प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
सयमक कविता.- संस्कृतमध्यें सयमक कविता फारशी नाहीं, तथापि यमकांची आवड प्राचीन काळापासून थोडी बहुत असावी. धृपदाची योजना यमकाची तृष्णा दर्शविते. याशिवाय वैदिक वृत्तांत यमकाचा आभास मधून मधून आढळतो. उदाहरणार्थ पुढील ऋचा अत्यष्टि छंदांतील आहे. त्याचे मुख्य चरण सात. मुख्य चरण १ यांतील पोटचरण २ व ३ यांच्या शेवटीं आणि मुख्य चरण ३ यांतील पोटचरण १ व २ यांच्या शेवटीं यमक असतें.
अयं जायत मनुषो धरीमणि होतायजिष्ठ उशिजामनुव्रतं अग्नि: समनुव्रतं । विश्वश्रुष्टि: सखीयते रयिरिव श्रवस्यते । अदब्धो होता निषददिळस्पदे परिवित इळस्पदे ( १. १२८. १ ).
हें उदाहरण एकाकी नाहीं. पहिल्या मंडळाच्या शेवटीं ( १२७ ते १३९ ) या तऱ्हेचीं सूक्तें बरींच आहेत. यावरून मंत्रोत्पत्तिाकालाच्या उत्तर भागांतच पण संहितीकरणापूर्वीच्या कालांत यमकें शिरूं लागलीं होतीं असें दिसतें.