प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.          

सामवेदांतर्गत संगीतशास्त्र.– सामवेदाच्या इतिहासाच्या अंगापैकी (१) वाङमय व (२) गुरुपरंपरा यांचा विचार येथपर्यंत झाला.  (३) याशिवांय या शास्त्राचे आणखी एक अंग म्हटले म्हणजे यज्ञयोजना हे होय.  हा सर्व संगीत शास्त्राच्या उपाधींचा इतिहास होय.  विशिष्ट साम कोणत्या प्रसंगी वापरावें याविषयीं येथे विशेष लिहिण्याचे प्रयोजन नाही.  तो संगीतप्रगतीचा इतिहास नसून ते यज्ञविषयक कर्तव्यात्मक विवेचन होय.

या गुरुपरंपरांच्या यादी येथें आम्हीं दिल्या आहेत,  तथापि गुरुपरंपरांची संगति लावून इतिहासाचे धागे अधिक जमवावयाचे हे काम हाती घेतां येत नाही.  सामवेदापासून अर्वाचीन संगीताचा संप्रदाय निघाला असेलच असें वाटत नाही.  एखादी क्रिया शास्त्राचे म्हणजे व्यवस्थित मांडणीचे स्वरुप पावते तेव्हां ते स्वरुप पुष्कळदां ती क्रिया करण्यासाठींच असते.  ती मांडणी सर्व प्रकारच्या प्रसंगांना पुरी पडत नाही.  प्रसंग बदलला म्हणजे व्यवस्थित मांडणी करण्याची पद्धत बदलावी लागणार.

सामवेदापासून अर्वाचीन संगीतशास्त्र निघालें अशी कल्पना स्वीकारण्यास अनेक अडचणी उत्पन्न होतात.  मागे सामवाङमयाची जी परंपरा दिली आहे तीवरुन आपणास असे दिसून येईल की ज्या वेळी देशांत संगीतशास्त्र वाढत होते तेव्हां सामपरंपरेचे ग्रंथहि निघत होतेच.  अलीकडे नवीन ग्रंथहि निर्माण होत आहेत व पुढेंहि होतील; पण जुनी सामगायनाची परंपरा चालू आहे असे वाटत नाही.  उलट पक्षी विरुद्ध पुरावा सांपडेपर्यंत ती परंपरा तुटली असें धरुन चालणेच आम्हांस प्राप्त आहे.

सामवेदावरील पाश्वात्य अभ्यासक फार थोडे आहेत.  सामवेद्यांची परंपरा अविच्छिन्न आहे अशी कल्पना करणें अशक्य आहे.  पुष्कळ सामवेदी ब्राह्मणांचा आचार आजच्या ब्राह्मणांच्या द्दष्टीने शूद्रांसारखा आहे.  महाराष्ट्रांत सामवेदी फक्त उत्तर कोकणात आहेत.  तेहि गुजराथकडचे असावेत.  थोडेसे दक्षिणेत, थोडेसे गुजराथेंत व थोडेसे मेवाडांत सामवेदी सापडतांत.  शिवाय कांही बंगाली आणि तेलंगी सामवेदी आहेत.  संगीतशास्त्री रा. ग. गो. बरवे हे सामवेद्यांच्या गायनाच्या चालू परंपरेचा शोध करण्यासाठी बंगालमध्ये, काशीकडे आणि दक्षिणेंत प्रवास करीत असतां त्यांस असे आढळून आलें की, जे सामगायक सामें गाऊन दाखवितात त्यांचा ग्रांथिक सामसंगीताशी मुळींच परिचय नसतो.  ॠग्वेदी लोकांमध्येच जर प्रातिशाख्ये शिकून संहिता म्हणणारे फार थोडे आहेत., तर ॠग्वेद्यांपेक्षा प्राचीन संस्कृतीपासून अधिक अपसृष्ट झालेल्या सामकांमध्ये परंपरा अविच्छिन्न राहिली असेल अशी अपेक्षाच चुकीची होईल.

सामसंगीतावर जे अनेक लेखक दिसतात त्यापैकी बरेच लेखक स्वत:ला फारसे काहीं समजलें नसता समजले आहे असें ढोंग करणारे दिसतात.  यामुळे त्यांच्या लेखांवर भिस्त ठेवून चालणे धोक्याचे आहे.

सामसंगीत कसें काय होते हें निश्चयानें सांगणे फारच कठिण आहे.  आज जर अनेक सांप्रदायिक उद्गात्यांची सामे ध्वनिलेखांत उतरुन ठेविलीं तर त्यांचा थोडाबहुत अभ्यास करतां येणे शक्य आहे.  निदान शास्त्रीय अभ्यासाची ही पूर्वतयारी झाली असे होईल.  चांगले उध्वाते सर्व हिंदुस्थानांतून गोळा केले पाहिजेत आणि निरनिराळयांचे गानालाप उतरुन ठेविले पाहिजेत.