प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.

यावद्वीप वाङ्‌मय.- चार वेद ऐकून ठाऊक-ब्रह्मांड-पुराण-तंत्रग्रंथ, तात्त्विक व शासनविषयक-कविरामायण-उत्तरकांड-महाभारत-पौराणिक इतर ग्रंथ-हरिवंश-मानव-धर्मशास्त्र-पौराणिक काव्यें-बाबद ग्रंथ, ऐतिहासिक, पौराणिक व काल्पनिक-लौकिक, काव्यें -नीतिशास्त्र-छंदःशास्त्र-कामशास्त्र-कलाकौशल्यावरील ग्रंथ.

बलिद्बीपांतील कविपाङ्‌मयावरील फ्रेडरिकची माहिती येणेंप्रमाणेः- तेथील पुरोहीतांच्या सांगण्यावरून बलिद्वीपांत चारी वेदांच्या संहिता पूर्ण नाहींत परंतु चारहि वेदांतील बराच आणि महत्त्वाचा भाग आहे. जावा बेटांतून हे पुरोहित आले तेव्हां जावामध्यें त्यांच्या पूर्ण संहिता असण्याचा संभव आहे अशी फ्रेडरिक याची समजूत होती. फ्रेडरिक यानें असें म्हटलें आहे कीं, हे सर्व वेदांचे भाग श्लोकबद्ध आहेत परंतु हें त्याचें विधान पुरोहितांच्या सांगण्यावरून केलेलें असून त्याच्या स्वतःच्या माहितीवरून केलेलें नाहीं, आणि तेथील पुरोहित वेदांस फार गुप्‍त ठेवतात व ते शिकवितांनाहि गुप्‍तपणाची फार काळजी घेतात. त्यांच्यां कांहीं भागावर बलि अथवा कविभाषेंतील टीका असावी असें दिसतें, असें फ्रेडरिक म्हणतो परंतु ज्याअर्थीं तेथील लोकांनां वेदंतील कांहिहि समजत नाहीं त्याअर्थी फ्रेडरिकचें वरील विधान चुकीचें असावें असें वेबरनें म्हटलें आहे. फ्रेडरिकला एका हस्तलिखित ग्रंथाची नुसती बाहेरील बाजू पहावयास सांपडली होती. त्या ग्रंथाचें नांव सूर्यसेवक असें असून त्यामध्यें सूर्योपासनेबद्दलचे वेदांतील मंत्र होते अशी त्यास माहिती मिळाली.

वेदाखालोखाल बलिमध्यें ब्रह्माण्डपुराण हा ग्रंथ आढळतो. याची एक पूर्ण प्रत फ्रेडरिक यास देण्यांत आली होती पण त्यांत अशी अट होती कीं त्यानें तो ग्रंथ अनधिकृत मनुष्यास दाखवितां कामा नये. बलिद्वीपांत भारतवर्षीय ब्राह्मणांतील फक्त एक पंथ (शैव) होता आणि त्यांचे जे पूर्वज प्रथम जावामध्यें आले त्यांनीं ब्रह्माण्डपुराण हाच आपला काय तो पुराणग्रंथ मानिला असावा, कारण त्यांनां अद्यापिहि इतर पुराणांचीं नांवें माहित नाहींत. बलिद्वीपांत पुरोहित हा ग्रंथ फार पवित्र मानतात व तो फार गुप्‍त ठेवतात. वेदाप्रमाणें या ग्रंथावरहि बलिभाषेंत टिका आहे.

ग्रंथमहत्त्वविषयक सोपानपरंपरेंत वरील ग्रंथांनंतर तुतुर अथवा तात्त्विक ग्रंथ (तन्त्न) येतात. यांचे दोन वर्ग आहेत. (१) पुरोहित वर्गाकरितां (२) इतर वर्णांकरितां, विशेषतः दुसर्‍या व तिसर्‍या वर्णाकरितां.

पहिला वर्ग. (१) बुवनसंक्षेप (२) बुवनकोस (३)बृहस्पतितत्त्व (४) सारसमुच्चय (५) तत्त्वज्ञान (६) कंदपत ( ?) (७) सजोक्त्नान्ति (८) तंत्रकमोक्ष.

दुसरा वर्ग. (१) राजनीति (२) नीतिप्रिय अ. नीतिशास्त्र (३) कामन्दकनीति (४) नरनाट्य (५) रणजन्य ( ? रणयज्ञ) (६) तिथिदशगुणित.

यानंतर संस्कृत ग्रंथांची कविभाषेंतील भाषांतरें येतात. त्यांत प्रथम रामायणाचें रूपांतर व इतर महाकाव्यांची रूपांतरें हीं येतात. यांतील रामायणाचें रूपांतर म्पोए तनकुंग  
(M’poe Tanakung) याचा पिता म्पोए राजकुसुम योगीश्वर (M’poe Rajakusum Yogis’vara) याच्या व ‘स्मरदहन’ काव्याचा कर्ता म्पु दर्मय (M’pu D’armaja) या कवीच्या हातून झालें. भारतीय रामायणांत ७ काण्डें आहेत परंतु कवि रामायणांत पहिल्या सहा कांडांतीलच मजकूर आहे व त्याचे २५ सर्ग केले आहेत. ७ वें उत्तरकाण्ड हें कथेचा भाग नसून ग्रंथ असून त्याचा कर्ताहि वाल्मीकिच आहे अशी समजूत आहे. बाकीच्या रामायणापासून हा भाग अलग राहिला आहे, यावरून तो भाग भरतखंडांतूनच रामायणाचा भाग म्हणून आला नसून निराळा ग्रंथ म्हणून आला असावा असें फ्रेडरिक याचें मत आहे. यावरून वेबरनें असें अनुमान काढलें आहे कीं, ज्यावेळीं जावामध्यें रामायणाचा प्रवेश झाला त्यावेळीं भरतखंडांतील रामायणास उत्तरकाण्ड जोडलें गेलें नव्हतें.

जावामध्यें कवि भाषेंतील रामायणाचें ‘रोमो’ या नांवाचें जावानी भाषेंतील रूपांतर काय तें अस्तित्त्वांत आहे, आणि तें भाषेच्या व लेखनशैलीच्या दृष्टीनें बरेंच कमी प्रतीचें असून बलिद्वीपांतील लोक त्यास अपभ्रष्ट समजतात. ‘रोमो’ हा ग्रंथ बहुतकरून मुसुलमानी काळांतील असावा व त्याची रचना झाली त्यावेळीं बहुतकरून धार्मिक बाबतींतील उत्साह बराच कमी झाला असावा; व त्यावेळीं जुनें उत्तम उत्तम वाङ्‌मय एकत्र करण्यांत आलें असावें परंतु कवि भाषा विसरून गेली असावी.

फ्रेडरिकनें जी कविरामायणांतील कथा दिली आहे ती मूळ भारतीय रामायणाशीं जुळतें. प्रथम विष्णु अयोध्येचा राजा दशरथ याच्या वंशांत अवतार घेतो. तो दशरथाची स्त्री कोसया इच्या पोटीं जन्म घेतो. त्याला कैकया इचा भरत आणि सुमित्रेचा लक्ष्मण हे सावत्र भाऊ असतात. त्याचा गुरु वसिष्ठ मुनि असून तो त्याला विशेषतः धनुर्वेद शिकवितो. तो लहान असतानांच राजर्षिकुळांतील (बलिद्वीपांतील राजघराणें राजर्षि या नांवाचें असून तें यापासूनच निघालें अशी तेथें समजूत आहे.) राजा विश्वामित्र यानें तो विष्णूचा अवतार आहे हें ओळखून आपल्या आश्रमाचें राक्षसांपासून रक्षण करण्याकरितां त्यास विनंती केली. रामानें त्याप्रमाणें करून परशुरामाचें धनुष्य वांकविलें. नंतर त्याचा सीतेबरोबर विवाह झाला. यानंतर कैकयीचीं आपल्या मुलास गादीवर बसविण्याबद्दलचीं कारस्थानें वर्णन केलीं आहेत. त्यानंतर राम आपण होऊनच ( ?) सीता व लक्ष्मण यांसह आश्रमांत जातो व तेथून दण्डकारण्यांत जातो. लक्ष्मण त्याच्यावर प्रेम करणार्‍या शूर्पणखा नांवाच्या राक्षसीस विद्रूप करितो व त्यामुळें तिचा भाऊ रावण याचा द्वेष संपादन करितो. रावण सीतेस पळवून नेतो व राम तिचा व्यर्थ शोध करितो. नंतर तो वानरांचा राजा सुग्रीव व त्याचा आप्‍त चपल हनुमान यांच्याशीं सख्य करितो. हनुमान सीतेस लपवून ठेवलेल्या जागेचा शोध लावतो. नंतर राम, त्याचें वानरसैन्य व लंकापुरांतील राक्षस यांचें युद्ध होतें. मधून मधून वानरांचे राजे आणि राम यांच्यामधील संभाषणें व राम आणि रावणाचा बंधु बिभीषण यांमधील संबंध याबद्दल हकीकत आहे. अखेरीस रावणाचा वध रामाकडून होतो. त्याच्या चक्रामुळें त्याचीं दहा शिरें तुटून पडतात. सीता अग्नीपासून शुद्ध होते व भूमातेच्या पोटांत जाते. राम अयोध्येचा राजा होतो व वृद्धपणीं अरण्यांत आश्रमांत रहाण्यास जातो, व तेथें निजधामास जातो.

उत्तरकाण्डामध्यें रामाच्या बंधूविषयीं कथा व इतर रामाच्या घराण्याशीं कांहीं संबंध नाहीं अशा अनेक कथा आहेत. या उत्तरकाण्डांतीलच कथाभाग घेऊन एक बराच अलीकडे कवि भाषेत ग्रंथ झाला आहे. त्याचें नांव अर्जुनविजय असें असून त्याचें वर्णन पुढें दिलें आहे.

कविवाङ्‌मय पुष्कळसें उपलब्ध आहे, परंतु या वाङ्‌मयाचा इतिहास लिहिणें शक्य नाहीं. कारण या वाङ्‌मयांतील बहुतेक ग्रंथ केव्हां रचले गेले व ते कोणीं रचले यासंबंधानें आज कांहींच माहिती नाहीं. कवि वाङ्‌मयांत ब्रत युद (भारतयुद्ध) या ग्रंथाला अग्रस्थान देणें उचित दिसतें. हें ‘ब्रतयुद’ काव्य वीरकाव्य असून यांत ‘डगस्तिन’ चे सिंहासनाबद्दल पांडल कौरव यांजमध्यें जें युद्ध झालें त्याचें वर्णन आहे. हें युद्ध महाभारताचीं पर्वें ५-१० यांत वर्णिलें आहे. आजचे जाव्हानी लोक हें काव्य जाव्हांतील रहिवाशांचेंच आहे असें मानतात. या काव्यांत ज्या वीरांचें व राजांचें वर्णन आहे त्यांचीं चरित्रें जाव्हानी लोकांच्या इतिहासांत प्रविष्ट केलीं असून आजच्या जाव्हानी खानदानी सरदार घराण्यांचे सदरील राजे व वीरपुरूष हेच मूळ पुरुष होता असें मानलें जातें. ‘ब्रतयुद’ या काव्यग्रंथापेक्षां जुना म्हणतां येईल असा कविवाङ्‌मयांतील ग्रंथ म्हणजे ‘अर्दजुनविवाह’ (अर्जुनविवाह) हा होय. इ.स. च्या ११ व्या शतकाच्या पूर्वार्धांत हा ग्रंथ रचला गेला असावा असें प्रो. कर्न यांचें मत आहे. नांवावरूनच हा ग्रंथ महाभारतापासून रचला गेला असला पाहिजे हें उघड होतें.

सगळ्यांत जुनें काव्य म्हणजे ‘कांड’ (परंपरा) हें असावें. या काव्याचा थोडासा अंश आज त्यांचें जें जावनीज रूपांतर आहे त्यावरून कळतो.

बलिद्वीपामध्यें महाभारताचें नांव अज्ञात दिसतें म्हणजे कदाचित् ज्या वेळीं ख्रिस्ती शकाच्या ५०० या वर्षाच्या सुमारास भारतीय लोक जावामध्यें आले त्या वेळीं भरतखंडामध्यें महाभारताचें नांव अज्ञात असण्याचा संभव आहे असें वेबर म्हणतो. परंतु महाभारताच्या कर्त्याचें नांव व त्याचीं १८ पर्वांची नांवें जावामध्यें माहित असून त्यांपैकीं ६ पर्वें पूर्ण होतीं व २ अर्धवट होतीं. त्या पर्वांचा अनुक्रम येणेंप्रमाणें होता. आदिपर्व (१) {kosh कंसांतील आंकडे भरतखंडांतील महाभारतच्या पर्वांच्या अनुक्रमाचे निदर्शक आहेत.}*{/kosh}  विराटपर्व (४) भीष्मपर्व (६) मुसलपर्व (१६) प्रस्थानिकपर्व (१७) स्वर्गारोहणपर्व (१८) हीं पूर्ण होतीं आणि उद्योगपर्व (५) आणि आश्रमवासपर्व (१५) हीं अर्धवट होतीं. तेथील पुरोहितांनीं बाकीच्या पर्वांचीं नांवें पुढीलप्रमाणें सांगितलीं- सभापर्व (२) आरण्यकपर्व (३) द्रोणपर्व (७) कर्ण (८) शल्य (९) गदापर्व ( ?) स्वतमपर्व (अश्वत्थामापर्व  ?) सौप्तिकपर्व (१०) स्त्रीपलाप (स्त्रीप्रलाप) (११) अश्वमेधयज्ञपर्व (१४) या बरोबरच त्यांनीं शांतीकपर्वा (शातिंपर्वा) चा उल्लेख केला. परंतु एकंदर पर्वें अठराच आहेत असें तेथील पुरोहितांनीं सांगितलें. शांतिपर्व हें भारतीय महाभारतांतील बारावें पर्व आहे; आणि भारतीय महाभारतांतील अनुशासनपर्वाचें नांव वरील यादींत दिसत नाहीं. वर दिलेल्या यादीतील नांवें बहुतेक भारतीयच आहेत. स्वतम हें अश्वत्थामा यांचें अपभ्रष्ट रूप असावें. गदापर्व हें महाभारताच्या कोणत्यांहि पर्वाला नांव दिलेलें आढळत नाहीं. गदापर्व हें शल्यपर्वांतील भीम आणि दुर्योधन यांच्या गदायुद्धाच्या कथाभागाला नांव दिलेलें असावें; आणि अश्वत्थामापर्व हें द्रोणपर्वांतील अश्वत्थाम्यानें केलेला नारायणस्त्रमोक्ष या कथाभागाला नांव दिलेलें असावें किंवा कर्णपर्वामध्यें अश्वत्थाम्यानें केलेला पाण्ड्य राजांचा पराजय या भागाला दिलेलें असावें. आपणाला गदापर्व हें एका पर्वाला नांव दिलेलें असावें असें म्हणतां येत नाहीं, कारण ज्या अर्थीं तेथील पुरोहितांस शांतिपर्व हें नांव ठाऊक होतें, त्या अर्थीं जावामध्यें शांतिपर्व अस्तित्वांत होतें हें उघड आहे. कदाचित् अश्वत्थामापर्व हें प्रथम स्वतंत्र पर्व असावें व पुढें अनुशासनपर्व अस्तिवांत आल्यानंतर पर्वांची १८ ही संख्या कायम ठेवण्याकरितां अश्वत्थामापर्व हें दुसर्‍या एखाद्या पर्वांत सामील करण्यांत आलें असावें; आणि बलिद्वीपांत अनुशासनपर्वाचें नांवहि ठाऊक नाहीं या गोष्टीवरून महाभारताचें जावांत आगमन झालें त्या वेळीं त्यांत अनुशासनपर्व नव्हतें असें म्हणण्यास हरकत दिसत नाहीं. बालभारतामध्यें हें पर्व आढळत नाहीं व तसेंच शांतिपर्वहि आढळत नाहीं; आणि त्या दोन्ही पर्वांत केवळ तात्त्विक विषय असल्यामुळें हीं दोन्हीं पर्वें मागाहूनचीं आहेत असेंच मानण्यांत येतें. त्यामुळें तीं बलि किंवा जावा यांमध्यें ख्रि. श. ५०० च्या सुमारास नसावीं असें मानण्यास हरकत नाहीं. परंतु फ्रेडरिक यास ही गोष्ट माहित असावीसें दिसत नाहीं कीं, महाभारताची २० पर्वांची दुसरी एक प्रत उपलब्ध आहे. चेंबरच्या संग्रहामध्यें बनारस येथील संवत् १७४४ मधील एक हस्तलिखित प्रत आहे तींत ९ ते ११ हीं पर्वें ९ ते १४ अशीं घातलीं आहेत. त्यांची नांवें शल्यपर्व (९), गदापर्व (१०), सौप्तिकपर्व (११), ऐषीकपर्व (१२), विशोकपर्व (१३), स्त्रीपर्व (१४) आणि अनुशासनपर्व हें निराळें नसून पंधराव्या शांतिपर्वाचाच एक भाग होतें.

फ्रेडरिकजवळ कविभाषेंतील ग्रंथाशीं तुलना करण्याकरितां भारतीय महाभारताची प्रत नव्हती. कविभाषेंतील महाभारताच्या पर्वांतील श्लोकसंख्याहि भारतीय महाभारताच्या श्लोकसंख्येहून निराळी आहे.

वर दिलेलीं काण्डें किंवा पर्वें मुख्य असून विशेषतः पवित्र व धार्मिक मानण्यांत येतात. परंतु कांहीं ग्रंथानांहि पर्व अशी संज्ञा आहे पण त्यांनां पवित्र मानण्यांत येत नाहीं.

कपिपर्व- यामध्यें सुग्रीव, हनुमान व त्यांचे पूर्वज यांच्या कथा आहेत.

अगस्तिपर्व -  यांत अगस्तीनें आपला पुत्र द्रेदस्य ( ?) यास उपदेश केला आहे.

चंतक अथवा केताकापर्व ( ?) - यामध्यें सर्व समानार्थक शब्द एकत्र  जमविले आहेत.  हा एक प्रकारचा कोश असून जावांतील व्यासाचा शिष्य कविदसि यानें केलेल्या दसनाम ग्रंथाप्रमाणें आहे. याच्या आरंभींच अनेक देवतांची नांवें दिलीं आहेत. त्यांचा तेथील पौराणिक कथा समजण्यास फार उपयोग होतो. (हा आपणाकडील अमरकोशासारखा असावा असें दिसतें.)
कविभाषेंतील धार्मिक ग्रंथातील दुसर्‍या प्रतीचें वाङ्‌मय हें अंशतः संस्कृत ग्रंथाच्या आधारें व अंशतः भारतवर्षांतून तेथें गेलेल्या हिंदूंनीं रचलेलें वाङ्‌मय आहे. त्यांतील पुढील ग्रंथांस विषयांच्या दृष्टीनें पर्वांनतरचें स्थान आहे.

बारतयुद्ध (भारतयुद्ध) - प्रथमतः महाभारतासंबंधीं कविभाषेमध्यें हा एवढाच ग्रंथ आहे अशी समजूत होती आणि हंबोल्ट यानें आपल्या कविवाङ्‌मयावरील संशोधनामध्यें याचा बराच उपयोग केलेला होता. यांतील कथाभाग महाभारताच्या ४ पर्वांवरून घेतलेला आहे. हीं पर्वें म्हणजे ज्यांत प्रत्यक्ष युद्धाचें वर्णन आहे तींच भीष्म, द्रोण, कर्ण आणि शल्य (६-९) हीं होत.  हा ग्रंथ कविवाङ्‌मयाच्या दुसर्‍या कालविभागांत म्हणजे केदिरिचा राजा जयबय याच्या कालांत मोडतो.  परंतु हा लौकिक अथवा दुसर्‍या प्रतीच्या धार्मिक ग्रंथामध्यें अग्रस्थानीं समजला जातो व याचें मुख्य कारण त्यांतील विषय हें होय. कारण तो बराच नंतरचा असून इतर बाबतींतहि त्याला कांहीं दुसर्‍या कविग्रंथांपेक्षां विशेषतः विवाह या ग्रंथापेक्षां बराच कमी मान मिळतो. या ग्रंथाची भाषा शुद्ध कवि नसून तींत बरेंचसें लौकिक भाषेचें मिश्रण झालें आहे.

विवाह- या ग्रंथाची माहिती जावानी भाषेमध्यें एक रूपांतर झालें आहे त्यावरून बरीच मिळते. या रूपांतराची रचना व विषयानुक्रम मूळ कविग्रंथाप्रमाणेंच आहे. यांतील कथाभाग इन्द्रलोकगमनम् आणि अर्जुनसमागम या ग्रंथाप्रमाणेंच आहे, आणि या ग्रंथाला अर्जुन व अप्सरा यांच्यामध्यें घडलेल्या प्रसंगाच्या बहारीच्या वर्णनावरूनच नांव दिलेलें आहे. या  ग्रंथाची भाषा सुरस व शुद्ध कवि आहे. यांतील वृत्तें जावानी नसून भारतीय आहेत. या ग्रंथाचा कर्ता केदिरि येथील हेंपु कण्व या नांवाचा कवि असून तो कविवाङ्‌मयाच्या पहिल्या कालविभागांत म्हणजे जयबय याचा पूर्वज अयर लंग्गिअयाच्या कारकीर्दींत होऊन गेला असावा. हेम्पु सदह् (बारतयुद्धाचा कर्ता) आणि हेम्पु कण्व हे दोघेहि शैवपंथी असावेत. कारण त्यांच्या ग्रंथांत बौद्धसंप्रदायाचीं चिन्हें क्वचितच दृष्टीस पडतात, किंबहुना मुळींच नाहींत म्हटल्यास चालेल.

स्मरदहन - हा ग्रंथहि अयर लंग्गिअ याच्या काळाचाच असून कविरामायण ग्रंथाचा कर्ता रायकुसुम याचा पुत्र हेम्पु दर्मय यानें रचलेला आहे. हें काव्य बहुतकरून कुमारसंभव काव्याचें रूपांतर असावें.

सुमानसंतक- हा ग्रंथहि त्याच कालचा असून हेम्पु मौनगुन यानें रचला आहे. हें काव्य भारतीय रघुवंशाचें रूपान्तर आहे असें वेबर म्हणतो. यांतील कथानक असें आहे. रामाजा पूर्वज रघु यास अदिआ( ?) नांवाची एक कन्या होती. तिचें स्वयंवर होतें. पुढें तिचा पति देविन्दु हा मृत्यु पावतो. नंतर तिला रामाचा पिता दशरथ हा पुत्र होतो.

बोमकाव्य. (भौमकाव्य) या ग्रंथाचा कर्ता म्पु ब्रदः बोद (बौद्ध) हा असून या ग्रंथाचा काल केदिरीचा राजा जयबय याच्या कारकीर्दीच्या सुमाराचा असावा. यांतील कथानकभौम हा विष्णु आणि पृथ्वी यांचा पुत्र होता. हा दानव असून त्यानें इंद्राचा पराजय केला. तेव्हां कृष्णानें त्यास ठार मारिला. तो जोंपर्यंत जमिनीवर असे तोंपर्यंत बलाढ्य असें परंतु जमिनीपासून पाय सुटतांच निर्बल होई. येथें पाश्चात्यांस कृष्णाचें हर्क्युलीस याशीं आणि भौमासुराचें अँटिअस या दैत्याशीं साम्य दिसते.
अर्जुन विजय- याचा विषय रामायणांच्या उत्तरकांडांतील आहे. महाभारताच्या ४ पर्वांवरून भारतयुद्ध या ग्रंथाची रचना केली त्याप्रमाणेंच रामायणावरून याची केलेली आहे. यामध्यें अर्जुनानें रावणाशीं युद्ध करून त्याचा पराजय केल्याची कथा आहे. या ठिकाणीं रावणाला फक्त बद्ध केला आहे, ठार मारला नाहीं, कारण त्याची वेळ अद्यापि भरली नव्हती. त्याला बळरामाकडून मृत्यु यावयाचा होता. या ग्रंथांत जें वर्णन आहे तें रामाच्या दक्षिणेवरील स्वारीपूर्वीं होऊन गेलेल्या एकाद्या ब्राह्मणी स्वारीचें वर्णन आहे काय हें नक्की ठरविण्यास अद्यापि संशोधन करावें लागेल. या ग्रंथाच्या कर्त्याचें नाव म्पु तन्तुलर बोद (M’pu Tantular Boda) अथवा बौद्ध नांव केदितीस जयबय असें आहे.

सुतसोम - वरील कर्त्यानेंच लिहिलेला. रतु दैत्य पुरुसद यानें भारतवर्षाचे सर्व राजे बंदींत टाकून रतु धर्म यास जिंकले होतें. त्याचा सुतसोम व त्याचा नातेवाईक प्रबुमकेतु (प्रभूमकेतु) यांनीं पराजय केला. यामध्यें रामाची व इतर बर्‍याच कथा आल्या आहेत. यांतील विषय बहुतकरून केतकपर्वन् या ग्रंथांतून घेतला असावा परंतु त्या ग्रंथाच्या स्वरूपावरून तसें वाटत नाहीं.

हे वरील तीन ग्रंथ हिंदुस्थानांतील ग्रंथाचींच रूपांतरें असून मूळचे हिंदुस्थानांतील ग्रंथ नष्ट झाले असावे असा वेबरचा तर्क आहे. भौम हें मंगळग्रहाचें नांव आहे आणि कार्तवीर्य अर्जुन याबद्दल पुराणांत बर्‍याच कथा आहेत, आणि कल्माषपाद पुरुषादक याचा रामायणामध्यें रघूचा पुत्र म्हणून उल्लेख आहे.

जावामध्यें हरिवंश या ग्रंथाचें आगमन मयपहित राज्यामध्यें म्हणजे बर्‍याच अलिकडील काळांत झालें आणि तो ग्रंथ म्पु पेनुलु बोद (M’pu Penulu Boda)  या बौद्ध भिक्षूनें नेला असावा. त्यावेळीं मयपहित येथील राजा ब्रविजय याचा पिता होता आणि ब्रविजय हा जावांतील रूढ समजुतीप्रमाणें शेवटचा हिंदु राजा होता. मयपहित राज्याचा काळ म्हणजे जावांतील कविवाङ्‌मयेतिहासाच्या कालविभागांतील तिसरा म्हणजे शेवटचा कालविभाग होय. या कालविभागामध्यें कविभाषेमध्यें जें लौकिक भाषेचें मिश्रण झालें त्यामुळें तो दुसर्‍या कालविभागापासून पृथकपणें दिसून येतो.

यानंतरचा वाङ्‌मयेतिहांतील कालविभाग म्हटला म्हणजे बलिबेटांतील कविवाङ्‌मयाचा होय. या कालांत वाङ्‌मयपरंपरा भिक्षु व कांहीं राजे यांनीं पुढें चालविली. या भिक्षुंनीं कविभाषा जिवंत ठेविली एवढेंच नव्हे, तर तींत संस्कृत भाषेंतील धर्मशास्त्रीय ग्रंथांची भर घातली. बहुतकरून बलिबेटांत गेलेले पुरोहित मयपहित राज्यांतून गेलेले नसून केदिरि प्रांतांतून गेलेले असावे असा वेबरचा तर्क आहे. मयपहित राज्याचा नाश होण्यापूर्वीं कांहीं शैव ब्राह्मण जावांत आले. ही हकीकत बलिमध्यें सर्वथा अज्ञात आहे. परंतु इतक्या थोडक्या काळांत या ब्राह्मणांनां कविभाषेचें ज्ञान कसें झालें असेल याची कल्पना करतां येत नाहीं. मात्र ते केदिरी प्रांतांत प्रथम येऊन नंतर मयपहित राज्यांत जाऊन तेथून बलि बेटांत गेले असें धरून चालल्यास त्यांचें कविभाषेचें ज्ञान शक्य आहे.

वर उल्लेखिलेल्या ग्रंथांखेरीज इतर कांहीं ग्रंथ आहेत ते कांहीं मूळ हिंदुस्थानांतील ग्रंथाच्या रूपांतरांच्या व कांहीं स्वतंत्र अशा स्वरूपाचे आहेत पण ते गद्यांत असल्यामुळें कविवाङ्‌मयाचें जें मुख्य लक्षण कीं ग्रंथ पद्य असावयाचे तें यांस लागू पडत नाहीं, पण त्यांची भाषा इतर जावांतील व बलिबेटांतील भाषेपेक्षां निराळी असल्यामुळें त्या ग्रंथास कविवाङ्मायांत घालण्यास हरकत नाहीं. हीं बहुतेक कायद्याचीं पुस्तकें उर्फ धर्मशास्त्रें आहेत.

मानवधर्मशास्त्र- मनुप्रणीत ग्रंथ वास्तविक येथें आढळत नाहीं, पण जावांतील लोकांचें असें म्हणणें आहे कीं, आमचे धर्मशास्त्र प्रबु मनु यानें केलेलें आहे. आणि पूर्वादिगम अथवा शिवानुशासन हा ग्रंथ त्याच्या नांवावर मोडतो असें फ्रेडरिक यानें एका ठिकांणीं म्हटलें आहे. परंतु दुसर्‍या एका ठिकाणीं त्यानेंच असें म्हटलें आहे कीं, मनुप्रणीत धर्मशास्त्र हा ग्रंथ ‘धर्मशास्त्र कुतर मनवादि’ या शब्दांनीं  वरील ग्रंथांत आला आहे. नंतर फ्रेडरिकनें या शब्दांच्या अर्थाबद्दल खल केला आहे. व शेवटी त्यानें असा तर्क केला आहे कीं, ‘धर्मशास्त्रकुतर मनवादि’ यांनीं निर्दिष्ट होणारा ‘मानवधर्मशास्त्र’ ग्रंथ बलिमध्यें असून अद्यापि अज्ञात  आहे किंवा तो जावामध्येंच नष्ट होऊन गेल्यामुळें बलिमध्यें आलाच नसावा. याचा उल्लेख सारस मुस्च्चय (सारसमुच्चय) व कामन्दक या ग्रंथाबरोबर शिवशासन ग्रंथांत आहे. शिवशासनाची प्रत फ्रेडरिक यास ब्रह्माण्डपुराणाप्रमाणेंच कोणाहि अनदिकारी मनुष्यास न दाखविण्याच्या अटीवर मिळाली होती. त्यांतील त्यानें आरंभींचा व शेवटचा भाग दिला आहे.

फ्रेडरिक यास इतर धर्मशास्त्रीय ग्रंथ पहावयास मिळाले नाहींत पण त्यांची जीं नांवें त्यास कळलीं त्यावरून ते ग्रंथ क्राफर्ड, रॅफल्स, हंबोल्ट यांनीं उल्लेखिलेलेच आहेत.
राजा कासिमन यानें त्यांचीं नांवें पुढें दिल्याप्रमाणें दिलीं आहेतः- (१) आगम (२) आदिगम (३) देवागम (४) सारस्-मुस्चेय (सारसमुच्चय) (५) {kosh यामध्यें मुलांनीं केलेल्या अपराधांस दण्ड सांगितले आहेत. हें खरें असल्यास पाणिनीमध्यें उल्लेखिलेल्या शिशुक्रंदियम् या ग्रंथाची आठवण होते.}*{/kosh} दुस्तकलबय (दुस्तरकालभय) (६) स्वरजंबु (जुंबुस्वर-जंबुद्वीपाचा धर्म) या नांवाचा एक ग्रंथ बलिमध्यें होता पण तो हाच होता कीं काय हें फ्रेडरिक यास निश्चित करतां आलें नाहीं. (७) देवदण्ड (प्राचीन भाषेंत ) विष्णूचा जेव्हां पृथ्वीवर अवतार होतो तेव्हां हा धर्म चालू असतो. (८) यज्ञसद्म याचा अर्थ कदाचित याज्ञवल्क्य असावा( ?) फ्रेडरिक यानें याबद्दल कांहींच मत दिलें नाहीं.

परंतु तमन् इन्तरम् (Taman Intarm) मध्यें पंडितानीं निराळीच यादी दिली आहे.  (१) आगंम (२) आदिगम (३) पूर्वदिगम (पूर्वाधिगम) अथवा शिवशासन. शिवशासन हा पूर्वादिगममधील एक भाग आहे.  (४) देवागम (५) स्वजम्बु=स्वरजम्बु (जम्बुस्वर).

यांशिवाय पौराणिक स्वरूपाचे ग्रंथ पुढें दिले आहेत. हे लायडन युनिव्हरसिटीच्या यादींत आढळून येतात.

अगस्तपर्वः- गद्य ग्रंथ. यांत ऋषींच्या कुलांची माहिती दिली आहे. यांतील कांहीं भाग आदिपर्वाशीं जुळतो, परंतु यांत बरीच निराळी माहिती आहे.

अर्जुनप्रलब्धः- यांत अर्जुनास कालीनें मारलें व शिवानें जिंवत केलें अशी कथा आहे.

अर्जुनसहस्त्रबाहुः- सहस्त्रबाहु अर्जुनाची गोष्ट.

अर्जुनविजयः- काव्य. बौद्ध ग्रंथ. यांत सहस्त्रार्जुनाची गोष्ट आहे.

अर्जुनविवाहः- याचें वर्णन दुसरीकडे दिलें आहे.

भारतयुद्धः- यावर बरींच काव्यें आहेत.

भीष्मपर्वः- भीष्म शरपंजरीं पडला असतां नारदाचा व त्याचा संवाद. यांतील वर्णन शांतिपर्वाप्रमाणें आहे.

भौमकाव्यः- विष्णु आणि पृथ्वी यांचा पुत्र भौमासुर याची कथा.

ब्रह्मांडपुराणः- याची माहिती दुसरीकडे दिली आहे.

कुंतियज्ञः- इन्द्रकील येथें अर्जुन कुंतीच्या दृष्टीस न पडल्यामुळें तिचा इतर चार पुत्रांशीं झालेला संवाद.

नवरुचि अथवा अवरुचि. यांत द्रोणानें भीमाचा विश्वासघात केल्याबद्दल कथा आहे. द्रोणापासून भीमास अमृत पाहिजे होतें.

वर वर्णन केलेल्या संस्कृत व कवि वाङ्‌मयाखेरीज बलि बेटांमध्यें बरेंचस् जावा-बलि-वाङ्‌मय आहे. तें हिंदुस्थानांतील ग्रंथांच्या आधारें रचलेलें नसून जे हिंदु लोक जावा व बलि बेटांत गेले त्यांनीं स्वतःच रचलेलें आहे. यामध्यें निरनिराळ्या प्रकारचे ग्रंथ येतात. प्रथम बाबद किंवा ऐतिहासिक बखरी हा वर्ग येतो. हे ग्रंथ अंशतः गद्यांत व अंशतः किडुंगमध्यें (जावा-बलि बेटांतील काव्यांचा एक नवीन छन्द) असतात.

याखेरीज पॉलिनेशियामधील पुराणकथा किडुंग छन्दोबद्ध आढळतात. याखेरीज आत्म्याचें पुनरवतरण (जन्मपरंपरा) या विषयावर व कांहीं तात्विक विषयांवर किरकोळ ग्रंथ आहेत. शेवटीं बलिबेटांतील पंचांग या महत्त्वाच्या ग्रंथाचा उल्लेख केला पाहिजे.

गद्य बाबद ग्रंथांपैकीं महत्त्वाचें ग्रंथ-
(१) केन्हंग्रोक- हा ब्रह्म्याचा पुत्र असून केदिरी, मयरहित आणि बलि येथील राज्यांचा संस्थापक होता. त्याची आई केन्हंडोक ही शेतांत असतांना तिला एका ब्राह्मणापासून हा पुत्र झाला.

(२) रंग्गलवे- तुमपेल येथील राजा शिवबुद्ध याचा केदिरी येथील राजानें पराजय केल्यानंतर, त्याचा प्रधान रंग्गलवे हा आपल्या धन्यापासून वेगळा पडला व त्याचाहि
पराजय होऊन तो मारला गेला. या ग्रंथांत केदिरी येथील दरबाराचें फार सूक्ष्म तंर्‍हेनें वर्णन केलेलें आढळतें.

(३) उसनजन - (Usana Jawa) जांवातील प्राचीन संस्था ( ?) या ग्रंथात मयपहित येथील जावानी लोकांनीं बलिद्वीप काबीज केल्याचें वर्णन आहे.

(४) उसनबलि - याचा उल्लेख फ्रेडरिकच्या Tijdschrift वर्ष व ९ या नियतकालिकांत आढळतो. यांत उल्लेखिलेल्या हस्तलिखिताच्या प्रतीचा शक १३३५ हा आहे.

(५) पमेन्दंग - बलिद्वीपाचा अलिकडील इतिहास.

फ्रेडरिक असें म्हणतो कीं, ‘याखेरीज प्रत्येक राजघराण्यांत बरेच बाबद ग्रंथ उपलब्ध होण्यासारखे आहेत व ते एकमेकांशीं ताडून पाहिल्यास पुष्कळ इतिहाससाहित्य उपलब्ध होईल,’ परंतु संस्कृत कविवाङ्‌मयाचा अभ्यासहि बराच उपयुक्त होईल यांत शंका नाहीं. दुसरा ‘मलत’ या नावांचा किडुंग वृत्तांत एक ग्रंथ आहे. तो बराच मोठा असून त्यांत रामायणांतील कथांसारख्या कथा आहेत. रामायण आणि भारतयुद्धांतील प्रसंगांप्रमाणेंच या काव्यांतील प्रसंगांवर कळसूत्री बाहुल्यांचे खेळ करितात. मलत्, वसेंग्, वगंबहगं विदेथ हे तीन ग्रंथ किडुंग वृत्तांत लिहिलेल्या ग्रंथांत फार प्रसिद्ध आहेत. हें तीनहि ग्रंथ बरेच लठ्ठ आहेत. कुरिपनच्या राजपुत्राचे पराक्रम आणि त्याची प्रिया दह येथील राजकन्या हिचा वियोग या गोष्टी आल्या आहेत. संविधानक जवळ जवळ तेंच आहे पण पात्रांच्या नांवामध्यें आणि त्यांच्या चर्येमध्यें फरक आहे. मलतमध्यें नायकाचें नांव नुसापति असें आहे. हा कुरिपनच्या राजाचा सर्वांत मोठा मुलगा होता. राजकन्या अनरंग केसरि हरवल्यानंतर  तो “अमलत् रश्मि” हें नांव धारण करून हिंडतो. या नांवाचेंच संक्षित्परूप मलत् हें आहे. वेबर वगैर लेखकांनीं याचें नांव ‘पंजि’ असें दिलें तें चूक आहे. हें नांव नसून त्याला दिलेल्या विशेषणावरून पडलेलें नांव असावें. राजकन्येच्या नांवासहि असाच संक्षेप मिळाला आहे. अनरंग केसरीच्या ऐवजीं रंगकेसरि हा शब्द वापरण्यांत येतो.

वर सांगितलेले ग्रंथ आज बरेच दिवस पंडितवर्गास परिचित आहेत तथापि लायडन यादीमध्यें आणखी अनेक ग्रंथांचीं नांवें दिसून येतात. त्या यादींतील कांहीं बाबद ग्रंथांत अधिक अर्वाचीन इतिहास आला आहे. “बाबद बलि” या पुस्तकांत बलिद्वीपांतील डच लोकांचा इतिहास आला आहे. “बाबद नेगारी” या पुस्तकांत गव्हर्नर जनरल सल येथें आला त्याचें वर्णन आहे. बाबदशक्र यांत शक्र उर्फ लाँबाक बेटांत झालेल्या बंडाचें वर्णन आहे. ‘बाबद बय’ यांत बंजुवंगीचा इतिहास आलेला आहे.
पौराणिक तर्‍हेचा ‘बाबद संगकल’ नांवाचा एक ग्रंथ प्रसिद्ध आहे. यांत पृथ्वीच्या उत्पत्तीपासून जावामध्यें भारतीयांच्या वसाहतीचे काल्पनिक इतिहास दिले आहेत. यांत विशेषेंकरून विष्णूचे अवतार दिले आहेत. प्रथमतः विष्णूचे जे अवतार हिंदुस्थानांत प्रसिद्ध आहेत ते दिले आहेत. नंतर सिंहलद्वीपांतील विष्णूचे अवतार दिले आहेत. (असें ब्रँडिस म्हणतो. पण ते अवतार कोणते हें सांगितलें असतें तर बरें झालें असतें.) आणि नंतर जावा येथील विष्णूचे अवतार उदाहरणार्थ कानोअर्जुनविजय, रामविजय, जयबय, अंगलिंगदर्म, कुडाराबिसरेंग हे अवतार दिले आहेत. दोहोंकडचे पौराणिक व दंतकथांपासून उपलब्ध झालेले “इतिहास” जोडण्यास फारसा पक्षपात दाखविला नाहीं. त्यांत पुढें आदाम, नूह (नोहा), मूसा (मोझेस) आणि न्गीसा यांचाहि वृत्तांत दिलेला आहे आणि पुढें रामाला यवद्वीपाची वसाहत करण्यासाठीं पाठवून दिलें आहे. यांतच पुढें स्वर्ग सौख्यांचें वर्णन आलें आहे.

बाबदसुरपतिः- बलि संस्थानचा इतिहास यांत आहे. बाबद या सदराखालीं या प्रकारचें जितकें वाङ्‌मय डॉ. ब्रँडिस यानें घातलें आहे त्यापेक्षां अधिक वाङ्‌मय त्याच्याच ग्रंथवर्णनपर यादींत सांपडतें. त्यापैकीं कांहिं आम्ही येथें देतों.