प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.

संस्कृत छंद:शास्त्राचा प्राकृत छंद:शास्त्राशीं संबंध.– संगीत, छंद:शास्त्र, लौकिक ललितवाङमय आणि काही अंशी पारमार्थिक संप्रदाय यांविषयी असा एक नियम सांगता येईल की, मूळ पुष्कळदा सामान्य जनांत अवतरते, आणि नंतर ते संस्कृत भाषाबद्ध आणि संस्कृत वाङमयाशी संलग्न होते.  गायनाविषयीं हा नियम स्वाभाविक आहे.  कां की, गाणी म्हणण्याच्या चाली या सामान्य जनांत उत्पन्न होणार आणि नंतर त्यांना शास्त्रीबोवांनी शास्त्र लावलें म्हणजे तें मात्र संस्कृतमध्ये अवतरणार.  जैन व बौद्ध वाङमय प्रथमत: लौकिक भाषेंतच झालें आणि नंतर ते पंडितांच्या भाषेंत झालें.  लौकिक वाङमयाची आणि पंडिती वाङमयाची भाषा जशी निराळी तसे ग्रंथस्वरुपहि निराळेंच.  ललित वाङमयाची तीच कथा आहे.  कथासरित्सागरासारखे ग्रंथ अगोदर प्राकृत भाषते आणि नंतर संस्कृतमध्ये.  तोच नियम छंद:शास्त्रविषयीहि लागू पडेल.  छंद:शास्त्राविषयी असेंहि म्हणतां येईल की केवळ वृतेंच प्राकृतमध्ये नव्हती तर वृत्तांची लक्षणें देखील प्राकृत पिंगलासारख्या प्राकृत ग्रंथात विवेचिलीं आहेत.

संस्कृत प्राकृत हा भेद वैदिक भाषेचे जेव्हां संस्कृतीकरण झाले त्यानंतरचा.  वेदांतच कांही प्राकृत वाङमय आहे किंवा नाही ?  ॠग्वेदसूक्तांकडे लक्ष दिलें असतां असे आढळून येईल की, त्यांत अशी अनेक सूक्ते आहेत की ती झालीं त्या काळी ती शिष्ठवर्गास मान्य झाली नसावीत.  संहितीकरण अशा वेळेस  झालें कीं ज्या वेळेस मंत्र पुष्कळांना समजतनासे झाले होते, आणि त्यामुळे हौत्राच्या ॠचा म्हणतांना कोणी चावट गाणीं म्हटली तरी हरकत नसे.  संस्कृत उत्तानशृंगारिक कविता सभ्य मंडळीत म्हटली तरी चालते.  पण त्यापेक्षां कमी असभ्य अशा लावण्या सभ्यांत म्हणण्याची सोय नाहीं.  या प्रकारच्याच परिस्थितीमुळे पुष्कळ लावण्यासारखी काव्यें वेदांत शिरली.  अशापैकींच ( नवै कुमारि तर यथा कुमारि मन्यसे ) “नसे कुमारि मी तशी जशी कुमारि कल्पिशी”अशा वृत्ताची आणि अर्थाची वृत्ते ॠग्वेदपरिशिष्टांत व अथर्ववेदसंहितेत आढळून येतात.

या सूक्तांच्या चालीपासून लावणीचा काल फारसा दूर नाही असें सहजच आढळून येईल.