प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.

राजाची स्वारी.- हिंवाळा संपूर्ण होऊन गेल्यानंतर राजा प्रत्येक महिन्यास बाहेर फिरावयास निघतो. राजधानीच्या पूर्वेस जलगिरीच्या दक्षिण बाजूस एक सीम नांवाचें खेडें आहे. तेथें यात्रा भरते व तेथें लोक नवस फेडण्यास येतात.

शक १२८१ मध्यें वर्षाकाळीं भाद्रपद महिन्यांत राजानें लमजुंग जिल्ह्यांत स्वारी काढली त्या वेळीं जावांतील सर्व मांडलिक राजे आपआपल्या परिवारासह त्याजबरोबर होते. त्याप्रमाणें पुष्कळ नोकरचाकर, वाहनें, लहानमोठे अधिकारी विल्वतिक्त (मयपहित) येथील सर्व सरदार, कविराज वगैरे सर्व लवाजमा त्याजबरोबर होता.