प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
स्वरांतील भेद– प्रत्येक ग्रंथकाराच्या शुध्दस्वरांची नांवें जरी एकच असलीं तरी त्याच्या स्वरांच्या ध्वनींमध्ये भिन्नता असलीं पाहिजे; व तशी जर ती नसेल तर सर्व ग्रंथकारांचे शुध्द स्वरांचे राग एकसारखेच असले पाहिजे होते, परंतु ते तसे नाहींत हा अनुभव आहे. तेव्हां त्यांच्या स्वरनामांत जरी साहृश्य असलें तरी त्यांच्या ध्वनीमध्यें साम्य नाहीं हें उघड आहे.
इ.स. १५५० हया वर्षी स्वरमेलकलानिधि ग्रंथ रामामात्य पंडितानें लिहिला. अहोवल पंडितानें सतराव्या शतकाच्या पूर्वाधांत पारिजात ग्रंथ लिहिला. व चतुर पंडितानें (रा. भातखंडे यांनीं) विसाव्या शतकाच्या प्रारंभी लक्ष्य संगीत हा ग्रंथ लिहिला. निरनिराळया काळाचे हे तीन ग्रंथ आपण नमुन्याकरिता घेऊं. हे तीन ग्रंथकार आपले शुध्द स्वर सारखेच सांगतात. तेव्हां हया प्रत्येकाचा शुध्दस्वरराग दुस-याच्या शुध्द स्वररागाशी मिळाला पाहिजे, म्हणजे रामामात्याचा शुध्दस्वरराग मुखारी, पंडित अहोवलाचा शुध्दस्वरराग सैंधव व चतुर पंडिताचा शुध्दस्वरराग विलावली हे तीन राग एकसारखे कानाला लागले पाहिजेत. पण हे तीन राग निरनिराळे कानाला लागतात हा अनुभव सर्वांनां आहे, तेव्हां ह्यांच्या स्वरांत धनिसाम्य नसलें पाहिजे हें सिध्द आहे. आतां ह्या सात शुध्द स्वरांत ध्वनिसाम्य कोणांत आहे व कोणांत नाही हें पाहूं.
निरनिराळ्या काळांतील ह्या तीन पंडितांचे सा, म, प, हे तीन शुध्द स्वर ध्वनिसाम्यानें एक आहेत हें कोणासहि अनुभवानें कबूल करणें भाग आहे. बाकी स्वर राहिले चार रि, ग, ध, नि. ह्यांच्यांत तसें ध्वनिसाम्य अर्थात् नाहीं; कारण, ध्वनिसाम्य असतें तर राग जमलेच पाहिजे होते.
पं. रामामात्यानें आपले शुध्द स्वर वीणेवर कोणत्या पडद्यावर अभिव्यक्त होतात हें वीणाप्रकरणांत स्पष्ट सांगितलें आहे. तशाच प्रकारची वीणा हल्लीं दक्षिणेकडे प्रचारांत आहे. तेव्हां त्या स्वरांच्या किंमती दक्षिणेंत काय आहेत हें पाहिलें म्हणजे पं. रामामात्याचे हे स्वर काय किंमतीचे होते हें सहज कळून येईल. तसेंच, पं. अहोवलानें आपल्या सात शुध्द स्वरांच्या जागा वीणेवर तारेच्या लांवीनें सांगितल्या आहेत. तेव्हां त्यांच्या किंमती काढणें कठीण नाहीं. त्याच प्रमाणें चतुर पंडितानें आपल्या शुध्द स्वरांच्या किंमती स्पष्ट आपल्या हिं. सं. पध्दति भाग २ ह्यांत सांगितल्या आहेत.
पाश्र्चात्य लोकांचा व आपला संबंध आल्यापासून त्यांच्या ज्ञानाचा फायदा आपणांस मिळत आहे, त्यांच्याकडे ध्वनिशास्त्रावर अनेक ग्रंथ झाले आहेत; तसेंच, गायनोपयोगी ध्वनिशास्त्र या विषयावरहि ग्रंथ झाले आहेत. तसेंच, त्यांनी एक यंत्र तयार केलें आहें; त्यास सायरन म्हणतात. त्या यंत्राच्या साह्याय्यानें आपणांस आपल्या अपेक्षित ध्वनीच्या लहरी मोजितां येतात. तसें त्या अपेक्षित स्वरांच्या ध्वनिलहरी काढिल्या म्हणजे आपणांस तुलनेनें फरक समजून येईल व अपेक्षित कार्य सहज होईल.