाहिजे. हा गुण त्यांत होता असें केवळ पुराणाच्या व्याख्येवरून दिसतें.
प्राचीनांची इतिहास-विषयक कल्पना आणि पुराण-विषयक कल्पना आज आपणांस जाणणें अवश्य आहे. पुराण म्हणजे फार जुना इतिहास. प्राचीन पुराणांची व्याख्या येणेंप्रमाणें आहे.
सर्गश्र्च प्रतिसर्गश्र्च वंशो मन्वन्तराणि च |
वंशानुचरितं चेति पुराणं पंचलक्षणम् ||
पंचमहाभूतात्मक जगाची उत्पत्ति कशी झाली, मूलभूततत्वां-पासून इतर चराचर कसें निर्माण झालें, निरनिराळें वंश कोणते झाले, त्यांच्या कामगिर्या काय झाल्या, कालाचे अत्यंत मोठे विभाग म्हणजे जीं मन्वन्तरें, त्या निरनिराळ्या मन्वन्तरांत कोणकोणत्या गोष्टी होऊन गेल्या, या सर्वांची माहिती पुराणांत दिली पाहिजे अशी प्राचीनांची भावना होती. अत्यंत जुन्या गोष्टींची माहिती फारशी कालानुक्रमाने सांगतां येत नाहीं आणि त्या गोष्टींतील महत्वाच्या गोष्टी केवळ जुन्या म्हणून विशेष कालविषयक चर्चा केल्याशिवाय उतरून घेणें व ग्रंथीं समाविष्ट करणें याशिवाय दुसरा कोणताहि पक्ष ग्रंथकारांस उरत नाहीं. असें असल्यामुळें पुष्कळशा प्राचीन कथा कालानुक्रमानें मांडणीशिवाय व कालविषयक विधान केल्याशिवाय पुराणांत ग्रथित केलेल्या दिसतात.
इतिहासाचा एक हेतु असा असतो कीं, आज लोकांनां जें दिसत आहे त्याची उत्पत्ति अगर विकास सांगून ते स्पष्ट करावें. या हेतूचा इतिहास हा एक शक्य परिणाम आहे तथापि तो एकच नाहीं. या हेतूमुळें जे वाङ्मय उत्पन्न होतें तें केवळ इतिहासरूपी होत नाही. जेंव्हां एखाद्या गोष्टीची आपणास साधार माहिती नसेल किंवा ती माहिती उपलब्ध होण्याजोगी नसेल तेव्हां पुढील प्रश्न सोडविण्यासाठीं मनुष्य कल्पना लढवूं लागतो. विश्व उत्पन्न कसें झालें? जाती उत्पन्न कशा झाल्या? राष्ट्रें उत्पन्न कशीं झालीं? इत्यादि जाडे प्रश्न एखाद्या काळच्या जाणते म्हणून समजल्या जाणार्या लोकांना साहित्य असो अगर नसो सोडविणे भाग पडतें, आणि ते त्यांस उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणें कल्पना करूं लागतात. या कल्पनांचें परिक्षण न होतां शेंकडों वर्षें त्या कल्पना लोकांस पढविल्या म्हणजे त्यांवर लोकांची इतकी श्रंध्दा बसूं लागते कीं, त्या कल्पनांवर विश्वास न ठेवणारा मनुष्य लोकांस नास्तिक अगर पाखंडी वाटावयास लागतो. पुष्कळ वेळां त्या कल्पनांनीं एखादा काल्पनिक इतिहासहि तयार होऊं लागतो. या तर्हेचा “इतिहास” आपल्या पुराणांतून व रामायणमहाभारतादि आर्ष काव्यांतून आणि त्याप्रमाणेंच वेदांतील अर्थवादांतून पुष्कळ दृष्टीस पडतो. भारतीयांस इतिहासाविषयीं अनास्था असलेले लोक म्हणून शिक्का मिळाला आहे आणि यांत तथ्थहि पुष्कळ आहे; पण याबरोबर हेंहि लक्षांत ठेवलें पाहिजे की, प्राचीनांस इतिहासजिज्ञासा होती व ज्या गोष्टीचा इतिहास ठाऊक नाहीं तो ज्ञानाचा खळगा विचार करून आणि तत्वज्ञान लावून भरून काढणें ही क्रिया ते करित होते. पुष्कळदां ही क्रिया करतांना केवळ काव्यरूपी कल्पनाच उत्पन्न होत. काव्यरूपीच त्यांची कल्पना होई ही गोष्ट प्राचीन भारतीयांच्या विरूद्द मांडतां येईल पण याबरोबर हेंहि लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, माहितीचा अभाव निव्वळ कल्पनेनें भरून काढणारे लोक भारतीयांतच केवळ नाहींत तर ते चोहोंकडे आहेत. प्रत्येक राष्ट्र आडामपासून किंवा त्याच्या वंशांतील एखाद्या पुरूषापासून झालें आहे अशा समजुतींनीं ग्रीकांचे, अरबांचे व मुसुलमानांचे इतिहास यथास्थित भरलेले दिसतात, बौद्ध ग्रंथकारांनीं देखील असल्या कथांचे चांगलें यथास्थित ग्रहण केलेले दिसतें. येथें हेहि सांगितले पाहिजे कीं जेथें माहिती नसेल तेथें इतिहासकारानें वस्तुस्थिति कशी असावी यासंबंधानें कल्पना करणें ही क्रिया आजच्या शास्त्रीय पद्धतीनेहि इतिहासलेखनाचें अंग आहेच. फरक हा कीं आजचा इतिहासलेखक कल्पनेस कल्पनाच म्हणून पुढें मांडील. प्राचीन पुराणकार तसें करीत नसत.
इतिहासाचें क्षेत्र काय व त्याचें इतर ज्ञानक्षेत्रापासून पृथ करण कसें करावें हें आजहि निश्चितपणें ठरलें नाही. लोकांच्या इतर ज्ञानावर क्रियांच्या महत्वाचें ज्ञान अवलंबून असणार आणि त्यावर लेखन अवलंबून असणार. जगांत झालेल्या सर्व प्रकारच्या घडामोडी या इतिहासाचा विषय होत. इतिहास या विषयाचें स्वरूप दिवसानुदिवस अधिकाधिक विकसित होऊं लागलें आहे. इतिहास या शब्दाचा म्हणजे इति+ह+आस या शब्दसमुच्चयाचा मूळ अर्थ ‘असें झालें’ असा आहे. ग्रीक लोकांमध्यें हिस्टोरिया हा शब्द प्रथम जन्मास आला आणि त्याचा अर्थ शोध किंवा माहिती असा होता. ज्ञानाचें वर्गीकरण करूं इच्छिणारे लोक इतिहास हें शास्त्र आहे किंवा नाहीं याची बरीच पंचाईत करतात. ते म्हणतात की, इतिहास हे शास्त्रच नव्हे. कोणी म्हणतात, मनुष्य हा एक प्राणी आहे, तेव्हां मनुष्याच्या जगावरील क्रिया हा एकंदर प्राणिशास्त्राचा विषय होईल. कित्येक असें म्हणतात की, इतिहास हें जगांतील एकच शास्त्र होय. इतर शास्त्रें म्हणजे मनुष्यप्राण्याचें ज्ञान या सदराखाली इतिहास या शास्त्रांत सर्व कांहीं समाविष्ट करतां येईल. कारण कोणासहि वास्तविक ज्ञान होतच नाहीं. वस्तूंचें इंद्रियगोचर स्वरूप व त्यावर रचलेलीं अनुमानें तेवढीं मनुष्यास ठाऊक आहेत तेव्हां शास्त्रीय ज्ञान हा केवळ मनुष्येतिहासाचा भाग होय.
मनुष्याचा ऐतिहासिक घडामोडींवर विचार होऊं लागतो आणि त्याचे जगाच्या क्रमाविषयीं सिध्दांत बनूं लागतात. ही क्रिया देखील आपल्या वाङ्मयांत दृष्टीस पडते, ‘फिलॉसफी ऑफ हिस्टरी’ म्हणून एक अभ्यासक्षेत्र यूरोपांत दृष्टीस पडते त्यावर पुष्कळ ग्रंथ निर्माण झाले आहेत. त्या ग्रंथाचे विषय साधारणपणें खालील प्रकारचे दृष्टीस पडतात.
जगांतील अनेक घडामोडी पाहुन त्यांतून कांहीं ईश्वरी संकेत दृष्टीस पडतो काय हें पाहावयाचें आणि त्यांतून ईश्वराचे हेतू ओळखावयाचे. समाजाचा क्रम पाहून त्यांतून ईश्वराचे हेतू व नियम ओळखून आपला ईश्वराविषयींचा भाव दृढ करावा या इच्छेने कित्येक ग्रंथकार प्रवृत्त झाले आहेत.
कित्येक ग्रंथातून इजिप्त, खाल्डिया, ग्रीस, रोम इत्यादि राष्ट्रांचा विकास व विनाश हें पाहून संस्कृतीची मशाल एका हातांतून दुसर्या हातांत अधिक प्रभावयुक्त होण्याकरितां कशी दिली इत्यादि गोष्टी लिहिल्या आहेत.
कित्येकांनी असें दाखविण्याचा प्रयत्न केला आहे कीं, ‘रिव्हिलेशन’ मध्ये जी विधानें केली आहेत तीच इतिहासाचे तत्वज्ञान होत.
समाजशास्त्रामध्यें समाजविकासात्मक जे नियम सांपडले त्यांसहि कोणी ‘फिलॉसफी ऑफ हिस्टरी’ असें नांव दिलें आहे.
कित्येकांनीं जगाच्या इतिहासांत दूरदूरच्या काळांस एकत्र जोडणारे कांही अर्थशास्त्रीय नियम सांपडतात काय यासाठी झालेल्या शोधांच्या फलास ‘फिलॉसफी ऑफ हिस्टरी’ हे नांव दिलें आहे. कोलंबियाचे प्रोफेसर डॉक्टर सेलिग्मन यांनी यास ‘एकानामिक इंटरप्रिटेशन ऑफ हिस्टरी’ म्हणजे जगाच्या इतिहासाचें अर्थशास्त्रीय स्पष्टीकरण असें नांव दिलें आहे.
प्राचीनांचें इतिहासविषयक ज्ञान शोधावयाचें म्हणजे जगांतील क्रियांचे महत्व ते मोजीत होते काय, आजच्या महत्वाच्या गोष्टींस कारण शोधून त्या गोष्टींच्या अस्तित्वाचें स्पष्टीकरण करणें यास ते महत्व देत होते काय, व्यवहारनियम इतिहासावरून शिकण्याचें ते पत्करीत होते काय आणि मनुष्यक्रियाविषयक वाङ्मय त्यांस आवडत होतें काय हे प्रश्न उपस्थित होतात. या सर्व प्रश्नांस होय म्हणूनच उत्तर द्यावे लागते. एवढें खरें की, इतिहासशास्त्राची जोपासना पाश्चात्यांमध्ये जितक्या प्रमाणानें झाली तितक्या प्रमाणानें आपल्याकडे झाली नाही.
आपल्याकडे इतिहासावर जें तत्वज्ञान तयार झालें त्यांत जे अनेक सिद्धांत मांडले गेले, आणि लेखनविषयक वृत्ति तयार झाली त्यांचे सामान्य स्वरूप येणेंप्रमाणें:-
(१) स्मृत्यर्ह काय व विस्मृत्यर्ह काय याविषयी विचार करून इतिहासविषयक ग्रंथाची व्याख्या करणें.
(२) युग, अवतार, मन्वंतर असे महत्वाचे कालविभाग निर्देशिणें.
(३) मोठ्या कार्यकर्या पुरूषाचें अस्तित्व विशिष्ट क्रियाविकासाचे सिद्धांत सांगून स्पष्ट करणें.
(४) युद्धें राज्यक्रान्त्या यांचे युक्तायुक्त परीणाम व्यक्त करणें.
(५) मानवी क्रिया पाहून त्या क्रियांचा अंतिम हेतु काय याविषयीं विचार करणें आणि त्या हेतूंनी क्रियांची योग्या-योग्यता ठरविणें.
(६) इतिहासविकासाचे नियम राजकीय घडामोडींतच केवळ व्यक्त होतात असें नाहीं तर वैचारिक इतिहासांत व पारमार्थिक क्रियांमध्यें व्यक्त होतात हें जाणून वैचारिक व पारमार्थिक इतिहासाचा प्रयत्न करणें.
(७) विशिष्ट राजकीय घडामोडींविषयीं औदासीन्य ठेवणें.
(८) राजवंशावली व गुरूपरंपरा यांचे रक्षण करणें.
या सर्व क्रिया व भावना पुराणग्रंथांत दिसत आहेत आणि त्या पुराणग्रंथकारांनां ऐतिहासिक तत्वज्ञानाची भावना तीक्ष्णपणें होती हें दाखवितात.
प्राचीनांचे इतिहासविषयक तत्वज्ञान पुराणाच्या व्याख्येंत अंशत: आहे ती व्याख्या व तिचें स्पष्टीकरण मागें दिलेंच आहे. आपल्या इतिहासविषयक तत्वज्ञानाची एक महत्वाची कल्पना म्हटली म्हणजे युगकल्पना होय. गेला तो दिवस सोन्याचा या शिशुकल्पनेचेंच जास्त उत्तान स्वरूप होय. कृतयुगामध्यें चतुष्पाद धर्म होता, त्रेतायुगामध्यें त्रिपाद धर्म होता, व्दापारामध्यें व्दिपाद धर्म होता आणि कलियुगामध्यें एकपाद धर्म रहाणार, या तर्हेची कल्पना आपल्याकडे पुराणांतून व धर्मशास्त्रांतून प्रस्तृत केली गेली.
आपल्याकडील दुसरी एक कल्पना म्हटली म्हणजे अवतार कल्पना होय. अवतारकल्पना
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत |
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ||
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||
या गीतावाक्यांत स्पष्टपणें मांडली आहे. जगांत जी मोठालीं कार्ये होत असतात, त्या कार्यांचा कर्ता म्हणून कोणीतरी पुरूष उदयास येतो अशा पुरूषास अवतारी पुरूष म्हणण्याचा प्रघात आहें. अवतारी पुरूष म्हणजे स्वर्गांतील एखादा देव नाहींसा होऊन मनुष्यरूपानें वागतो अशी प्राचीनांची समजूत होती असें दिसत नाहीं. कांकी, धर्म आणि विदुर या दोघांस यमाचे अवतार महाभारतकारांनी मानलें आहे आणि ते दोघेहि पृथ्वीवर असतां यमधर्महि आपल्या लोकांत होता असें धरलें आहे.
अवतारी पुरूष अधिक महत्वाचे किंवा परिस्थिति अधिक महत्वाची याविषयीं परस्परविरूद्ध भावना देखील लोकांच्या विचारांत द्दष्टीस पडतात. कार्यकर्ता पुरुष अनेक प्रसंगी असें म्हणतांना दाखविला आहे की, ‘मी केवळ होणा-या कार्याला निमित्तमात्र आहें, कार्य करणारी आणि कार्य माझ्या हातून घडविणारी शक्तिं निराळीच आहें’.
इतिहासाचा विषय जगांतील राजकीय घडामोडी होत एवढेंच केवळ नाही तर जगांतील ज्ञान हाही इतिहासाचा विषय होय असें प्राचीन मानीत असत आणि प्रत्येक शास्त्राचा इतिहास देण्याचा ते प्रयत्न करीत. पुष्कळ प्रसंगी ते शास्त्र देवानेंच दिले असें दाखवीत पुष्कळ शास्त्रें वेदमूलक आहेत असें दाखविण्याचा प्रयत्न करीत.
इतिहासज्ञानामुळें जी कार्यकारणपरंपरा लक्षांत येते तिचे ज्ञान पुष्कळ प्रसंगी जतन करुन ठेवलेलें दिसतें.
इतिहासाच्या योगानें राजनीतिशास्त्र विकास पावतें. हें नीति शास्त्र आपल्याकडे पुष्कळ विकसित झालें होते व त्या शास्त्रावर अनेक ग्रंथकार होउन गेले हें चाणक्याचा ग्रंथ वाचला असतां सहज लक्षांत येईल, लोकांमध्ये ऐतिहासिक भावना कितपत पसरली आहे हें कालक्रमाविषयीं कल्पना किती प्रचलित आहेत हें पाहून त्यांवरुन ठरवावयाचें. अवतारकल्पना, युगकल्पना हिंदूमध्ये सामान्य मनुष्यासहि परिचित असतात; म्हणजे सामान्यामध्येंहि ऐतिहासिक भावना आहे असें म्हणतां येईल. सामान्य वाड्मयामध्यें देखील इतिहासमूलक सिध्दांत व भावना दृष्टीस पडतात. त्या आपणांस तत्वज्ञानाच्या ग्रंथांत देखील सांपडतील.
इतिहासांतील एक नेहमीं लक्ष वेधणारी गोष्ट म्हटली म्हणजे युद्ध होय. युध्दाचे निकट व दूरवर परिणाम जाणणें हा एक ऐतिहासिक तत्वज्ञानाचा भाग होय. हें युद्धपरिणामज्ञान भगवद्गीतेंतच उत्तम त-हेनें वर्णन केलें आहे.
कुलक्षये प्रणश्यंति कुलधर्मा: सनातना : |
धर्मे नष्टे कुलं कूत्स्नमधर्मोsभिभवत्युत ||
अधर्माभिवांत् कृष्ण प्रदुष्यंति कुलस्त्रिय : |
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायतें वर्णसंकर: ||
सक्डरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्यच |
पतंति पितरो हयेषां लुप्तपिंडोदकक्रिया : ||
अनेक युद्धें होऊन एक राष्ट दुस-या राष्टाचा पाडाव करतें या प्रकाराच्या क्रियांवर इतिहासकाराचें मत मोठया मार्मिकपणानें पुराणांत व्यक्त केलें गेलें आहे.
पृथिव्युवाच :-
कथमेष नरेन्द्राणां मोहो बुद्धिमतामपि |
येन केन सधर्माणोप्यतिविश्वस्तचेतस: ||
पूर्वमात्मजयं कृत्वा जेतुमिच्छन्ति मंत्रिण: |
ततो भृत्यांश्र्च पौरांश्र्च जिगीषंते तथा रिपून् ||
क्रमेणानेन जेष्यामो वयं पृथ्वीं ससागराम् |
इत्यासक्तधियो मृत्युं न पश्चंत्यविदूरगम् ||
समुद्रावरणं याति भूमंडलमथो वशम् |
कियदात्मजयस्यैतन्मुक्तिरात्मजये फलम् ||
उत्सृज्य पूर्वजा याता यां नादाय गत: पिता |
तां मामतीव मूढत्वाज्जेतुमिच्छन्ति पार्थिवा: ||
मत्कृते पितृपुत्राणां भ्रातृणां चापि विग्रह: |
जायतेत्यंतमोहेन ममत्वादृतचेतसाम् ||
पृथ्वी ममेयं सकला ममैषा
मदन्वयस्यापि च शाश्वतीयम ||
यो यो मृतेsन्यत्र बभूव राजा
कुबुद्धिरासीदिति तस्य तस्य ||
दृष्ट्बा ममत्वादृतचित्तमेकं
विहाय मां मृत्युवशं व्रजन्तम् ||
तस्यानुयरतस्य कथं ममत्वं
हृद्यास्पदं मत्प्रभवं करोति ||
पृथ्वी ममैषाऽऽशु परित्यजैनां
वदंति ये दूतमुखैस्स्वशत्रून् ||
नराधिपास्तेषु ममातिहास:
पुनश्र्च मूढेषु दयाsभ्युपैति ||
विष्णुपुराण अं. ४. अ. २४ श्लोक १२८-१३६.
पृथ्वी म्हणाली :-
सल्लागार, नोकर, जनता आणि शत्रु ही सर्व क्रमानें जिंकतां जिकंतां शेवटी सर्व समुद्रवलयांकित पृथ्वीचें अधिराज्य आपण मिळवूं अशा आसक्तीनें, समीप ठाकलेल्या मृत्यूकडेहि दुर्लक्ष करण्याची भुरळ, निग्रहावस्था पार झालेल्या परंतु मृत्यूला सहज वश आणि फाजील आत्मविश्वास धरणा-या मोठया ज्ञानी राजांनां देखील कशी पडते? मोक्ष हे अंतिम साध्य जर आत्मनिग्रहानें हातीं लागणारें आहे तर, विस्तृत सागराची आणि भूगोलाची मालकी मिळविण्यासारख्या क्षणिक हव्यासापायीं, तें साध्य हातचें गमवावें काय ?
ह्यांच्या आजेपणज्यांनीं मला बरोबर नेली नाहीं हयांच्या बापानेंहि मला येथेंच ठेविली, असें आहे तरी माझ्यावर पूर्ण ताबा चालविण्याची इच्छा वेडगळपणानें अदयाप बाळगितातच. मीपणाच्या भरी भरुन, माझ्यावर मालकी गाजविण्यासाठी, बापलेकांचे आणि भावाभावांचे खटके उडतात.
एक राजा दिवंगत झाला आणि त्याच्या गादीवर दुसरा आला कीं तो प्रत्येकजण आपल्याशीं बढाई मारीत असतो कीं, ही पृथ्वी माझ्या मालकीची आहे आणि ती चिरकाल माझ्या वंशजाकडे नांदेल.
माझ्यावर मालकी गाजविणारा एक राजा इहलोक सोडून कसा जातो, त्याच्या जागीं येणाराची मृताबदलची आपलेपणाची भावना नाहींशी होऊन माझ्याबद्दलचा अभिलाष त्याला कसा सुटतो, 'पृथ्वीवर माझी मालकी आहे, तूं तिच्यावरील हक्क सोड' असें दूतांकडून शत्रूंना कसें निवेदन करण्यांत येतें, हे पाहून मला हंसूं येतें आणि मूर्खपणाबदल त्यांची कींव वाटतें.
इतिहासाचे नियम केवळ राजकीय इतिहासांतच सांपडतात असें नाही तर सांस्कृतिक इतिहासांतहि दृष्टीस पडतात. तसेंच पारमार्थिक विचारांचे प्राबल्य कोणत्या वेळेस कसें झालें, तें कोणत्या नियमांनीं बांधले गेंलें आहे या विषयावर देखील विचार व्यक्त झाले आहेत. ज्ञान, कर्म आणि उपासना या तिहींची समाजाला आवश्यकता आहे आणि त्यांपैकी एखादयाचें अधिक प्राबल्य झालें म्हणजे समतोलपणा कायम ठेवण्यासाठी दुस-या प्रकारच्या विचारांचा पुरस्कर्ता तयार होतो या त-हेचे विचार अनेक, ग्रंथकारांनी व्यक्त केले आहेत. उदाहरणार्थ माधवाचार्य म्हणतात.
शृणुं सौम्य वच: श्रेयो जगदुध्दारगोचरम् |
काण्डत्रयात्मके वेदे प्रोध्दृते स्पाद्द्विजोध्दृति ||
तद्रक्षणे रक्षितं स्यात्सकलं जगतीतलम् |
तदधीनत्वतो वर्णाश्रमधर्मततेस्तत: ||
इदानीमिदमुध्दार्यमितिवृत्तिमत: पुरा |
मम गूढाशयविदौ विष्णुशेषौ समीपगौ ||
मध्यमं काण्डमुद्धर्तुमनुज्ञातौ मयैव तौ |
अवतीर्यांशतो भूमौ संकर्षणपतअली ||
मुनी भूत्वा मुदोपास्तियोगकाण्डकृतौ स्थितौ |
अग्रिमं ज्ञानकाण्डं तूद्धरिष्यामीति देवता: ||
(शंकरदिग्विजय १,४८-५२.)
या वरील वाक्यांचें विस्तृत स्पष्टीकरण कै. रघुनाथशास्त्री गोडबोले यांनी येणेंप्रमाणे केलें आहे.
''बौद्धमत वैदिक धर्माच्या जरी मागचें आहे, तरी. तें लपुन छपून बरेंच प्राचीन असल्याचें वाल्मीकिरामायणावरुन दिसून येतें. त्या मतांतील लोकांच्या मनांतून अहिंसाधर्मामिषानें यज्ञ बंद पाडावेत असें तेव्हांपासून असतांहि, त्या काळचे राजे व ॠषी यांच्यापुढें त्यांचा कांही उपाय चालेना. त्यामुळें तो ग्रह, ही संधि केव्हां येईल तिची मार्गप्रतीक्षा करीत असतां, गेल्या द्वापरयुगाच्या अंती भारती युध्दांत प्राय:सर्व राजे नाश पावले तसेच ॠषीहि अदृश्य झाले, असें पाहतांच चार्वाकाच्या व क्षपणकाच्या रुपानें प्रगट झाला. आणि त्याने ईश्वर नाहीं, परलोक नाहीं इत्यादि प्रकारचें नास्तिक शास्त्र प्रवृत्त करुन, लोकांस यज्ञकर्मापासून परावृत केलें असें वृत्त त्यांच्याच ग्रंथांवरुन दिसून येतें.
हि नास्तिक मताच्या आघाडीची चार्वाकक्षपणकरुप जोडी, युधिष्ठिरशकाच्या सहाशें साठाव्या वर्षाच्या सुमारास प्रगट झाल्यावर, मागून बुद्ध व अर्हत् क्रमानेंच उत्पन्न झाले. त्यांनी जरी त्यांच्या मताचें खंडन केल्याचें व ईश्वर आणि परलोक आहेत असें मानल्याचें जैन ग्रंथांवरुन दिसतें, तरी वेद हे पौरुष होत हा जो त्यांचा सिध्दांत, तो त्यांनी जीवापलीकडचा समजून, अहिंसाधर्ममिषानें कर्मकांड बंद पाडलें. तें इतकें कीं, तो शब्द थोडक्याच काळांत कानांनी मात्र ऐकावा, अशी दशा त्यास येऊन पोंचली. अर्थात् ज्ञानकांडहि त्याच पंथास लागून राहिलें होतें.
याप्रमाणे, कर्म आणि ज्ञान या दोहोंचा -हास करुन, बौद्ध व जैन आपला तृतीय पंथ विस्तृत करीत सर्व भरतखंडांत सुमारें दीड हजार वर्षेपर्येंत एकसारखी धुमश्चक्री उडवीत असतां, त्याच संधींत वैदिक लोक मध्यम कांडास (उपासनाकांडास) अनुसरले, परंतु तें मध्यमकांड आगमोक्त व श्रुतिविरुद्ध असल्यामुळें, एकंदरींत सर्व गोंधळच होऊन गेला असें पाहून, स्वामी कार्तिक, ब्रह्मदेव, आणि इ्रंद्र, हे तिघे ईश्वराज्ञेनें प्रथम पृथ्वीवर पुढें आले व त्यांनीं कुमारिलभट, मंडनमिश्र व सुधन्वा या नांवांनीं अवतीर्ण होऊन, तशीच कर्मकांडाची पूर्ववत् स्थापना करुन, बौद्ध व जैन यांचा अगदीं धुवा धुवा उडवून दिला.
असें जरी झालें, तरी कर्मकांड ज्ञानांगत्वानें चालावे हें योग्य असतां, तें प्राधान्यानेंच चालू झालें, व वेदविरुद्ध अनेक उपासना प्रवृत्त झालेल्याहि तशाच राहिल्या असें पाहून, स्वत: ईश्वर शंकराचार्य या नांवाने पृथिवीवर आला, व त्यानें शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य आणि सौर इत्यादिकांचीं आगमोक्त मतें खंडित करुन व मंडनमिश्राचीहि खोढ जिरवून, श्रुतिप्रतिपाद्य कर्म, उपासना व ज्ञान, यांची यथायुक्त स्थापना केली व आपलें मत शुध्दाद्वैत अशा नांवानें सर्वत्र चालू केलें. *''
एवंच भारतीयांस ऐतिहासिक भावना होती ती विजयांचा उल्लेख करणें, राजवंशावली रक्षण करणें, जगाच्या क्रमाविषयीं नियम बांधणे, अनेक समूहांच्या युध्दादि क्रिया यांचे परिणाम जाणणें, राजनीतिव्यवहाराचे नियम प्राप्त करुन घेणे या प्रकारच्या प्रयत्नांत दृश्य होते. ज्यांनी गुरुपरंपरा कायम राखल्या, निरनिराळया काळचे ग्रंथ दुस-या कोणत्याहि राष्ट्रापेक्षां अधिक जतन करुन ठेवले आणि ग्रंथांमध्यें जे फेरफार होत, जे आवृत्तिकार निघत त्यांचा इतिहास फार काळजीनें जतन केला, त्या लोकांनी संस्थानाच्या उत्कर्षापकशाच्या इतिहासाविषयीं अत्यंत उदासीन रहावें याचें. कारण काय असावें ? हें औदासीन्यकारण समजण्यास ज्या काळांत भारतीयांचें इतिहासपुराणरुपी वाड्:मय तयार झालें त्या काळच्या सामाजिक व बौद्धिक परिस्थितीचीं कांही अंगें लक्षांत घेतलीं पाहिजेत. सामाजिक व राजकीय परिस्थितिच अशी होती कीं, राज्यांच्या उलाढालीविषयीं सामान्य लोकांस तशीच तत्त्ववेत्त्यांस अनस्था असावी. कोणता राजा आला आणि कोणता राजा गेला याचें महत्त्वच प्राचीनांस फारसें नसावें. मेगास्थिनिस साक्षी देतो की, शेतकरी, भोवताली जरी राज्यक्रान्ति होत असली तरी आपलें शेत संथपणें नांगरीत होते आणि कदाचित् चौकशी केली तरी कुतूहलवृत्तीनें करीत कीं, लढाई कोणाची व कशाबदल चालली आहे. ज्याप्रमाणें एखाद्याचें दुकान मोडून दुस-या कोणाचें दुकान आलें ही क्रिया झाल्यामुळें सामान्य जनांत फारशी खळबळ होत नाहीं, त्याप्रमाणेंच बंदोबस्त ठेवण्याचा धंदा जी पेढी करते त्या पेढीची मालकी या घराण्यांतून त्या घराण्यांत गेली तर त्याचें महत्व तें काय ? एखाद्या पेढीवाल्यानें आपल्या शाखा पन्नास ठिकाणीं उघडल्या आणि अधिक ठिकाणांचा बाजार काबीज केला तर त्याचें एखाद्या कवीस जेवढें महत्व तितकेंच बंदोबस्त ठेवण्याचा धंदा करणा-या पेढीचा व्याप वाढला असतां त्यास महत्व. आजच्या यूरोपीय लोकांस प्राचीन काळीं दोन राजघराण्यांमधील भांडणाबदल सबंध राष्ट्रानें लढावयास उठावें हा प्राचीनांच्या रानटीपणाचा मासला वाटत नाहीं काय ? एक संस्कृति स्थिर झाली आणि राष्ट्राचें महत्व सार्वराष्ट्रीय संस्कृतीच्या विकासामुळें कमी झालें म्हणजे राष्ट्राराष्ट्रांतील लढाया देखील अधिक निरर्थक होणार नाहींत काय ? अर्वाचीन जगास प्राचीन भारतीयांच्या राष्ट्रविषयक अनास्थेविषयीं नीट समज पडण्यासाठी सर्व जग एका संस्कृतीनें व्यापिलें आहे आणि जवळ जवळ सारख्याच व्यवहारनियमांनी बद्ध आहे अशा परिस्थितीची कल्पना करावी लागेल. ही कल्पना त्यांस आली म्हणजे राष्ट्राच्या उत्कर्षापकर्षाविषयीं अनास्था कशी उत्पन्न होणें शक्य आहे आणि त्यामुळें संस्थानाचे इतिहास लिहीत बसणें ही किती कमी महत्वाची गोष्ट होते याची कल्पना येईल.
आतां व्यापारी मनु आला आहे, आणि त्यामुळें जीं व्यापारी घराणीं मोठाले व्याप करितात त्यांचे इतिहास तयार होऊं लागले आहेत. अमेरिकेंतील मोठमोठया व्यापारी घराण्यांनी आपले पैसे कसे जमविले हें सांगणारे इतिहास दृष्टीस पडत आहेत. तसेंच मोठमोठया कंपन्यांचेहि इतिहास तयार होत आहेत.
राज्याच्या उलाढालींविषयीं लोकांची व लेखकांची अनास्था असण्याचें सामाजिक कारण वर सांगितलें. सामाजिक कारण हें या अनास्थेस एकच कारण होतें असें नाही. थर बौद्धिक कारण देखील होतें तें येणें प्रमाणें.
जेंव्हां इतिहासज्ञान तयार होतें तेंव्हां तत्त्ववेत्ता त्यापासून जगद्विवर्ताचे नियम काढूं लागतो, आणि आपल्या माहितीची मांडणी या नियमानुरुप करतो. अशा त-हेची मांडणी इतिहास, पुराणकारांनी केली आहे.
जेव्हां ज्ञानाचें एकीकरण करण्याचा प्रयत्न होऊं लागतो, तेव्हां बरेंचसें ज्ञान थोडक्यांत कसें आणावें हा विचार उत्पन्न होऊं लागतो. रक्षणीय काय ? बारीकसारीक भानगडींची बाडें अगर तत्वें ? या दोहोंत तत्त्वें रक्षणीय हें कोणीहि कबूल करील. तत्त्वें म्हणजे कोणतीं ? तर कार्यव्यवहाराचे नियम. ते जतन करण्यासाठी प्राचीनांनी आस्था थोडी थोडकी दाखविली नाही. जगांत जेव्हां एखादें राष्ट्र उत्कर्षापकर्ष पावतें आणि त्यांत जे उत्कर्षापकर्षाचे नियम दिसून येतात तेच इतर राष्ट्रांच्या उत्कर्षापकर्षांतहि दिसतात, आणि त्यामुळें ज्ञानेच्छूस एकाच संस्कृतींतील अनेक राष्ट्रांच्या भनागडींचें ज्ञान खरोखर अनवश्यक आहे. असो.
प्राचीन काळच्या इतिहासकारांना ज्या गोष्टी रक्षणीय वाटल्या त्या व त्यांत त्यांनी जी ऐतिहासिक दृष्टी दाखविली ती येणेंप्रमाणें.
प्राचीनांच्या दृष्टींनीं इतिहासामध्ये ज्या एका मोठया गोष्टीचें स्पष्टीकरण केलें पाहिजे अशी मोठी गोष्ट ''सर्ग'' म्हणजे विश्वाची उत्पत्ति मानली आहे.
त्यांच्या दृष्टीनें इतिहासविषय अशी दुसरी मोठी गोष्ट म्हटली म्हणजे मानवांचे मोठे वंश आणि त्यांची कार्ये होत.
आणखी त्यांच्या दृष्टीनें मोठी इतिहासविषय अशी गोष्ट म्हटली म्हणजे कालाचे मोठमोठे विभाग पाडणें होय. हे विभाग असे असावे की, एकंदर सर्वच समाजव्यवस्था अगर जगद्व्यवस्था जेव्हां पालटेल तेव्हां तो महत्वाचा भाग समजावा. या दृष्टीनें या कालाचा स्थित्यंतरवाचक शब्द त्यांनी मन्वंतर हा योजला आणि तो एक महत्वाचा इतिहासविषय धरला.
या सर्व कल्पना ख-या ऐतिहासिक भावनेस अनुसरुन नाहींत असें कोण म्हणेल? इतिहासाची पुराणकारांच्या दृष्टीइतकी व्यापक कल्पना आज आपण करुं लागलों आणि इतिहास लिहिला तर त्या इतिहासाचें बाहय स्वरुप आजच्या पाश्चात्त्य इतिहासाच्या पुस्तकापेक्षां इतकें भिन्न होईलं कीं, तो तत्त्वज्ञानाचा किंवा वेदांताचा ग्रंथ आहे असेंच लोकांस वाटेल.
पुराणांतून ज्या इतिहासविषयक कल्पना आपणांस दृष्टीस पडतात, त्या साधारणपणें अधिक प्रगत काळच्या आहेत. पुराणकर्त्यांनी अनेक राष्ट्रांचे उदय व अस्त पाहिले होते आणि त्यांस पृथ्वीच्या विस्तीर्णपणाची कांही कल्पना होती. पुराणांतून दधिसमुद्र मधाचे समुद्र इत्यादि कल्पना आहेत, त्यांवरुन पुराणकारांचा हेतु बाष्कळ लिहिण्याचा होता असें खास म्हणतां येत नाहीं. ग्रीक इतिहासकारांनी घोडयाच्या तोंडाचे लोक, सोनें जमा करणार्या मुंग्या इत्यादी भाकडकथा लिहून ठेवल्या नाहीत काय ? ज्याप्रमाणें धर्मराजास सोनें आणून देणा-या महाभारतोक्त पिपीलिका नांवाच्या राष्ट्राचें सोनें जमा करणा-या मुंग्यांमध्यें ग्रीकांनी पर्यवसान केलें त्याप्रमाणें बाहेर देशाच्या माहितीसंबंधानें तिखटमीठ लावलेल्या कथा पुराणकारांच्याहि कांनी आल्या नसतील काय ? आल्या असल्यास त्यांनी ग्रंथांत निर्देश केला तर ते प्राचीन ग्रीक भूगोलवेत्त्यांपेक्षां अधिक प्रमादास्पद खास होत नाहींत.
वरील विवेचन भारतीयांस इतिहासभावनेचा अभाव होता या कल्पनेची असत्यता दर्शवील व हेंहि दाखवील की, त्यांची ऐतिहासिक भावना अधिक व्यापक व कमी सूक्ष्म होती. व्यापक भावनेनें जें वाड्·मय तयार झालें त्याच्या बरोबर कांही सूक्ष्म भावनेनें जें तयार झालेलें वाड्:मय वाढलें नसेलच असें म्हणवत नाहीं. पण तें असलें तरी नष्ट झालें असावें असें दिसतें. इतिहास या शास्त्राकडे भारतीयांचे लक्ष कितपत होतें, कालक्रमविषयक म्हणजे ''फिलॉसफी आफ हिस्टरी'' या सदरांत घालतां येतील असे सिध्दांत त्यांजपाशीं होते किंवा नव्हते याविषयीं माहिती कालानुक्रमानें देण्यास अवकाश नाहीं. तथापि, हे सांगतां येतें कीं, प्रत्येक काळांत असे ग्रंथ निर्माण झाले आहेत कीं, जे ग्रंथकारांमध्यें पूर्वकथांचें सिंहावलोकन करावयाची बुद्धि, आणि त्या कथांपासून निघणारे जगत्क्रमविषयक सिध्दांत आणि त्या सिध्दांतांवरुन जगाचा हेतु याविषयीं विचार नेहेमीं चालू असे असें दाखवितात. व्यक्ति ज्या क्रिया करते त्या क्रिया कांही विशिष्ट सृष्टिविकासनियमांनी बद्ध असतात आणि मोठया म्हणजे अवतारी मनुष्याकडून होणा-या प्रत्येक क्रियेला अंतिम हेतु असतो. या त-हेचा विचार ज्या लोकांत फार दृढपणें आहे त्या लोकांस इतिहासभावना नाहीं असें कसें म्हणतां येईल ?
खराखुरा इतिहास मिळविण्याचा प्रयत्न करणें ही क्रिंया फार दूरची आहे. असा कोणताहि काळ नाहीं कीं ज्या काळांतील ''इतिहासकारांनी,'' ज्याची माहिती नाहीं त्याची माहिती वस्तुस्थिति कशी असावी यासंबंधानें कल्पना करुन घातली नाही. संशोधन करतांना तरी अगोदर काय असावें यासंबंधानें कल्पना करुन साहित्य जुळवावें लागतें आणि साहित्यानुसार ती कल्पना तपासावी लागते. प्राचीनांनी इतिहास कसा असावा यासंबंधाने आपली कल्पना लिहिली त्या क्रियेंत आणि आजच्या संशोधकाच्या क्रियेंत मुख्य फरक हाच की, त्याची कल्पना साहित्याभावानें अनियंत्रित होती यामुळें आपणांस प्राचीन लोकांस इतिहासभावना नव्हती असें वाटतें. अधिकाधिक साहित्यानें पूर्वीच्या कल्पना दुरुस्त करण्याचा प्रयत्न नेहेमींच होत असतो व झाला पाहिजे. हीच वृत्ति पुराणग्रंथ वापरतांनाहि ठेवावी. प्राचीनांच्या ग्रंथांत देखील कांही ग्रंथांत ऐतिहासिक भावना कमी, कांहींत अधिक असा प्रकार आहेच. वेदांत आपणांस ऐतिहासिक भावना फारच थोडी दिसते. वेदामध्यें जगाच्या विवर्ताविषयीं विचार सांपडतात. पण वंशविषयक ज्ञानाची व्यवस्थित मांडणी करण्याची भावना त्यांत दिसत नाही. आणि कोणत्या तरी ऐतिहासिक किंवा विवर्तविषयक तत्त्वाची इतर गोष्टींशीं जुळणी करण्याची खटपट त्यांत केली नसल्यामुळें आपल्या हातीं खराखुरा कच्चा माल आलेला आहे. तो माल आजच्या इतिहासकारास अधिक उपयुक्त आहे.सृष्टी उत्पन्न कशी झाली, निरनिराळे वंश किंवा मनुष्यप्राणी यांची उत्पत्ति कशी झाली यांविषयीं धाडशी विचार वेदांत दृष्टीस पडतात, पण युगें, मन्वंतरें यांच्या कल्पना वेदांत दिसत नाहीत. पुराणें आणि वेद यांतील विचारांमध्यें थोडीशी सरुपता आहे, पण पुराणांतील विचार अधिक व्यापक आहेत. वेदांमध्यें सृष्टीची, ता-यांची, मानवजातीची, पशुपक्षांची उत्पत्ति कशी झाली याविषयींचें त्यांचे मत सांपडतें.
येथें पुराणांतील कथा देण्यांत तात्पर्य नाहीं, कारण कथा द्यावयाच्या म्हणजे एकमेकांशी विरोध असलेली कथानकें पुढे मांडावयाची. या कथानकांमध्यें कांही अंश मात्र थोडासा लक्षांत घेण्याजोगा आहे. तो अंश म्हटला म्हणजे संस्कृतीचा विकास झाला यासंबंधी पुराणकारांनी आपलीं व्यक्त केलेली मतें होत आज अर्वाचीन समाजशास्त्रज्ञ ज्या प्रकारची संस्कृतिविकास-विषयक विचारमालिका पुढें आणितात त्या प्रकारची विचारमालिका पुढें आणण्याची हुक्की पुराणग्रंथांच्या लेखकांसहि येत होती असें विष्णुपुराणावरुन दिसतें. मानवी मनोविकारहीन समाजस्थितींत शासनसंस्थेचा अभाव हें मत अठराव्या, एकोणिसाव्या शतकांतील मोठया यूरोपीय तत्त्ववेत्त्यांच्या ग्रंथांत सांपडतें. त्याअर्थी पुराणकारांच्या कल्पना जर जंगली म्हणावयाच्या तर असल्या प्रकारच्या कल्पना अठराव्या, एकोणिसाव्या शतकांतहि यूरोपांत प्रचलित होत्या ही गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे. पुराणग्रंथकारांना भोंवतालचीं राष्ट्रें व मोठमोठी घराणीं यांचा इतिहास आणि जगदुत्पत्तीचा काल यांच्यामध्ये असलेलें खिडार भरुन काढण्याची प्रबल इच्छा असावी असें दिसतें. आणि त्यांच्या काळीं जी दंतकथात्मक माहिती उपलब्ध असेल ती त्यांनी कसेंबसें हे खिंडार भरुन काढण्याकरितां लावली असावी. ज्या काळांत वरील प्रकारचा मजकूर लिहिला गेला त्या काळांत एखादा अर्वाचीन चिकित्सक बुद्धीचा लेखक असता तर तो एवढेंच करिता कीं, सध्यांचे प्रयलित वंश अमुक आहेत असें लिहिता, प्राचीन वंशाविषयींचा माल अमुक अमुक आहे म्हणून मांडता व अत्यंत प्राचीन काल आणि त्या मनुष्याचा काल यांमधील खिंडार भरुन काढतां येत नाहीं म्हणून म्हणता आणि त्या मधल्या कालाविषयीं ज्या कांही दंतकथात्मक वंशावळया उपलब्ध असतील त्या पुढें मांडता आणि कदाचित् त्या जोडण्याचाहि प्रयत्न करिता. फरक एवढाच झाला असता कीं ‘असें असेल ना,’ ‘अशी कल्पना होते,’ 'आम्ही हें सुचवितों' आणि 'विरुद्ध पुरावा सांपडेपर्यंत आम्ही अमुक अमुक गृहीत धरतों' अशा वाक्यांची रेती वंशरुपी विटा जोडणा-या कल्पनांच्या चुन्यांत मिसळता, आणि आपण अत्यन्त सावध लेखक म्हणून म्हणवून घेता.
इतिहासविषयक लेखांत नेहमी एक लक्षांत ठेवलें पाहिजे की चिकित्सक बुद्धि ही इतिहासकाराच्या कल्पनेस नियंत्रक आहे हे खरें; परंतु चिकित्सक बुद्धि इतिहासज्ञान देऊं शकत नाहीं. इतिहासकारास दुव्वे जोडावयाचे असतात आणि संबंध शोधावयाचे असतात. चिकित्सकाचें 'नेदं नेदं' करुन चालतें आणि त्यास नेदं याचेंच उपर्बृहण करणारा लेख सजवितां येतो; परंतु संगति लावणें, सांधे जोडणें, काय झालें असेल याच्याबदल कल्पना करणें आणि मांडणें हीं कामें इतिहासकारास करावीं लागतात. म्हणजे इतिहास लिहितांना कल्पनेसच पुढें ढकलावें लागतें, आणि त्याच्या कल्पनेनें तो जो सांधा जोडील तो सांधा चिकित्सकाच्या बुद्धीनें तपासावा लागतो. असो.
पुराणांतील सर्व वंशावळी निरुपयोगी आहेत काय ? नाहींत, असें अलीकडे थोडें मत होऊं लागलें आहे. त्या मताचें संयोजक फल आम्ही पुढें देऊं. पुराणांचें व प्राचीनांच्या इतिहासवाड्·मयाचें महत्व आम्ही फार मोठें समजतों. वेदांच्या पूर्वीच्या कालापासूनचा इतिहास पुराणवाड्·मयांत लपला आहे असें आमचें मत आहे. वेद हे सर्वांत प्राचीन भारतीय ग्रंथ आहेत हें खरें, परंतु सर्वस्वी प्राचीन माहितीचे संग्राहक ते खास नाहींत. ॠग्वेदांतील बरचिंशी सूक्तें दाशराज्ञयुध्दाशीं समकालीन किंवा नंतरची आहेत. दाशराज्ञयुध्दामध्यें पुरु, यदु, तुर्वश, अनु, द्रुहुय इत्यादि राष्ट्रें आपलें स्वतंत्र अस्तित्व दाखवितात. हें युद्ध ज्या वेळेस इकडे होत असेल त्या वेळेस बहुतेक हिंदुस्थान रिकामा नसून अगोदरच व्यापलेला असावा आणि तो बहुतकरुन आर्यन् महावंशाच्या राष्ट्रांनी व्यापला असावा असें दिसते. ॠग्वेदांत आर्यन् लोकांनीं हिंदुस्थान व्यापिल्याचा इतिहास खास नाहीं. आर्यन् महावंशाची भरतखंडांतील वसाहत ही ॠग्मंत्रपूर्वकालीन आहे. दिवोदास व सुदास यांस परुष्णीतीरापर्यंत जो प्रदेश आक्रमावा लागला तो पूर्वी सपूरोहित वसलेल्या राष्ट्रांशी निकराची मारपीट करीत आक्रमावा लागला त्या काळांत हिंदुस्थानांत अनेक राष्ट्रें होती व ती आपली पूर्वपीठिक बरीच जतन करुन ठेवीत होतीं. आणि त्यांचे वाड्·मय जरी तयार नसलें तरी पूर्व कालच्या आठवणींचे रक्षण तीं करीत होतीं. म्हणजे हिंदुस्थानचा इतिहास लिहावयाचा म्हणजे ॠग्मंत्रपूर्व कालापासून प्रारंभ करावयाचा ही गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे. वेदपूर्वकालाचा इतिहास विश्वोत्पत्तीपासून इतिहास सांगण्याचा बाणा बाळगणा-या पुराणवाड्·मयांत लपला आहे काय हें आपणांस पाहिलें पाहिजे.
एवंच भारतीय इतिहास आपणांस फार प्राचीन काळापासून उपलब्ध आहे आणि भारतीयांनी त्यास लागणारें साहित्यहि जपून ठेवलें आहे अशी आपली खात्री होते. आतां आपलें यापुढील कार्य हे आहे कीं, अत्यंत प्राचीन काळापासून सुरुवात करुन आजच्या कालापर्यंत इतिहाससूत्र ओढीत आणावयाचें. हें करण्यासाठीं आपणांस कोणत्या गोष्टींचें सहाय्य मिळेल हें पाहिले पाहिजे.
जगाच्या इतिहासाचे आपण प्रथमत: दोन भाग करुं (१)बुद्धपूर्वकाल.(२) बुद्धोत्तरकाल.
या विभागांचे महत्व असें आहे कीं, सर्व जगाचा बुध्दापूर्वीचा इतिहास अंधुक स्थितींत आहे. बुध्दोत्तर इतिहास बराच निश्चित आहे. सर्व जगाशीं ज्या गोष्टीचा अत्यंत प्राचीन काळीं संबंध आला अशी संस्था म्हणजे बौद्धसंप्रदाय होय. बुद्धपूर्वकाल म्हणजे विस्कळित मनुष्यसमुच्चयांचा काल, बुध्दोत्तरकाल म्हणजे परस्परांशीं संबद्ध मनुष्यसमुच्चयांचा काल.
बुद्धपूर्वकालमध्यें देखील विशिष्ट संस्कृतीस प्रारभ होण्यापूर्वीचा आणि विशिष्ट संस्कृति उच्च प्रकारें सुरु झाल्याचा असे दोन भाग पडतील. असुरराष्ट्रस्थापनेपूर्वी कोणतीहि विशिष्ट संस्कृति संवर्धित झाली होती अस आजपंर्यतच्या माहितीवरुन म्हणतां येत नाहीं. यासाठीं प्रथम विश्वोत्पत्तिकालापासून असुरराष्ट्रसंस्थापनेच्या कालाचा इतिहास कितपत जुळवितां येतो हें पाहूं.