प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
सामवेदाच्या अभ्यासाची व्यापकता.– मागें [ विभाग २ प्रकरण ५ ] सामवेदाचे स्थूल वर्णन दिलेंच आहे. आर्चिकें, उत्तरार्चिकें म्हणून झालेला भेद तेथेंच वर्णिला आहे. सामांची प्राचीनता तेथे ॠग्वेदात आलेल्या सामांचा उल्लेख देऊन दाखविली आहे. सामांच्या स्वरांची मांडणी म्हणजे अत्यंत प्राचीन स्वरांकनपद्धति किंवा नोटेशन हेहि त्या ठिकाणी उल्लेखिलेले असून सामांचा श्रौत उपयोग कमी झाल्यानंतर त्यांचा अभिचारकर्माकडे कसा उपयोग होऊं लागला हेंहि स्पष्ट केले आहे. तथापि, या वेदाचे शास्त्रीय विवेचन तेथे करता आलें नाही. तिकडे आता आपण वळूं.
सामवेदाच्या शास्त्रीय विवेचनाची अंगे अनेक आहेत. सामवेद म्हणून जे ग्रंथ आपणापुढें दिसतात त्यांचा उद्गम, वृध्दि व इतर वाङमयाशी अन्योन्याश्रय या द्दष्टींनी अभ्यास. औद्गात्राचा म्हणजे यज्ञक्रियेचें एक अंग या द्दष्टीने सामवेदाचा अभ्यास या द्दष्टीनें अभ्यास करावयाचा म्हणजे यज्ञसंस्थेत जी स्थित्यंतरे वारंवार होत गेली त्या स्थित्यंतरांशी सामवेदविकासाच्या पायऱ्यांचा संबंध निश्चित करावयाचा. तिसऱ्या प्रकारचा अभ्यास म्हणजे सामवेदाचा मुख्य विषय जो संगीतशास्त्र त्याचा अभ्यास. या सर्व प्रकारचा अभ्यास आपणास महत्वाचा आहे.