प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.
राजघराणीं. - सर्व क्षत्रियवर्ग देव अगुंगचा वंशज म्हणवितो. बलिद्वीपांतील पहिला देव अगुंग कोण होता याबद्दल उशना जावामध्यें कांहीं माहिती आढळत नाहीं. त्याचें नांव देव अंगुग क्तुत असावें असा अन्यत्र उल्लेख सांपडतो. रॅफल्स यानें तेंच नांव दिलें आहे. तबनन आणि बदोंग येथील राजे आर्य दमर याचे वंशज आहेत. बलिद्वीपांत सध्यां (१८४९-५०) निरनिराळीं ७ घराणीं निरनिराळ्या प्रांतावर राज्य करीत आहेत. त्यांचे सध्यांचे राज्यकर्ते प्रदेशवार येणेंप्रमाणें आहेत. (१) क्लोंगकोंग-देव अगुंग ग्दे पुत्र; हें सर्वांत लहान राज्य असून सधनहि नाहीं. (२) ग्यानयर-देव पहन, हा इ.स. १८४७ सालीं मृत्यु पावलेल्या देव मंगिसचा पुत्र होय. (३) बंगलि-देव ग्दे पुतु तंग्केबन. (४) मेंगुई-अनक अगुंग क्तुत अगुंग. (५) करेंग असेमन्ग्रुरः ग्दे करेंग असेम; हा पतिः गजमद याचा वंशज आहे. या राज्याची स्थापना पतिः गजमद यानेंच केली. (६) बोलेलेंग-न्ग्रुरः मदे करेंग असेम. (७) बदोंगर्या राज्यांत तीन निरानिराळें स्वतंत्र राजे आहेत. (अ) न्प्रुरः ग्दे पंचुत्तन; (आ) मदे न्ग्रुरः (देन पस्सरमध्यें); (इ) न्ग्ररः ग्दे (कस्सिमनमध्यें) यांपैकीं बदोंग येथील मूळ राजघराणें व कलेरनपासून पुढें देन पस्सरमध्यें राज्य करणारें घराणें यांची वंशावळ पुढें दिली आहे.
बदोंग येथील राजघराणे | कलेरन वंशावळ - देन पस्सर |
करेंग असेम, बोलेलेंग, मेंगुइ आणि लँबाक येथील राजघराणीं पतिः गजमद यापासून आपली उत्पत्ति सांगतात. ज्या कालीं मयपहित येथील यावद्वीपांनीं बलिबेट जिंकले तेथपर्यंत ऐतिहासिक माहिती जुळविण्यांत येतें. उशना बलिग्रंथांत असें म्हटलें आहे कीं बलिद्वीप पूर्वी भुताखेतांच्या व राक्षसांच्या ताब्यांत होतें आणि तेथें मय दानवाचा पराभव होऊन सध्याची लोकवस्ती स्थापित झाली. आर्य दमर व पतिः गजमद यांस बलिद्वीपांतील बंडे मोडण्यास मयपहित येथून पाठविण्यांत आलें. आर्यदमर उत्तर दिशेस गेला व दुसरा दक्षिणेकडे गेला. जेव्हां आर्य दमर हा मयपहित येथें होता तेव्हां त्यास असें कळलें कीं मयदानव हा बलिद्वीपास त्रास देत आहे. तेव्हां मयपहितचा राजा आर्य दमरसह सैन्य घेऊन निघाला व राक्षस आपला पराभव झाला असें पाहून आकाशांत उडून पळून गेला.