प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
स्वरांची मुखांतून व तिची मीमांसा.– स्वर लहानमोठे उच्चारले जातात. ते तोंडाच्या कोणत्या भागांतून निघतात इत्यादि गोष्टींचें अवलोकन प्राचीनांनीं कितपत केलें होते हे पहाणें आहे. त्यांनी काही अवलोकन केलें होतें हे खास. उर, कंठ व शिर ही तीन स्थाने म्हणजे अनुक्रमे मंद्र, मध्यम व तार ( उत्तम ) या तीन स्वरांची उत्पत्तिस्थलें आहेत. उरस्थलापासून केलेल्या शब्दोच्चारणाला प्रात:सवन, कंठस्थानापासून केलेल्या शब्दोच्चारणाला माध्यंदिनसवन आणि शिरस्थानापासून केलेल्या शब्दोच्चारणाला तृतीयसवन अशी संज्ञा आहे. अत्यंत हळू हळू उच्चारलेला स्वर तो मंद्र, मोठयाने उच्चारलेला तो मध्यम व अतिशय मोठयानें उच्चारलेला स्वर तो तार होय. क्रुष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, मंद्र, आणि अतिस्वार ह्या सात स्वरांचा उच्चार सामगान करणारे करीत असत. लहान स्वर, मोठा स्वर फार मोठा स्वर अशा तऱ्हेचें प्राथमिक वर्गीकरण होतें ते सप्तस्वर सांपडल्यानंतर त्यांशीं मिळतें करुन घेण्याचा प्रयत्न झालाच आहे.
उत्तरकालामध्ये स्वरांची ही जुनी नावें मागें पडून लौकिकगायनांतील स्वरांना विद्यमान असलेली षड्ज ॠषभादि नांवेच सामगानांतील स्वरांना रुढ झाली असे आढळून येते. [ ना. शि. ५ ]