प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.
शूद्र.- शूद्रांवर मात्र बर्याच कामांची सक्ति असून त्यांनां हक्क मुळींच नाहींत. राजा अथवा पुंगव यांनां शूद्रांच्या घरांतून वाटेल ती वस्तु नेण्याचा हक्क आहे. प्रबकेल, पम्बकेल आणि पर्बकेल या जाती शूद्रांपेक्षां वरच्या दर्जाच्या आहेत. हाच दर्जा यूरोपीय लोकांसहि देण्यांत आला आहे, परंतु त्यांचें स्थान वरील तीन जाती आणि शूद्र यांच्या दरम्यान आहे, कारण ते द्वीज नाहींत.
बलिद्वीपांतील शूद्र ही जावा व बलिद्वीपांतील शूद्रांची संतती आहे. जावांतील शूद्रांचा वर्षारंभ बलिद्वीपांतील शूद्रांपेक्षां सहा दिवस लवकर होतो पण राजदरबारांत बलिवर्षारंभच मान्य आहे.
बलिद्वीपांत सर्वच जाती एकएक पायरी खालीं आल्या आहेत. मूळ ब्राह्मणांची उत्पत्ति पादण्ड दंग ह्यंग कपकिसन यापासून झाली व त्याच्या शापानेंच ते क्षत्रिय बनले व खालचे सर्व वर्ग एकएक पायरी खालीं आले असें म्हणतात.
ब्राह्मण ब्राह्मणत्वापासून चुने (च्युत) होतो तरी त्याला (ब्राह्मणच्युताला) बराच मान मिळतो.
शूद्रांचे पौरोहित्य सामान्य पुरोहित किंवा शूद्रांतील वेद जाणणारे ‘संग्गहु’ हे करितात. या संग्गुहूनां जर वेदांचें ज्ञान खरोखरीच असेल तर हे पूर्वीं ब्राह्मण असले पाहिजेत. उशना जावामध्यें असें म्हटलें आहे कीं संग्गुहु यांची उत्पत्ति ब्राह्मणब्राह्मणीपासूनच झाली परंतु ते दलेम मुर नांवाच्या कालदेवतेची उपासना करूं लागले म्हणून त्यांचा दर्जा हलका समजूं लागले. परंतु हल्लींच ब्राह्मण असें म्हणतात कीं हे लोक एका पादण्डाच्या दासाची संतति आहेत. त्या दासानें एकदां लपून बसून वेद ऐकले. पुढें त्या पादण्डानें त्याला स्वातंत्र्य दिलें व त्याची संतति हे संग्गुहु लोक होत.
शूद्र जातींवर उच्च जातींचा विशेषतः अधिकारी वर्गाचा जुलुम फारच होतो. या जुलुमापासून सुटका करून घेण्याचा एकच मार्ग म्हणजे राज्यांतून पळून जाणें. पण दुसर्या राज्यांतहि त्यांच्यापुढें तेंच दुःखाचें ताट वाढलेलें असतें. त्यांच्याबरोबर जर बायकापोरें नसलीं तर राजे लोक त्यांस कोणास तरी विकून टाकून पैसे काढतात. या संकटांपासून बचाव करून घ्यावयाचा उपाय म्हणजे एखाद्या पादण्डाचा आश्रय करावयाचा. हे पादण्ड मात्र त्यांस बरेच मायाळूपणानें वागवितात व त्यांच्याकडे आश्रयार्थ आलेल्या शूद्रास विकण्याचा राजास अधिकार नाहीं. परंतु कांहीं तद्देशीय पादण्ड या संधीचा फायदा घेऊन शूद्रविक्री करून गबर होण्यास मागेंपुढें पहात नाहींत. रॅफल्स यानें बलिद्वीपांतील लोकांविषयीं असे उद्गार काढले आहेत, “हे लोक जावांतील लोकांपेक्षा जास्त प्रामाणिक, विश्वासू व श्रम करणारे आहेत; आणि ते इतर सर्व आजूबाजूंच्या लोकांपेक्षां शूर आहेत पण ते यूरोपीय लोकांस मात्र वाघाप्रमाणें भितात.”
बलिद्वीपामध्यें शालिवाहन शक चालू आहे व तेथें सण व उत्सव ठरविण्याच्या कामीं हिंदी पंचांगाचाच उपयोग करितात. त्यांचे महिने चांद्र असून वर्षारंभ इकडीलप्रमाणें मार्च महिन्यांतच बहुधा होतो. तथापि त्यांनां सौर वर्षाबरोबर मेळ बसविणें आंता ठाऊक नाहीं त्यांच्या महिन्यांच्या नांवांपैकीं जेष्ठ व आषाढ हीं इकडीलच आहेत. बाकींचीं क्रमवाचक संखाविशेषणें आहेत. इतर बाबतींत ते बलींतीलच एक निराळें पंचांग वापरतात. यांत ३५ दिवसांचा एक असे १० महिने आहेत म्हणजे हें सरासरी चांद्र वर्ष आहे.
राहूनें सूर्याला ग्रासिलें म्हणजे ग्रहण लागतें अशीच कल्पना आहे.
तेथें एक ‘वृग गर्ग’ नांवाचा करणग्रंथ आहे. परंतु त्याबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाहीं. गर्गसंहितेशीं या ग्रंथाचा कदाचित् कांहीं संबंध असेल.
यवद्वीपाची माहिती करून देणारे महत्त्वाचे आधारग्रंथ म्हटले म्हणजे पुढें दिलेले होत.
(१) Java, Sumatra and the other Islands of the Dutch East Indies. By A. Cabaton.
T. Fisher Unwin London. 1911.
(2) Encyclopaedie van Nederlandsch-Indie, By Dr. Paulus. The Hagne 1917.
(3) Beschrijving der Javaansche, Balineesche eu Sasaksche Handschriften, Two Vols. By Dr. J. Brandes. Batavia 1903.
(4) History of Java. By Sir. T.S. Raffles. 2 Vols. London 1897.
(5) Kawi-Balineesche-Nederlandsche Woordenbock. By Dr. H. N. Van der Tuuk. 4 Vols. Batavia 1897.
(6) An Account of the Island of Bali, By Dr. R. Friederich, in JRAS. N. S. Vol. VIII. Pp. 157-218; Vol IX. Pp. 59-120; Vol. X. pp. 49-97.
(7) Het oud-Javaansche Lofdicht Nagarkrta. gama Van Prapañca Van Prof. Dr. H. Kern. 1919. या ग्रंथाची प्रस्तावना चांगली आहे व महत्त्वाच्या टीपाहि आहेत.