प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.
या संस्कृतीच्या अभ्यासाची स्थिती. - जाव्हा येथील हिंदुसंस्कृतीच्या प्रसाराचा इतिहास जितका अभ्यासावयास पाहिजे तितका अभ्यासला गेला नाहीं. भारतीय संशोधनाशीं डच लोकांतील पौरस्त्य विषयावरील पंडित जितके परिचित असावेत तितके दिसत नाहींत. त्यामुळें यांच्या ग्रंथांतून पुष्कळ मागासलेल्या पांडित्याचीं दर्शक विधानें दृष्टीस पडतात.
यवद्वीपांत अनेक शिलालेख आहेत त्यांपैकीं कांहींचा अर्थहि लावला गेला आहे. तथापि जावा बेटांतील वाङ्मयाचें सूक्ष्म परीक्षण व्हावयास पाहिजे; पण वाङ्मयाकडे लक्ष नुकतेंच कोठें जाऊं लागलें आहे. तेथें उपलब्ध झालेल्या नवीन माहितीचे धागे हिंदुस्थानी माहितीशीं जोडण्याचें काम अजून बाल्यावस्थेंतच आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. डॉ. फ्रेडरिक, डॉ. बँडिस, डॉ. ग्रूट व डॉ. कर्न यांसारखे पंडित भारतीय वाङ्मयाशीं परिचित व जावा बेटांतील वाङ्मयाशीं पूर्ण परिचित दृष्टीस पडतात. तथापि हा पंडितवर्ग फार अल्प आहे हें कबूल केलेंच पाहिजे. हिंदुस्थानामध्यें महाराष्ट्रांत या विषयाकडे लक्ष ओढण्याचें कार्य थोडेंसें डॉ. सरदेसाई यांनीं केलें पण महाराष्ट्राबाहेर तें मुळींच झालें नाहीं. यूरोपीय अभ्यासकांच्या लेखांतील निरनिराळे तुकडे जमा करून आम्हास जेवढी माहिती मिळाली तेवढी आम्ही पुढें मांडित आहों.
जावामध्यें शालिवाहन शक चालतो, आणि शालिवाहन विषयीं दंतकथा बर्याच निराळ्या प्रकारानें तेथें दिसून येतात. त्यांची अशी कल्पना आहे कीं, ख्रिस्ती शकाच्या ७५ व्या वर्षाच्या सुमारास म्हणजे शालिवाहन शकाच्या आरंभाच्या पूर्वीं दोन तीन वर्षें आदिशक नांवाचा कोणी तरी द्वीपविजेता येऊन गेला असावा. त्या आदिशकाचा अशोकाशीं अक्षरसादृश्यावरून संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. पंधराव्या शतकाच्या शेवटास जावा मुसुलमानांकडून जिंकलें गेलें. म्हणजे सुमारें चवदाशें वर्षांचा इतिहास हा जावांतील हिंदूंचा इतिहास होय.