प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.      

सामवेद म्हणजे यज्ञांतील गाण्यांच्या उपयोगाचे ज्ञान.– उदगात्याच्या सबंध विद्येमध्ये दोन गोष्टीचा अंतर्भाव होई.  एक तर त्याचे संगीतशास्त्र आणि दुसरे म्हटले म्हणजे यज्ञांत इतर ॠत्विजांशी सहकारिता करण्यास अवश्य असलेले यज्ञसंस्थेच्या स्वरुपाचे ज्ञान.  कोणत्या यज्ञांत कोणत्या देवतेस उद्देशून कोणतें गाणे गावें, कोणत्या प्रसंगाला कोणती ॠचा गावयास योग्य आहे इत्यादि बाबतीत त्याची तयारी असली पाहिजे.  म्हणजे गायनकला व यज्ञविधीचे ज्ञान ही दोनही मिळून उद्गात्याची विद्या होते.  ही सर्व विद्या सामवेद ग्रंथात येत नाही.  यज्ञासाठी वैदिक वाङमय तयार झालें असल्यामुळें गात्यास यज्ञविषयक ज्या गोष्टी शिकविणे जरुर आहे त्या गोष्टी सामवेदाच्या ब्राह्मणांत बोधिल्या आहेत.