प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.
आतां बलि, लाँबाक व जाव्हा या तीन द्वीपांची साकल्यानें माहिती देतों. हीं बेटें एका संस्कृतीचाच विभाग आहेत. या संस्कृतीस यावद्बीपसंस्कृति म्हणणें रास्त होईल. कां कीं यांचें केंद्र यवद्वीप होतें. या तींनहि बेटांचा इतिहास एकमेकांशीं संबद्ध आहे; फरक एवढाच कीं, गेल्या चारशें वर्षांत जाव्हा बेटांचें हिंदुत्व नष्ट होऊन तें मुसुलमानी बेट बनलें आहे आणि तें डच लोकांच्या ताब्यांत गेलें आहे. जाव्हा येथील स्त्रिया अद्यापि हिंदूंचे धर्म पाळतात आणि पुरुष मुसुलमानी धर्म पाळतात असें श्रींमत इचलकरंचीकारांच्या बरोबर गेलेले पुण्याचे डॉ. सरदेसाई म्हणतात. जाव्हा या बेटाचें मूळ नांव यवद्वीप हें आहे. यव हें डच भाषेंत ‘Java’ असें लिहिलें जातें. आणि डच भाषेंत त्याचा उच्चार ‘यावा’ असा होतो, कां कीं जर्मन व डच भाषांमध्यें ‘य’ हा उच्चार लिहिण्याकरितां ‘J’ हें अक्षर वापरतात. डच लोकांनीं ‘यावा’ लिहिण्यासाठीं Java अशीं अक्षरें वापरलीं त्याचा इंग्रजी उच्चार ‘जाव्हा’ झाला. तोच उच्चार इंग्रजी शिकलेल्यांच्या मराठींत आला आहे. बलि व लाँबाक या बेटांतील हिंदुत्वाचे परिणाम एका वाक्यांत सांगण्यासाठीं असें म्हणता येईल कीं या बेटांत चातुर्वर्ण्य अजून कायम आहे. तेथील लोकांत वेदाविषयीं पूज्यबुद्धि आहे, तथापि वेदपठण तेथें फारसें नाहीं. तेथील लोकांचा महत्त्वाचा ग्रंथ म्हटला म्हणजे ब्रह्मांडपुराण होय. {kosh बलि बेटांत अवगत झालेल्या ब्रह्मांडपुराणाची हिंदुस्थानांतील ब्रह्मांडपुराणाशीं तुलना करण्याची डॉ. फ्रेडरिक यांची इच्छा होती, पण त्यांस हिंदुस्थानी ब्रह्मांडपुराण त्या वेळीं उपलब्ध झालें नाहीं. १९०४ सालीं हिंदुस्थानीं ब्रह्मांडपुराण व्यंकटेश्वर छापखान्यानें प्रसिद्ध केलें. तदनंतर १९११ सालीं डॉ. फ्रेडरिक यांची बली बेटांतील प्रत तुलनेसाठीं मिळविण्याचा प्रयत्न डॉ. केतकर यांच्यासाठीं इंडिया-ऑफिसनें केला, पण इंडिया-ऑफिसला तें पुस्तक मिळविण्याच्या बाबतींत यश आलें नाहीं.}*{/kosh}
बलि बेटामध्यें कांहीं भाग डच लोकांच्या ताब्यांत आहे, आणि कांहीं संस्थानें अजून स्वतंत्र आहेत. बलि बेटांतील हिंदूंची वसति ख्रिस्तोत्तर पहिल्या शतकांत झाली असावी, असा अर्वाचीन डच संशोधकांचा तर्क आहे. बलीशेजारचें बेट लाँबाक याचें तद्देशीय नांव ‘ससक’ असें आहे. ससक बेटांतील लोकांस ‘ससक’ असेंच म्हणतात, आणि ससक बेटांतील भाषा बलि भाषेशीं सदृश आहे. ससक लोर व बलि बेटांतील लोक हे एकाच मानववंशांतील आहेत; तथापि त्यांच्यांत असा एक फरक आहे कीं, ससक हे मुसुलमान आहेत व बलि बेटांतील लोक हिंदु आहेत. ससकांची लोकसंख्या सुमारें तीन लक्ष वीस हजार आहे. ससक बेटांतीलच बलिद्वीपस्थ हिंदूंची संख्या ५० हजार आहे, असें ब्रिटानिका म्हणतो पण ती माहिती ताडून पाहतां येत नाहीं. तेथील आंकजड्यांसंबंधानें एकंदर फारच घोंटाळा आहे.