प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.
एतद्विषयक अज्ञानाची सीमा. - या द्वीपांतील अर्वाचीन सामाजिक स्थितीविषयीं आपणांस जवळजवळ कांहींच माहिती नाहीं असें म्हणावें लागेल. अर्वाचीन स्थितीविषयीं ग्रांथिक माहिती फार सदोष आहे. बलि आणि लाँबाक या बेटांमध्यें अर्वाचीन भारतीयांचें गमन कितपत होतें याचे आंकडे मिळत नाहींत. एकंदर एशियांतील डच मुलखांत गेलेल्या इतर एशियाटिकांचा हिशोब देतांना ५,६३,००० चिनी, २९,००० अरब आणि २३, ००० एशियांतील इतर लोक असा हिशोब ‘स्टेट्समनस इअर बुक’ (१९१९) देतें.
तद्देशस्थ हिंदूंचे आंकडे मुळींच मिळत नाहींत. बलि आणि लाँबाक बेटांतील लोकवस्तीचे आंकडे बरेच अनिश्चित आहेत. ३१ डिसेंबर १९०५ रोजीं जी शिरोगणती झाली तींत या बेटांची लोकसंख्या ५,२३,५३५ अशी दिली आहे आणि त्या आंकड्यांवर ‘अजमासानें’ असा शेला स्टेटसमनच्या वार्षिकानें मारला आहे. पुढें बारा वर्षांनीं म्हणजे ३१ डिसेंबर १९१७ सालचा जो सरकारी अंदाज केला त्याचा आणि पूर्वींच्या शिरोगतीचा कांहींच मेळ बसत नाहीं. त्या दिवसाच्या लोकसंख्येचा अंदाज १३,४४,८८० असा केला आहे. एवढी मोठी तफावत ज्या आंकड्यांत दिसून येते त्यांची विश्वसनीयता किती समजावी हें लिहावयास नकोच.
सेलिबिससंबंधानें तीच भानगड आहे. सेलिबिस बेटांतील सेलिबिस विभागाची लोकसंख्या ३१ डिसेंबर १९०५ मध्यें जर ४ लक्ष भरते तर बारा वर्षांनीं २३ लक्ष भरते. इतक्या मौजेचे आंकडे इतरत्र मिळतील काय ?
बलि बेटांतील हिंदूंच्यासंबंधानें कांहींच माहिती ‘स्टेट्समन्स इयर बुक’ मध्यें मिळत नाहीं. डच ईस्टईंडीजमध्यें बहुतेक लोक मुसुलमान आहेत, कित्येक दशलक्ष नवीन बनविलेले ख्रिस्ती आहेत आणि थोडेसे बौद्ध आहेत एवढीच माहिती दिली आहे. हिंदूंच्या अस्तित्वाविषयीं माहिती चोहोंकडून मिळत असतां या “माहिती” चा अर्थ काय कारवयाचा हें एक कोडेंच आहे.
यावद्वीप संस्कृतीची जी माहिती आम्हीं येथे देणार तींत अर्वाचीन माहितीचा जवळजवळ अभाव असेल. सुमारें ऐशीं वर्षांपूर्वीं झालेलें सामजिक संशोधन आणि होतां होईतों आजपर्यंतचें वाङ्मयविषयक आणि ऐतिहासिक संशोधन यांच्या पलीकडे आम्हांस फारसें जातां येणार नाहीं.
जावाच्या इतिहासाचे तीन भाग पडतात. हिंदुसत्तेचा काल, मुसुलमानी सत्तेचा काल व यूरोपीय सत्तेचा काल. हिंदुसत्तेच्या कालाचेहि तीन भाग पडतात. पहिला काल म्हणजे बौद्ध प्रामुख्याचा, दुसरा शैवप्रामुख्याचा व तिसरा दोहोंच्याहि धर्मांच्या व समजुतींच्या एकीकरणाचा कांल. दोहोंचें एकीकरण झालें आहे तेंहि मजेदार रीतीनें झालें आहे. त्यांत बुद्ध ही देवता मान्य होऊन तिला शिवाचा धाकटा भाऊ केलें आहे, अशा तर्हेचीं विधानें पुष्कळ संशोधकांच्या लेखांतून आढळतात, आणि ब्रिटानिकानें तींच उद्धृत केलीं आहेत. त्या विधानांचें परीक्षण पुढें होईलच. हिंदूंचा व बुद्धाच्या संप्रदायाचा इतिहास या द्वीपसमूहाच्या इतिहासाशीं संबद्ध आहे एवढें मात्र खरें. या द्वीपाचा राजकीय इतिहास देखील आपणांस अवश्य आहे. जावा येथें हिंदूंची राज्यें अनेक होतीं त्यांत मयपहित हें संस्थान फार मोठें होतें; आणि हें संस्थान पुढें वाढत जाऊन यानें जावांतील इतर संस्थानांवर ताबा चालविला एवढेंच नव्हें, तर इतर आसपासच्या बेटांवरहि ताबा चालविला. या माहितीवरून इतिहासाचा प्रदेश व त्याचें क्षेत्र लक्षांत येईल.