प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.
बलिद्वीपस्थ ब्राह्मणांची उत्पत्ति.- बलिद्वीपांतील ब्राह्मण आपली उत्पत्ति पादण्ड बाहु रावु यापासून सांगतात. यांची उत्पत्ति केदिरिपासून दिसते. त्याचे वंशज मयपहित येथें गेले व तेथून बलिद्वीपांत गेले. जावानी माहिती अशी आहे कीं मयपहितच्या पाडावापूर्वीं कांहीं काल शैवब्राह्मण तेथें आले होते ते त्या शहराज्या नाशानंतर पूर्वेकडे आणि बलिद्वीपाकडे निघून गेले.
बलिद्वीपस्थांची माहिती फार संशयास्पद आहे. त्यांच्या समजुतीप्रमाणें केदिरि हें भारतवर्षांत आहे. परंतु याला विरुद्ध असें आहे कीं जयबय राजा हा भारतवर्षांतील राजा होता असें बलिद्वीपस्थ समजतात आणि जावानीज इतिहासकार जावामधील केदिरि येथील हा राजा आहे असें समजतात. बाहु अथवा बाहु रावु याचा अर्थ नवीन आलेला असा आहे. पादण्ड बाहु रावु याला दुसरें नांव भगवान द्विजेंद्र असेंहि आहे. याच्या केदिरि, मयपहित आणि बलि येथील स्थानांतरांचें वर्णन संदिग्ध आहे. ब्राह्मणांच्याच मताप्रमाणें बलि येथील ब्राह्मणांत जे पांच भेद आहेत ते त्याच्या पांच बायकांपासून झाले आहेत. पहिला भेद ब्राह्मण कामेनु हा होय. हा बाहु रावूच्या ब्राम्हणस्त्रीवंशापासून झालेला आहे. गेलगेल ब्राह्मण हा क्षत्रियस्त्रीपासून झाला आहे असें मानण्यांत येतें. ब्राह्मण नौबा हा बाहु रावूच्या क्षत्रियविधवा स्त्रीपासून झाला आहे असें म्हणतात. चवथा भेद ब्राह्मणमस हा ब्राह्मण आणि वैश्यकन्या यांपासून झाला आहे आणि पांचवा ब्राह्मण कयुशून्य हा ब्राह्मण व शूद्रस्त्रीपासून झाला असें म्हणण्यांत येतें. तथापि हीं सर्व विधानें बाष्कळ होत असें म्हणण्यास हरकत नाहीं. कारण कामेनु, गेलगेल, नौबा इत्यादि सर्व स्थाननामें आहेत आणि ज्या प्रमाणें सर्व ब्राह्मण एका ब्राह्मणापासून झाले हें विधानच बाष्कळ आहे, त्याप्रमाणेंच त्या विधानाची ही पत्नीवर्णभेदात्मक पुरवणीहि आहे. ब्राह्मणाचें निरनिराळ्या वर्णाच्या स्त्रियांशीं लग्न झालें तर मुलें ब्राह्मणच राहतात तथापि त्यांत जर शूद्ररक्त फार भेसळलें गेले तर राजा त्यांचें ब्राह्मण्य हिरावून घेऊन त्यांस शूद्रवर्णांत टाकतो यासाठीं दोन तीन पिढ्यांनीं तरी ब्राह्मण ब्राह्मणस्त्री बरोबर लग्न करण्याची खटपट करितो. तेथें शुद्ध रक्ताचा ब्राह्मण कोणीहि नाहिं असें फ्रेडरिक म्हणतो.
ब्राह्मणांचा पोषाख धोतर, उपरणें व तांबडी टोपी हा होय. जानवें, रुद्राक्षमाला, व इतर कर्णाभरणें व केशाभरणें हीं ब्राह्मणांच्या अंगावर दिसतात. ते माणिकांच्या आंगठ्या वापरतात. येथें माणिकांस हिर्यांपेक्षां अधिक महत्त्व आहे; कारण त्यांच्या अंगीं अधिक दैवी शक्ति आहे.
तेथें उच्चवर्णांतील स्त्रियांस वेदाधिकार आहे. ब्राह्मणांच्या ज्या हलक्या वर्णाच्या स्त्रिया असतील त्यांस नवर्यांच्या योगानें थोरपणा प्राप्त होतो. ब्राह्मणाच्या इतर वर्णाच्या बायकांनां स्वतःचें व मुलांचें पोट स्वतःच भरावें लागतें तथापि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची क्रिया ब्राह्मणस्त्रियांप्रमाणें होते आणि त्यांचा पितृगणांत प्रवेश होतो.