प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.

समाजव्यवस्थाः - समाजांत चार वर्ण आहेत ही भावना बलिद्वीपांत अजूनहि आहे. चातुर्वर्ण्य तेथें भारतीय समाजापेक्षां अधिक प्राचीन स्वरूपांत सांपडतें व तें चातुर्वर्ण्याच्या मूळकल्पनेस धरून आहे. चार वर्ण हेच समाजाचे वर्ग आहेत त्यांकडे लक्ष द्यावयाचें आणि जातींकडे लक्ष द्यावयाचें नाहीं ही भावना तेथें आज जितकी स्पष्ट आहे तितकी भारतीय समाजांत नाहीं. आपलेकडे चार वर्ण नसून दोनच वर्ण आहेत ही कल्पना वाढली आणि वर्णविषयक भावना प्रज्वलित होऊन जातिविषयक भावनांस दुर्बल करावयाची क्रिया झाली नाहीं. आपलेकडे वर्ण म्हणजेच जाती ही कल्पना लोकांच्या डोक्यांत शिरून धर्मशास्त्रांतर्गत तत्त्वांस बाजूस ठेवण्याचें कार्य करीत आहे.

  मन्वादि धर्मशास्त्रकारांनीं उपदेशिलेलें आणि बलिद्वीपांत चालू असलेलें चातुर्वण्य यांत मुख्य फरक हाच आहे कीं ब्राह्मणादि वर्णांनीं खालच्या वर्णाच्या स्त्रियांशीं लग्नें लाविलीं तर त्यांच्या पुत्रांचा वर्ण बापाच्या वर्णाहून निराळा आहे असें धर्मशास्त्रकार सांगतात. बलिद्वीपांतील रिवाजाप्रमाणें त्यांचा वर्ण बापाचाच जो असेल तो राहतो. ब्राह्मण किंवा क्षत्रिय वर्णाच्या स्त्रियांनीं खालच्या वर्णांच्या पुरुषांबरोबर प्रेमसंबंध जुळविला तर दोघांसहि मृत्यूची किंवा मृत्युकल्प शिक्षा होते. नेपाळांत ब्राह्मण आणि वैश्या यांच्या पुत्रास क्षत्रियत्व प्राप्‍त होतें. या दोन टोंकांच्या दोन नियमांवरून अशी शंका येते कीं ब्राह्मण व इतर वर्णांच्या स्त्रिया यांच्या लग्नापासून झालेल्या संततीस कसें काय लेखावें या संबंधाचें मत सर्वमान्य तरी नव्हतें किंवा ग्रंथकाराचा मिश्रविवाहाच्या संततीची व्यवस्था लावण्याच्या हेतूपेक्षां नवीम ठाऊक झालेल्या जातीच्या उत्पत्तीसंबंधाचें इतर स्पष्टीकरणाच्या अभावीं कांहीं तरी स्पष्टीकरण द्यावयाचें असा इरादा होता.

वर्णानुक्रमानें समाजांत पदवी जावामध्यें प्राचीनकाळीं होती हें उघड आहे. बलिद्वीपांत अजूनहि ती आहेच. व्यक्तींचें पुष्कळ लहानसहान बाबतींत वर्णविशिष्ट समाजांतील स्थान शिष्टसंप्रदायांच्या नियमांनीं व्यक्त होतें.

बलिद्वीपामध्यें ब्राह्मण ज्या खालच्या जातींचा तिरस्कार करितात त्यांत मुसुलमानी संप्रदाय वाढत आहे असें कॅबॅटन म्हणतो. आणि तेथील ब्राह्मण ब्राह्मणेतर जातीच्या स्त्रियांशीं लग्नें करीत असल्यामुळें समाजाचें एकीकरण व्हावयास बरीच मदत झाली आहे असेंहि सांगतो.

भारतीय संस्कृतीचा यवद्वीपांत जो प्रसार झाला, तो केव्हां झाला, आणि कोणी केला, आणि कोणत्या प्रयोजनामुळें झाला हे प्राचीन यावद्वीप संस्कृतीच्या अभ्यासांतील पहिले प्रश्न होत. आणि ते प्रश्न सोडविण्यासाठीं आपणांस त्यांच्या भारतीय संस्कृतीच्या आणि मुख्य भारतीय संस्कृतीचा तौलनिक अभ्यास केला पाहिजे. त्या तौलनिक अभ्यासाचीं (१) भाषेचें परीक्षण (२) ग्रंथांची तुलना (३) आचारांची व उपास्यांची तुलना (४) समाजव्यवस्थेची तुलना हीं उपांगें आहेत.