प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.      
 
सामसंहिता.– औद्गात्रांतील वाङमय बहुतेक आठव्या आणि नवव्या मंपलांत सांपडते.  बरीचशी सूक्तेच् पहिल्या व दहाव्या मंडळात सापडतात.  इतर मंडळात तीं अतिशय थोडीं सांपडतात म्हणजे बहुतेक सामे गोत्रमंडळाबाहेर सांपडतात.  म्हणजे ज्या सात गोत्रांच्या वाङमयाने हौत्रसंस्था संवर्धित केली त्यांच्या बाहेर उद्गात्याच्या वाङमयाचा उगम आहे.  पण तो उद्गा्त्यांचा वर्ग हौत्रवेत्यांच्या अगदीच बाहरेचा नसावा.  त्यांच्या विद्येस जेव्हां प्रामुख्य आले तेव्हां त्यांच्या सूक्तांचा प्रवेश हौत्रवेदांत झाला असेल.  कदाचित असेंहि असेल की, सामक ज्या ॠचा म्हणत त्या होत्यांमधील विशिष्ठ गोत्राच्या मालकीच्या नसून सर्वांच्याच मालकीच्या असाव्यात.  त्या कोणी साध्या चालीवर म्हणत आणि कोणी विशेष धाटणीवर म्हणत.  साध्या चालीवर पण हौत्राकडे वापरल्या जाणाऱ्या म्हणून त्या हौत्रवेदांत शिरल्या आणि विशेष धाटणीवर म्हटल्या जाणाऱ्या म्हणून त्या ॠचा व त्या धाटण्या सामवेदांतर्गत झाल्या; आणि हीच गोष्ट अधिक संभवनीय दिसते.  कां की, यागामध्यें शस्त्रें पठन करतांना शस्त्राच्या प्रारंभीच्या ३ ॠचा उद्गाता धाटणीवर गातो; आणि होता त्याच पुन्हां म्हणून आणखी विशिष्ठ ॠचा पुढें म्हणतो.