प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
संहितांचा वेदमूलक शास्त्रांशी संबंध.- उत्तर कालीन विद्येचा किंवा शास्त्रांचा संबंध येणेप्रमाणें सांगतां येईल. वेदांगे व मीमांसा मंत्रब्राह्मणांच्या अभ्यासाच्या एकीकरणानें झाल्या आणि मीमांसेखेरीज दर्शने उपनिषदांपासून झालीं. मीमांसा, म्हणजे ब्राह्मणग्रंथातील अर्थवादांची सुधारलेली आवृत्ति आहे. यज्ञविषयक काय गोष्टी करावयाच्या तें विधिवाक्य सांगतें आणि त्या कां करावयाच्या हें सांगण्यासाठी अर्थवादात्मक वाक्य़ें उत्पन्न होतात. ब्राह्मणांत दोन्ही प्रकाराचीं वाक्यें आहेत. काय करावयांचे हें श्रौतसूत्रांत सांगितले आहें; आणि कां करावयांचे हें मीमांसेंत सांगितलें आहे. मीमांसकांचा वर्ग वेदकालांतहि होताच. बरीचशी मीमांसा अगोदर ब्राह्मणांतूनच आलेली आहे.
मीमांसेखेरीज इतर पांच दर्शने उपनिषन्मूलक आहेत. प्रकृतिपुरुपवाद आणि त्रिगुणवाद हा उपनिषदांतून सांख्यांत आलेला आहे. प्रत्येक वस्तूच्या आदिकरणाची चौकशी न्याय व वैशेषिक दर्शनांत व उपनिषदांत आहे. जगाचे भौतिक विवर्त न्याय व वैशेषिक तत्वज्ञानांत आहेत व त्यांस उपनिषदांचा आधार आहेच. ब्रह्म, आत्मा, एतद्विषयक विचार आणि मृत्यूनंतरच्या स्थितीचा विचार हा उपनिषादांत आणि बादरायण सूत्रांत पुष्कळसा सारखाच आहे. योगाचीं अनेक मतें उपनिषदांत पूर्वी व्यक्त झालेलींच आहेत.
गांधर्व वेद उर्फ संगीतशास्त्र याचा उगम सामांत दिसतच आहे.
गणितापैकी अंकगणिताचा उगम बराच प्राचीन असावा. वेदांत मोठमोठे संख्यावाचक शब्द आहेत. जे व्यवहार आपणांस वेदकालीन दिसतात ते गणिताचें कांही तरी ज्ञान असल्याशिवाय चालले असतील असें दिसत नाही. भूमितीचा प्रारंभ आपणांस शुल्बसूत्रांत दिसतो. तसेंच ज्योतिष वेदकालीन बरेंच वाढल्याचें वेदांतील उल्लेखांवरुन दिसुन येतें ( जुनाट ज्योतिष, विविधज्ञानविस्तार पु. २६ पहा ). वैद्यकाचा अथर्ववेदांत प्रारंभ झालेला दिसतो. त्यांत शल्यतंत्राचा देखील प्रारंभ दिसतो. अथर्व्यांच्या विदयेबरोबर प्राणिशास्त्र व वनस्पतिशास्त्र कांही अंशी वाढले असावें. तथापि एवढें कबुल करणें भाग आहे कीं या दोन शास्त्रांस पाश्चात्यांनी जशीं पद्धति लावली तशी इकङे कधीच लागली गेली नाहीं. रसायनशास्त्र पुढें तंत्रग्रंथाच्या काळांत वाढलें, रसायनशास्त्राचा इतिहास सुसंगतपणे लिहिण्यास आपल्याकङे साहित्य नाही. ज्योतिष, वैद्यक व गणित हीं भौतिक शास्त्रें व भाषाविषयक शास्त्रें यांमधील यांमधील प्रगतीचा भारतीय इतिहास दिला म्हणजे भारतीय शास्त्रांचा इतिहास दिला असें म्हणतां येईल.
वेद म्हणजे ( १ ) वाङ्मय गोळा करणें, (२) यज्ञ करणें, (३) संगीत करणे व (४) मंत्रौषधी करणें या चार गोष्टी. प्राचीन विद्या हींच होती.
वेदसंभवशास्त्रें म्हणजे वेदांगे आणि उपनिषन्मूलक शास्त्रें म्हणजे दर्शने हीं वेदोत्तरकालीन शास्त्रें होत. यांपैकीं संहितीकरण आणि यज्ञ करणे या दोन क्रियांचे वर्णन येऊन गेलेंच आहे. आतां छंद:शास्त्राकङे व संगीताकडे लक्ष देऊं.
छंदःशास्त्र आणि संगीतशास्त्र यांचे साहित्य जीं गाणीं तीं फार प्राचीन काळी तयार झाली असल्यामुळें या शास्त्रांस वेदमूलक शास्त्रेतिहासामध्यें अग्रस्थान दिलें तर तें वावगें होणार नाहीं.