प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.
ब्राह्मण व बौद्ध. - तेथील ब्राह्मण बौद्धांचा तिरस्कार करितात आणि गोमांसभक्षणाचा त्यांवर आरोप करितात. तथापि शैव व बौद्ध या दोन्ही संप्रदायांचें ऐक्य खालील बाबतींत दिसून येतें. बुद्धास शंकराचा धाकटा भाऊ बनविलें आहे. पंचावलिक्रम नांवाच्या उत्सावामध्यें चार शैव पंडित व एक बौध्द पंडित व असे पांचजण कार्यकारी असतात. राजे लोकांच्या मृत्युप्रसंगी व युध्दप्रसंगी शैव ब्राह्मण व बौद्ध या दोघांनीं अभिमंत्रित केलेलें पाणी एकत्र केलें जातें. सामान्य काव्यामध्यें बुद्धाची व शिवाची स्तुती एकत्रच आढळते. सध्यां बलिद्वीपांत वैष्णवांचें अस्तित्व नाहीं. ब्राह्मणांमध्यें अग्निपूजन नाहीं पण ‘सूर्यसेवन’ आहे. पण या सूर्यसेवनप्रसंगीं सूर्यास शिवस्वरूपीच कल्पितात आणि त्याला शंकराचा तृतीय नेत्र समजतात. सामान्य लोकांच्या उपासनांमध्यें व दैवतांमध्यें ब्राह्मणांनीं आपलें अंग राखिलें नाहीं. दर्शपौर्णिमाप्रसंगीं उपवासयुक्त कांहीं कर्में करितात. दर पांच दिवसांनीं देखील कांहींजण उपवास करितात. कां कीं, पोलिनेशियन लोकांचा आठवडा पांच दिवसांचा आहे. त्यांत पांचव्या दिवसाला कलिवोन म्हणतात. दैनिक उपासना सर्वांत लहान, कलिवोनची त्याहून मोठी आणि दर्शपौर्णिमेची त्याहून मोठी असा क्रम आहे. दर्शपौर्णिमाप्रसंगीं उपासनेस अभियुक्त असा स्वतंत्रच पोषाख ब्राह्मण करितो. कमरेच्या खालीं पांढरा पोषाख व वर उघडा असा त्याचा पोषाख असतो. घंटानाद दर्शपौर्णिमाप्रसंगीं किंवा मार्तिकाच्या प्रसंगींच करण्यांत येतो. ब्राह्मण आपल्या घरीं जी वेदमंत्रयुक्त उपासना करितो त्याच्या योगानें त्याच्या घरचें पाणी पवित्र होतें आणि तें ‘तोयतीर्थ’ घ्यावयास इतर लोक येतात आणि त्यामुळें ब्राह्मणांस प्राप्ति होते. लोकांस बलिदानासाठीं किंवा संस्कारासाठीं हें वेदमंत्रानें अभिमंत्रित पाणी उपयोगी पडतें. ब्राह्मणांचा समाजास उपयोग येणेंप्रमाणें वर्णिला आहे. गृह्य संस्काराखेरीज तो सार्वजनिक उत्सवांत भाग घेतो. तो लहान मुलांस व राजेलोकांस कविवाङ्मय शिकवितो, पंचांग करितो, ज्योतिष सांगतो, आयुधें पवित्र करितो आणि त्यानें ॐ काराची खूण शस्त्रावर केली म्हणजे तें शस्त्र कार्यास विशेष उपयुक्त होतें.