प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.           
 
स्तोम.– सामगायनाच्या अभ्यासांत ‘स्तोम’ म्हणजे काय हें समजवून घेणे जरुरीचें आहे.  त्रिवृत, पंचदश, सप्तदश, त्रिणव, एकविंश इत्यादि बरेच स्तोम आहेत.  त्यांपैकी काही स्तोमांची माहिती येथे देत आहों.  ‘उत्तरा संज्ञक’ ग्रंथात ‘उपास्मैगायतानर:’ ‘दविद्युतत्याॠचा’ व ‘पवमानस्यतेकवे’ अशी तीन सूक्तें प्रत्येकी तीन तीन ॠचांची पठित आहेत.  या तीन सूक्तांच्या आश्रयाने जे अग्निष्टोमयज्ञांत गायत्रसंज्ञक स्तोत्र किंवा ‘साम’ गाइलें जातें त्यास ‘बहिष्पवमान’ असे म्हणतात.  या बहिष्पवमानाचें गान ‘त्रिवत्’ नामक स्तोमाने सिद्ध करावयाचें असते.

सामगान केले जातें ते संहितेंतील मूळ ॠचांवर केलें जातें.  या ॠचा प्रत्येक सामांत तीन असतात.  या ॠचांची सामगानांत पुन: पुन: आवृत्ति करुन पठण करणे याला स्तोम म्हणतात.  या स्तोमांची नांवे पुढीलप्रमाणे : - त्रिवृत्, पंचदश, सप्तदश, एकविंश, त्रिवण, त्रयस्त्रिंशत्, चतुर्विश, चतुश्चत्वारिशत्, अष्टाचत्वारिशत्.  या स्तोमांची लक्षणें पुढे दिली आहेत.  

त्रिवृत् स्तोम.– सामाच्या तीन ॠचांपैकी प्रत्येक ॠचेची तीन वेळ आवृत्ति करणें हा त्रिवृत् स्तोम.

पंचदश स्तोम.– सामाच्या तीन ॠचांची संख्या आवृत्तिभेदाने पंधरा करणे, व तीन तीन पर्यायांत करणे.  त्याचा प्रकार:- पहिल्या पर्यायास प्रथमॠचा तीन वेळ, दुसरी एक वेळ व तिसरी एक वेळ.  दुसऱ्या पर्यायास पहिली एक वेळ, दुसरी तीन वेळ व तिसरी एक वेळ.  तिसऱ्या पर्यायास पहिली व दुसरी एक एक वेळ व तिसरी तीन वेळ. याप्रमाणे तीन पर्याय मिळून तीन ॠचांच्या आवृत्तीने पंधरा ॠचा करणे.

सप्तदश स्तोम.– पहिल्या पर्यायास पहिली तीन वेळ दुसरी आणि तिसरी एक वेळ.  दुसऱ्या पर्यायास पहिली व तिसरी एक वेळ आणि दुसरी तीन वेळ. तिसऱ्या पर्यायास पहिली एक वेळ व दुसरी आणि तिसरी तीन वेळ.  याप्रमाणे दोन पर्यायांत दहा व तिसऱ्या पर्यायांत सात मिळून सतरा आवृत्ति करणे.

एकविश स्तोम.– प्रत्येक पर्यायांत सात मिळून तीन पर्यायांत एकवीस.

त्रिणव स्तोम.– प्रत्येक पर्यायांत नऊ मिळून तीन पर्यायांत सत्तावीस.  याप्रमाणे त्रयास्त्रिंशाच्या तीस, चतुर्विशाच्या चोवीस, चतुश्चत्वारिंशत, व अष्टाचत्वारिंशतच्या अनुक्रमे चव्वेचाळीस व अठ्ठेचाळीस ( आवृत्तिभेदाने ) ॠचा करणे.

विष्टुति.– स्तोमाच्या पर्यायांतील ॠचांच्या अनुक्रमांत निरनिराळे बदल करणे याला विष्टुति असें म्हणतात.  उदाहरण:- पंचदशस्तोमाचा पहिला पर्याय पहिली ॠचा तीन वेळ आणि दुसरी, व तिसरी एक एक वेळ असा आहे.  यांत फरक करुन पर्यायांची ( ॠचांची ) संख्या पांच करणे याचे नांव विष्टुति.  अशा प्रकारच्या कांही स्तोमांच्या विष्टुती ( अथवा चाली ) ठराविक आहेत.  त्यांची नांवे :

त्रिवृत् स्तोमाच्या विष्टुती.– उद्यनी, परिवर्तिनी, कुलायिनी.

पंचदशस्तोमाच्या विष्टुती.– पंचपंचिनी, उद्यती, अभिक्रामंती.

सप्तदशस्तोमाच्या विष्टुती.– दशसप्ता, सप्तास्थिता, उद्यती, भस्त्रा.

एकविंश स्तोमाच्या विष्टुती.– सप्तसप्तिनी, उद्यती, प्रतिष्ठिता, सूर्म्या.

त्रयस्त्रिंश स्तोमाच्या विष्टुती.– समत्र्यंशा, नेदीय:संक्रमा, उद्यती, प्रत्यवरोहिणी उद्यती.

त्रिणवस्तोमाच्या विष्टुती.– प्रतिष्ठिता, उद्यती.

चतुश्चत्वारिंशत स्तोमाच्या तीन विष्टुती.– प्रतिष्ठिता, निर्मध्या.  तिसरीचें नांव नाही.

अष्टाचत्वारिंशत् स्तोमाच्या दोन विष्टुती.– नांवे दिली नाहीत.  [ ताण्डयमहाब्राह्मण ]