प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
सामवेदीय स्वरविचार.– आजच्या लौकिक गानामध्ये सा, रे, ग, म, प, ध, नी, हे सप्त स्वर धरतात व त्यांस षडज, ॠषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद, ही नांवे आहेत. आजची आपण सामवेदसंहितेची पिथी घेतली तर सामवेद म्हणताना सात स्वर वापरीत होते असा भास होतो. पण पोथीवर आंकडे केव्हां घातले गेले हा प्रश्न आहे. नारदी शिक्षेप्रमाणे सामसंगीतात सात स्वर दिसतात. तथापि, त्यांचा अनुक्रम लौकिकांसारखा नाही. लौकिकामध्यें स्वर पहिल्या स्वरापेक्षां दुसरा मोठा, दुसऱ्यापेक्षां तिसरा मोठा, असे आरोहक्रमानें मांडले आहेत. तर सामसंगीतातील सप्तस्वर म, ग, रे, सा, नी, ध, प अशा क्रमाने आजचे स्वर मांडल्यासारखे होतील. म्हणजे, लौकिकगानामध्ये सात स्वरांत केवळ शुद्ध आरोहअवरोह क्रम आहे, तर वैदिक सामसंगीतात अवरोहारोह क्रम आहे. ही सात स्वरांची योजना एकदम झाली काय, हा प्रश्न आपल्यापुढें आहे. कलेची वाढ आपणांस तपासतां येणार नाही. कारण, सामे ज्या वेळेस म्हणत होते त्या वेळचे नादलेख आपल्यापाशीं नाहींत. तथापि सात स्वरांचे गाणें देखील एकदम वाढले नसावें अशी कल्पना करण्यास जागा आहे.