प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.

दैवतकल्पना. - ब्रह्मदेवाला चार तोंडें नसून एकच तोंड आहे. त्यापासून शिवाची उत्पत्ति झाली खरी पण शिवाच्या उत्पत्तीबरोबर हा फिका पडला. विष्णूचें महत्त्व देवळांच्या संख्येच्या दृष्टीनें नाहीं पण विष्णूचे अवतार कविवाङ्‌मयांत गायिले आहेत. मत्स्यादि अवतारांशिवाय दोन अवतार हिंदुस्थानांतील लोकांस अपरिचित असे तेथील लोकांच्या परिचयाचे आहेत. ते अवतार पतिः गजमद हा करेंग असेम घराण्याचा संस्थापक, आणि सिलिसिन मुरगे लढाऊपणाचा देव हे होत. विष्णूच्या कपाळावर जो टिळा आहे तो तृतीयनेत्रस्वरूपी आहे. विष्णूच्या बायकोचें नांव श्री असें आहे, लक्ष्मी हें नांव अपरिचित आहे. श्री ही शिवाची बायको म्हणून देखील मानिलेली आहे. लोकपाल त्यांस ठाऊक आहेत. सूर्य आणि शिव एकच हें वर दाखविलेंच आहे. कुबेर, गणेश आणि कार्तिकेय यांचीं स्वरूपें आपल्यासारखींच आहेत. स्मर, अनंग, काम आणि मनोभव या चार नांवांनीं ज्ञात असलेला कामदेव आणि त्याची पत्‍नी रति यांस बलि बेटांतील लोक तरी कसे विसरतील ?
त्यांच्या ब्रम्हाण्डपुराणांतील विषय बहुतेक आपल्या परिचयाचेच आहेत. रक्तस्त्रावयुक्त यज्ञ बलिद्वीपांत शिवासाठीं होत नसून काल, दुर्गा आणि भूतें यांच्या प्रीत्यर्थ होतात.

बलिद्वीपांत असणारे सण व उत्सव आपल्या सण व उत्सवांपेक्षां भिन्न आहेत आणि त्यांचें पंचांगहि आपणाहून भिन्न आहे. तेथें नवीन यज्ञ नुकतेच झाले असल्याची डॉ. फ्रेडरिकची खात्री झाली होती. तेथें दहनविधीहि बर्‍याच भपक्याचा होतो.