प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
सामवेद म्हणजे गाण्यांच्या चाली होत वाङमय नव्हे.- `स्वरांचे आलापन करुन गाइलेले स्तोत्र. `साम’ शब्दाने ॠचेची ( मंत्राची ) अक्षरे व त्यांच्या द्वारां व्यक्त होणारी स्वरमालिका या दोहोंचे ग्रहण करावे लागते; तथापि स्वरालापन हें सामाचे प्रधान अंग असून ॠगक्षरांचे उच्चारण हे गौण आहे. स्वरालापन म्हणजे गायन. अर्थात गायनप्रधान अशा सामवेदाची आोळख करुन घ्यावयाची म्हणजे त्यातील गाण्यांची आोळख करुन घ्यावयाची. सामगायन कानाने ऐकताना जरी अक्षरांच्या मालिका कानांवर पडतात तरी त्या अप्रधान असून, त्यांच्या आश्रयाने ऐकू येणारी स्वरांची मालाच मुख्य रंजक होय. तात्पर्य हें की, साम हे स्वरप्रधान आहे. सामवेद म्हणून जे पुस्तक दिसतें ते ज्यांच्या आश्रयावर सामगायन गाइले जाते किंवा निरनिराळी गाणी गाइली जातात त्या ॠचांचा समूह होय. `गीतिरुपा मंत्रा: सामानि’अशी सामांची व्याख्या पूर्वीच्या शास्त्रज्ञांनी केली आहे. `गीतिषु सामाख्या’अशी जैमिनीची व्याख्या असून गीतीच्या म्हणजे गीतांच्या ठिकाणी सम ही संज्ञा प्राप्त होते असे त्या व्याख्येचे तात्पर्य आहे. ॠक, यजु: व साम ही अनुक्रमे पद्यरुप, गद्यरुप व गीतिरुप आहेत. सा + अम = साम. अक्षरसमूहात्मक अशी स म्हणजे ॠगरुपी वाक् ( वाणी ) असून अम म्हणजे ( अक्षर व्यतिरिक्त ) केवळ स्वर होत. `सा’( ॠगक्षररुपवाणी ) व `अम’( केवळ स्वर ) ह्या दोहींचे एकीकरण म्हणजे साम असा अर्थवाद ऐतरेय ब्राह्मणात आला आहे. सामगायनाचें स्वरुप ॠगक्षरांच्या ठिकाणी निरनिराळया स्वरांच्या आलापनाने ( निरनिराळे स्वर आळवून म्हटल्याने ) निषपन्न होत असते. छांदोग्योपनिषदांत शालावत्यदालभ्य संवादामध्यें स्वरांचे सामनिष्पादकत्व दाखविलें आहे. शालावत्याने `का साम्रोगति:’सामाची गति कोणती ? असा प्रश्न विचारला आहे व `स्वर इति होवाच’स्वर ( ही सामाची गति होय ) असें दालभ्याने उत्तर दिलें आहे. काण्वश्रुतीमध्येहि `तस्यहैतस्य साम्नो य:स्वं वेद भवति हास्य स्वं, तस्य स्वर एव स्वम् इति’ असे वर्णन असून, `त्या सामाचे जो स्वत्व जाणतो तो स्वत: सामस्वरुप होतो त्यास स्वर हेंच सामाचे स्वत्व वाटतें – असा आशय व्यक्त केला आहे. ज्याप्रमाणे ॠग्वेद म्हणजे अमुक स्तोत्रें नसून ती होत्यांची विद्या आहे, त्याप्रमाणेच सामवेद म्हणजे केवळ अमुक सूक्ते नसून ती उद्गात्यांची सबंध विद्या होय.