प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.      

सामें, सामवाङमय आणि संगीतशास्त्र:- वेदविद्या म्हणजे यज्ञविद्या किंवा यज्ञास लागणाऱ्या निरनिराळया ऋृत्विजांची विद्या.या विद्येतच सामांचा अतंर्भाव होत असल्यामुळें दर्शनें किंवा वेदांगें यांच्या अगोदर संगीत शास्त्राची माहिती दिली पाहिजे.पण विवेचनाच्या सोईसाठीं छंद:शास्त्राची माहिती अगोदर देण्यांत आली. संगीतशास्त्र, यालाच याज्ञिकांचा शब्द सामवेद होय.पण सामवेद या शब्दांत संगीताचें ध्वनिशास्त्र अथवा ध्वनिसंतति कौंशल्य एवढाच अर्थ द्दष्ट नव्हता. तर कोणत्या यज्ञांगाच्या वेळेस कोणते गाणे म्हणावे या संबंधीच्या विचाराचाच त्यात समावेश होई.

सामवेद याची व्याख्या करावयाची म्हणजे यज्ञांतर्गत-संगीत-योजना-ज्ञान अशी करता येईल.