प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.          


सामांची नामकरणपद्धति.– ही नांवे फारच थोडी आहेत.  सामसंहितेमध्ये हजार दीड हजार ॠचा आहेत.  त्या कोणत्या चालीत गावयाच्या हे सायणांनी आपल्या भाष्यांत स्पष्ट केलें आहे.  कित्येक ॠचा तीन किंवा चार चालीत देखील गाण्यासंबंधाने पद्धति दाखविली आहे.  म्हणजे एकंदर तीन हजारांवर चाली सामवेदांत आहेत.  या चालीस नांवे दिली आहेत.  त्या नांवापैकी काही नांवे ज्या ॠचेच्या आश्रयाने साम म्हटलें जाई त्या ॠचेच्या आरंभशब्दावरुन किंवा अंत्यपदावरुन किंवा ज्या छंदामध्ये ती ॠचा असेल त्या छंदावरुन दिली आहेत.  कित्येक नांवे व्यक्तीवरुन दिली आहेत.  त्या नांवाची तपासणी केली असतां बराच इतिहास सापडेल.  सामवेदांतील एकंदर सामांची संख्या अडीच हजारांपेक्षा जास्त आहे.  तथापि सारख्याच चालींची सामें वगळून राहिलेल्या भिन्न भिन्न चालींच्या सामांची संख्या हजाराच्या आंतबाहेरच भरेल.  सर्व सामांची नांवे देत बसण्यास अवकाश नाही, तरी मासल्यासाठी पांचसहाशे नांवे पुढे देत आहोत.  सामांच्या नांवांची ही यादी देण्यांतील मुख्य उद्देश अभ्यासकांना सामांच्या नांवावरुन त्यांच्या कर्त्याचा अगर त्या कर्त्याने केलेल्या सामरचनेचा इतिहास हुडकण्यास मदत व्हावी हा होय.  कांही सामांना त्यांच्या ठिकाणच्या विशिष्ट रचनेवरुन नांवे दिली आहेत.  उदाहरणार्थ, `दैवातिथ` हे साम घेऊं.  दैवातिथ हे साम ‘आत्वेतानिषीदत’ या ॠचेवर गाईलें आहे किंवा बनविले आहे; व त्या ॠचेचा द्रष्टा ‘मधुच्छंदा` नामक ॠषि आहे.  अर्थात् मधुच्छंदा ॠषीने ॠचा द्दष्ट केली परंतु तिजवर ‘देवातिथ’ॠषीने सामगायनाची रचना करुन ह्या सामास आपले दैवतिथ हे नांव ठेविले आहे असे दिसून येते.  एखादे नवे शहर वसविल्यावर त्याला वसविणारा अगर दुसरा कोणी पुरुष आपले नांव देतो त्यातलाच हा प्रकार आहे.  ‘मधुश्चुत्’ या नांवाचे एक साम आहे.  त्या सामाची रचना पाहता त्याचे निधन किंवा शेवटचे पालुपद मधुश्चुत ता २ ३ ४ ५ असे आहे.  अर्थात् त्यावरुन या सामाला ‘मधुश्चुत्’ हे नांव दिले गेले असले पाहिजे हे उघड आहे.  त्याचप्रमाणे ‘इडा` असे निधन किंवा पालुपद असलेले साम ते ऐड होय.  कांही कांही सामांची नांवे त्यांच्या आश्रयभूत अशा ॠचांच्या छंदावरुनच दिली गेली आहेत.  हसे बृहतीछंदात्मक ॠचेवर गाइलेले साम ते ‘बृहत` व त्रिष्टुप् छंदातील ॠचेवर बनविलेले साम ते ‘त्रैष्टुभ` होय.

सारांश सामांच्या नांवाच्या रचनेच्या वैशिष्टयावरुन त्यांच्या कर्त्यासंबंधी माहिती व त्या वेळच्या काळाचा बोध होण्यास बरीचशी मदत होईल.  पुढे दिलेल्या यादीत क्वचित द्विरुक्ति होण्याचा अगर क्वचित् सामांचा निर्देश न होण्याचा संभव असला तरी दिलेल्या यादीवरुन अभ्यासकांना पुष्कळ गोष्टी अभ्यासितां येतील.

 सामवेदावरील ब्राह्मण ग्रंथातील सामांची नांवे.