प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.

उपास्यें.- सामान्य लोकांचे उत्सव निराळेच आहेत. त्यांची देवळें शिवालयेंच आहेत पण तीं निरनिराळ्या नांवांनीं व्यक्त होतात. वासुकी, वतुकहुं, उलुवतु, येहजेरुक, गिरलव, पकेन्दुन्गन, हीं स्थानें प्रसिद्ध आहेत. सकेनान आणि जेंपुल येथें इन्द्राचीं देवालयें आहेत ही गोष्ट लक्षांत ठेवण्याजोगी आहे आणि या गोष्टीचें अस्तित्व हिंदूंचा बलीकडे प्रयाणाचा काल बराच जुना असावा असा स्वाभाविक संशय उत्पन्न करितें. दुर्गा, काल आणि भूत यांसहि बली मिळतात. पितरांचें अस्तित्व लोकांस मान्य आहे. त्यांच्या पौराणिक कथांतून मेरु वगैरे स्थानें आहेतच. विष्णूचें अस्तित्व दिसतें पण विष्णूची उपासना दिसत नाहीं; आणि जलदेवता या नांवानें विष्णूला जरी कांहींसें स्थान आहे तरी तें वरुणापेक्षां कमी महत्त्वाचें आहे. विष्णूचीं नांवें इकडे शिवासच लाविलीं जातात. हरिहराभेद त्यांनीं हरीचें वैशिष्ट्य हरासच देऊन केला. यमाचीहि उपासना होते;  आणि उपासनेचा अंश इंद्राबरोबर वराप्सरः (चांगल्या अप्सरा) आणि विद्याधर व ऋषी यांसहि मिळतो, ही गोष्टहि विशेष लक्षांत ठेवण्याजोगी आहे. कां कीं, भारतीय वाङ्‌मयामध्यें विद्याधरांचें अस्तित्व जैनग्रंथ आणि कथासरित्सागरासारखा निवळ गोष्टींचा ग्रंथ यांच्याबाहेर कोठेंहि प्रामुख्यानें आलेलें नाहीं.