प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.

राजधानींतील घरांची व्यवस्था.- राजवाड्याच्या उत्तरेच्या वेशीजवळ राजसंरक्षक व उच्च दर्जाचे क्षत्रिय रहात असत. दक्षिणेकडच्या दरवाजाजवळ क्षत्रिय व पंडित यांचे वाडे असत वायव्येस व पश्चिमेस प्रमुख मंत्र्यांच्या इमारती असत. इतरांची घरें दक्षिणेकडे असत.

शहरांतील घरांची व्यवस्था अशी होती. पूर्वेकडील शैव ब्राह्मणांची वस्ती असून  ब्रह्मराज हा त्यांत प्रमुख होता. दक्षिणेकडे बौद्धांची वस्ती होती. त्यांत स्थविर रेंग्कन्न्दि हा संघांतील प्रमुख होता. पश्चिमेकडे क्षत्रिय, मंत्री व राजाचे आप्‍त यांची वस्ति होती. राजवाड्याच्या दक्षिणेकडे धर्माध्याक्षाची सुंदर इमारत होती. तिच्या पूर्वेस एक भव्य शैवमंदिर होतें. पश्चिमेकडे एक मोठें बौद्धमंदिर होतें.