प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.           
 
सात स्वर.– सप्तस्वरात्मक गायनपद्धतीच्या प्राचीनतेच्या विरुद्ध आधार दाखविले तथापि काही उल्लेखांवरुन सप्तस्वरात्मक संगीत फार प्राचीन असावें अशी कल्पना होते, “सप्तधा वै वागवदत्तावद्वै वागवदत्” अशी ऐतरेय ब्राह्मणांतील दुसऱ्या पंचिकेच्या ७ व्या खंडात एक पंक्ति आहे.  तिचा अर्थ “लौकिक गानरुपी वाणी जशी `सप्तधा’ म्हणजे सात प्रकारांनी - षड्जादि स्वरांनी – गाइली जाते त्याचप्रमाणें वैदिकगानरुपी वाणीहि क्रुष्टदि सात स्वरांनी सात प्रकारांनी गाइली जाते” असा आहे.

आजच्या लौकिक गानांत आणि सामसंगीतात शास्त्रज्ञ एका काळी सात स्वर मानीत असत.  सामे ज्या वेळेस तयार झाली त्या वेळेस किती स्वर वापरीत असत हे आपणांस ठाऊक नाही आतां प्रश्न हा की, आजच्या षड्जाच्या बरोबरचा प्राचीनांचा म्हणजे बऱ्याच उत्तरकालीन सामकांचा स्वर कोणता होता ?  याविषयीं नारदीय शिक्षेचे सूत्र येणेप्रमाणें आहे :-

य: सामगानां प्रथम: स वेणोर्मध्यम: स्वर: ।
यो द्वितीय: स गांधारस्तृतीयस्त्वृषभ: स्मृत:  ॥
चतुर्थ: षड्ज इत्याहु: पंचमो धैवतो भवेत् ।
षष्ठो निषादो विज्ञेय: सप्तम: पंचम: स्मृत: ॥

यावरुन नारदीय शिक्षेप्रमाणे सामवेदीय क्रुष्ट प्रथमादि स्वरांच्या मांडणीप्रमाणे लौकिक स्वरांची प, म, ग, रे, सा, ध, नी अशी मांडणी केली असतां सामसंगीतांतील सप्त स्वर प्राप्त होतात.  या विधानाचा काय अर्थ होतो तो पाहू.

(१)प, म, ग, रे, सा, हा अनुक्रम `सा’ पर्यंत उतार दर्शवितो.

(२)सा, ध, नी हा जो अनुक्रम आहे त्यात थोडासा घोटाळा हा घोटाळा  `ध’ व ‘नी’ यासंबंधाचा आहे.  ध हा सातवा आणि निषाद हा सहावा असे येथे धरले आहे.

रेव्हरंड पॉपले यांनी आपल्या ‘म्युझिक ऑफ इंडिया’( मद्रास १९२१ ) ग्रंथात लौकिक व सामकांच्या स्वरांचे समीकरण खालीलप्रमाणे केलें आहे.  पण तें कोणत्या आधारावर केलें तें समजत नाही.  आम्हांस पॉपलेनी अडचणीवरुन काही तरी कल्पना करुन उडी मारली असा संशय येतो.

क्रुष्ट मध्यम
प्रथम गांधार
द्वितीय ॠषभ
तृतीय षड्ज
चतुर्थ निषाद
मंद्र धैवत
अतिस्वार पंचम