प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
स्वरमापन.– स्वर निर्णीत झाले. पण ते कागदावर लिहावयाचे कसे, मोजावयाचे कसे इत्यादि प्रश्न शास्त्रीय अभ्यासकांच्या पुढे रहाणारच. त्या काळांतील ध्वनिमापनसाधने अल्प असतां त्यांनी हें कार्य कसें केलें हें पहाण्यासारखें आहे. हल्ली लौकिकगायनामध्ये ज्याप्रमाणे लांकडाची भोपळा लाऊन केलेली वीणा उपयोगांत आणतात त्याचप्रमाणें सामगायक हे सामगायनामध्ये ‘गात्रवीणा’उपयोगात आणीत असावेत असें दिसतें. लाकडी वीणेच्या निरनिराळया पडद्यांपासून ज्याप्रमाणे निरनिराळे स्वर निघतात त्याचप्रमाणे शरीराच्या निरनिराळया गात्रांपासून निरनिराळे स्वर निघतात. यावरुन आपल्या शारीर गात्रांना अनुलक्षून प्राचीन सामगायकांनी ‘गात्रवीणा’ हा शब्द रुढ केला असावा हे उघडच दिसते. गाणारे स्वरोच्चारण करतांना हावभाव करतात. ते हावभाव स्वरमापनाकडे लावून उपयुक्त करण्याचाहि प्रयत्न झाला होता. क्रुष्टस्वर हा अंगठयाचे टोंकास स्पर्श करुन व्यक्त करावयाचा असून अंगठयाचे मध्य प्रदेशास स्पर्श करुन प्रथम स्वर व्यक्त करावयाचा असतो. तर्जनीच्या ठिकाणी गांधार, मध्यमेच्या ठिकाणी ॠषभ, अनामिकेच्या ठिकाणी षड्ज, व करंगळीचे ठिकाणी स्पर्श करुन धैवत व्यक्त करावयाचा असतो. करंगळीचे मुळाशी स्पर्श करुन ‘निषाद’ हा स्वर व्यक्त करावयाचा असतो.
कोणत्या स्वरांनी कोण संतुष्ट होतात इत्यादि प्रकारचे काव्यहि गायक मंडळींनी करण्यास सोडले नाही. या प्रकारचे काव्य करणे हे भिक्षुकी धंद्याला थोडेबहुत सोइस्करहि झाले असावे.
षड्ज स्वर कंठापासून, ॠषभ शिरापासून, गांधार नासिकेपासून मध्यम उरापासून, उत्पन्न होतो. उर, शिर व कंठ या तीन स्थानांपासून पंचम स्वर उत्पन्न होत असून ललाटापासून धैवत व सर्व संधीपासून निषाद हा स्वर उत्पन्न होतो. असें नारदी शिक्षेत दर्शित केले असून षड्जादि स्वरांच्या व्याख्याहि थोडक्यात दिल्या आहेत त्या पुढे दिल्याप्रमाणे :-
नासिका, कंठ, उर, तालु, जिव्हा व दांत या सहा स्थानांपासून उत्पन्न होणारा स्वर तो ‘षड्ज’होय.
नाभीपासून उत्थित झालेला वायु कंठ, शिर या स्थानांना स्पर्श करतो व वृषभाप्रमाणे डुरकतो त्यावेळी जो स्वर उत्पन्न होतो तो ‘ॠषभ’ स्वर समजावा. इत्यादि प्रकारांनी त्यांनी विवेचन केले आहे.