प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
स्वर व श्रृती- आतां आपण सवर व श्रुति यांच्या कलपना थोडयाशा स्पष्ट करून घेऊं. कारण स्वर व श्रुति या सर्व संगीतपद्धतींचा पाया होत व निरनिराळया संगीत पद्धतीत मुलत: फरक या स्वरांच्या किंमतीचाच असतो. या दोन कल्पना ग्रहण झाल्यानंतर आपण भारतखंउात प्रचलित असलेल्या पद्धतीतील फरकाचें ज्ञान करून घेऊं व नंतर पाश्चात्य पद्धतीकडे वळू.
राग हा गायनांतील अत्यंत महत्वाचा व रंजनकारी भाग आहे. परंतु तो समजण्यास स्वरांची अत्यंत जरूरी आहे.
श्रुतींची संख्या बावीस व शुद्ध स्वरांची संख्या सात हयाबद्दल आतां कोणत्याहि ग्रंथांत व ग्रंथकारांत द्विमत नाही. ही गोष्ट सर्वास सारखीच मान्य आहे.
श्रुतीबद्दल विनाकारण गैरसमज होऊं नये म्हणून त्यांबद्दल थोडयांत माहिती सांगतों. ऐकूं येण्याजोगा, एकापेक्षां दुसरा भिन्न व रंजनकारी असा जो गायानोपयोगी नाद त्याचें नांव श्रुति. असे गायनोपयोगी नाद त्याचें नांव श्रुति. असे गायनोपयोगी नाद अथवा श्रुति गायनांत बावीस मानितात. यापेक्षां त्यांत कांही गूढ नाहीं.
आतां नाद अथवा श्रुति व स्वर यांमध्ये अंतर काय तें पाहूं. ह्या बावीस नादांपैकी जितक्या नादांची योजना एखाद्या रागांत केली असेत तितक्या नादांस त्यावेळेपुरती स्वर ही संज्ञा प्राप्त होते. रागांत श्रुति लागल्या म्हणजे त्यांस स्वर ही संज्ञा प्राप्त होते व रिकाम्या असल्या म्हणजे श्रुति. नादास जेव्हां स्वरत्व ही संज्ञा प्राप्त होते. त्या वेळी यासंबंधी त्यांचें नादत्वहि कायम असतें हे सांगणें नकोच. रागाच्या दृष्टीनें त्याला हें नवें नांव प्राप्त होतें इतकेंच. ह्यासंबंधी बराच गैरसमज दृष्टीस पडतो. म्हणून थोडें जास्त विवेचन करणें जरुर वाटलें.
प्रत्येक जुना नवा ग्रंथकार श्रुति बावीस व शुध्द स्वर सात मानितो हें वर सांगितलेंच आहे. श्रुति म्हणजे काय हेंहि वर सांगितलें. आतां शुध्द स्वर म्हणजे काय हें सांगतों. ह्या बावीस नादांपैकीं ४, ७, ९, १३, १७, २०, २२, ह्या नंबरचे जे नाद अथवा श्रुति त्यांस शुध्दस्वर अशी संज्ञा देतात. त्यांची नांवें क्रमानें सा, रे, ग, म, प, ध, नी अशीं आहेत.
प्रत्येक ग्रंथकारानें आपल्या ग्रंथाच्या स्वराध्यायांत शुध्द स्वर सात, त्यांपेक्षा भिन्न जे ते विकृत असें म्हणून त्यांच्या व्याख्या व त्यांची संख्या सांगितल्या आहेत. विकृत स्वरांत ग्रंथकारांमध्ये मतभेद आहे.
आपल्या स्वरांचें व त्यायोगें आपल्या ग्रंथांचें ज्ञान योग्य व्हावें म्हणून प्रत्येक ग्रंथकारानें आपलीं स्वरस्थानें वीणेवर पडदे बांधून समजावून दिलीं आहेत. येथें एक गोष्ट ध्यानांत ठेवण्याजोगी आहे ती ही कीं, स्वराध्यायांत ग्रंथकार शुध्द विकृत मिळून कितीहि स्वर सांगो, परंतु वीणेवर मात्र तो शुध्द विकृत मिळून वाराच स्वर सांगतो; त्याप्रमाणें रागाध्यायांत राग सांगतांनाहि बराच स्वरांनी राग समजावून देतो. ही वहिवाट आज पांचसातशें वर्षांची जुनी आहे. व हीच पध्दति विसाव्या शतकांतील प्रसिध्द ग्रंथकार चतुरपंडित हयानें अंगिकारली आहे.
प्रत्येक ग्रंथकार आपल्या शुध्द स्वरांची अशी व्याख्या देतो. –
चतुश्चतुश्र्वतुश्र्वैव षड्जमध्यमपंचमा: I
द्वे द्वे निपादगांधारौ त्रिस्त्री रिपभधैवतों II
एते पड्जादय: सप्त स्वरा: शुद्व: प्रकीर्तिता: II
हें शुध्द स्वरांचे लक्षण जर सर्व ग्रंथकारांचे एकसारखें तर त्या शुध्द स्वरांपासून बनणारा जो राग असेल तो प्रत्येकाचा सारखाच असता पाहिजे. पण वस्तुस्थिति तशी नाहीं, म्हणजे प्रत्येकाचा शुध्द स्वरांचा राग जमत नाहीं. असे कां व्हावें ? चूक कोठें आहे हें पाहणे जरुर आहे.