प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.
क्षत्रिय.- बलिमध्यें क्षत्रिय फारच थोडे आहेत. देव अगुंग आणि त्याच्या घराण्यास क्षत्रिय म्हणतात पण इतर घराणीं वैश्य समजलीं जातात. उशना जावा ग्रंथामध्यें चार क्षत्रियघराणीं दिलीं आहेत. तीं कुरिपन, गग्लंग, केदिरि, आणि जंग्गल हीं होत. जावा आणि केदिरि येथील दरबारांत जे क्षत्रिय आणि वैश्य होते त्यांचा उल्लेख रंग्गलवे या ग्रंथांत आहे. हें राज्य मोठें होतें पण त्यांत क्षत्रिय फार नव्हते. तेथील क्षत्रियांचीं नांवें अशीं होतीं-महिस बुंगलन, क्बो विललुंगन, क्बो सिलुमन, क्बो जेरंग, क्बो कनिगर, क्बो चलुक, क्बो त्कि, क्बो तलुक्तक, कि महिस सपति, क्बो मुंदरंग, रंग्गस्मि, रंग्ग मयंग, रंग्ग पलन, रंग्ग रलेंग्सोंग, रंग्ग पसुंग, रंग्ग विरद, रंग्ग रबेते, रंग्ग सुंबि, रंग्ग संपन, अनुरंग्ग सुंतिंग, हींच काय तीं जावामध्यें क्षत्रिय कुलें होती. यांपैकीं बहुतेक सर्व क्षत्रिय कुलें युद्धांमध्यें व मयपहित शहराच्या नाशा बरोबर नष्ट झालीं असावीं. देव अंगुग यांचें कुलहि एका कालीं नष्टप्राय झालें होतें. कारण त्या कुलांतील तरुण राजा यास संतति नव्हती त्या वेळीं दंग ह्यंग कपकिसन या पुरोहितानें बतु हेंग्गोंग या दगडापासून संतति उत्पन्न केली (उशना बलि पृ. ३४४). बलिद्वीपांतील राजघराणें या बतु हेंग्गोंगच्याच वंशांतील होतें. देव अगुंग याचा एक आर्य दमर नांवाचा सावत्र भाऊ होता त्याचे वंशज पुढें वैश्य झाले. सध्या बलीमध्यें असलेले सर्व क्षत्रिय देव अगुंग याचेच वंशच आहेत असें म्हणतात. फ्रेडरिकच्या कालीं क्लोंग्कोंग, बंग्लि, आणि ग्यानयर येथेंच काय तीं क्षत्रिय घराणीं राज्य करीत होतीं. बोलेलेंग येथेंहि देव अगुंग याच्या वंशजांचें एक घराणें पूर्वीं राज्य करीत होतें पण तें पुढें बदोंगमध्यें गेलें, व त्यांचें राज्य वैश्यांनीं घेतलें.
इ. स. १६३३ च्या सुमारास बलिद्वीपांतील सर्व क्षत्रिय व राजघराणीं देव अगुंग याच्या सत्तेखाली होतीं, परंतु पुढें युद्धांमुळें ही सत्ता बरीच नष्ट होत गेली व पुढें केवळ नामधारी सत्ता आणि ती देखील कांहीं थोड्या राजघराण्यांवर कायम राहिली.
ज्या क्षत्रियांमध्यें शूद्र रक्ताचा अंश बराच असतो त्यांस देस्सक, प्रदेव आणि पुंगकन अशीं नांवें आहेत.