प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.

दरबार.- एका दिवशींच्या दरबाराचें वर्णन असें आढळतें. पौर्णिमेच्या दिवशीं सकाळीं राजा सभेंत येण्याकरितां निघाला त्या वेळीं नाना तर्‍हेचीं वाद्यें वाजू लागलीं सर्वांपेक्षां उच्च ठिकाणीं स्थापन केलेल्या भव्य सिंहासनावर तो बसल्यानंतर त्यानें सर्व लोकांचे मुजरे घेतले. सर्व लहानथोर, वृद्ध, तरुण, बौद्ध भिक्षू त्याला मुजरा करण्याकरितां आले. नंतर सर्व राजांनीं आपल्या बायकांमुलांसह त्यास मुजरा केला. नंतर सरदार मुजरा करावयास आले त्यांच्या अग्रभागीं गजमद हा होता. त्याप्रमाणेंच समुद्रकिनार्‍यावरील निरनिराळ्या प्रांतांवरील प्रतिनिधी आणि मांडलिक राजे यांनीं मुजरे केले. नंतर ते यथाक्रम आपापल्या स्थानावर जाऊन बसले. नंतर सर्वांनीं आपआपले नजराणें पुढें ठेविले व याप्रमाणें दररोज नवीन नवीन नजराणे पाठविण्याच्या बाबतींत त्यांच्यामध्यें अहमहमिका लागली होती.

चैत्रांतील अमावास्येच्या दिवशीं एकत्र विचार करण्याकरितां एक मोठी सभा भरत असे. मंत्री व मुख्य मुख्य अधिकारी (तण्ड) व सर्व गुस्ती म्हणजे राजाचा सर्व लवाजमा (वडव हजि) त्यावेळीं एकत्र जमत असे. ग्रामांतील मुख्य, शिष्ट लोक व निरनिराळ्या दर्जाचे लोक, सर्व क्षत्रिय व इतर वर्णांच लोक व त्यांच्या प्रमुख स्थानीं ब्राह्मण असे एकत्र जमत असत. नंतर एकत्र विचार होत असे व राजाचे सैनिक विशेष सतृष्ण होऊं नये, त्यांनीं राजाज्ञा बरोबर पाळाव्या, व त्यांनां प्रत्येक वर्षीं चैत्रांत वाचून दाखविलेले नियम त्यांनीं बरोबर अमलांत आणावे, त्यांचें वाकडें पाऊल पडूं नये व त्यानीं नीट काळजी घ्यावी, त्यांनीं देवस्थानच्या किंवा ब्राह्णणांच्या वित्ताचा अपहार करूं नये व अशा रीतीने राज्याची अभिवृद्धि व्हावी म्हणून त्यांस उपदेश करण्यांत येत असे व नियम वाचून दाखविण्यांत येत असत.

यावद्वीप संस्कृतीसंबंधानें आपणांस अधिकाधिक माहिती झाली पाहिजे आणि तेथें सुशिक्षित भारतीय गेले पाहिजेत. तेथें आपला कांहीं वैश्यवर्ग आहेच. हिंदुस्थानाचा ज्या देशाशीं व्यापार मोठा आहे अशा देशांत जावाचा दुसरा नंबर लागतो. या विषयाकडे लक्ष देण्यासाठीं आपल्या विद्वनांनां डच भाषेशीं देखील ओळख करून घ्यावी लागेल. जावामधील वाङ्‌मयांत अद्‍भुत कथा पुष्कळ आहेत त्यांचें एकीकरण केलें तर अरबी भाषेंतील सुरस व चमत्कारिक गोष्टी यासारखाच, निदान कथासरितसागरासारखा सुरस ग्रंथ होईल अशी कल्पना आह्मांस जी माहिती देतां आली तिच्या योगानें जिज्ञासा तरी उत्पन्न झाल्यास लेखनाचें सार्थक झालेंसें वाटेल.