प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
संगीतसार- या सुमारास जयपूरचा महाराजा प्रतापसिंह (इ.स. १७७९ ते १८०४ ) यानें संगीतशास्त्रातील तज्ञांची आणि गवयांची जयपूर येथें मोठी सभा भरवून हिंदुस्थानी संगीतावर एक चांगला प्रमाणभूत ग्रंथ लिहीण्याचें काम हातीं घेतलें. अशा रीतीनें तयार झालेला ग्रंथ संगीतसार या नांवाने प्रसिद्ध आहे. हा ग्रंथ लिहीण्याचें काम उत्तम विद्वानांनकडून प्रसिद्ध झालें असल्याचे दिसत नाहीं. तथापि प्रचलित संगीतपद्धती संबंधानें अनेक गवयांची मते त्यांत संग्रहीत केली असून त्याचा भविष्य काळी आधारादाखल उपयोग होण्यासारखा आहे. या ग्रंथातहि 'वीलावल' स्वरमेल हेच शुद्ध स्वरसप्तक मानले आहे. कारण त्या वेळी हिदुस्थानी संगीतपद्धतीत हे शुद्ध स्वरप्तक मान्य झालेलें होते असें दिसतें.
१८४२ मध्यें कलकत्ता येथें प्रसिद्ध झालेल्या कृष्णानंद व्यासकृत संगीतरागकल्पद्रुम या ग्रंथांत हिंदी संगीतांतील उत्तम निवडक पद्यें एकत्र केलीं आहेत.
हया सर्व ग्रंथकारांनी संस्कृतांतील सा री ग म प् ध नी याच स्वरलेखनपद्धतीचा उपयोग केलेला आहे; आणि हीच पद्धती त्या ग्रंथात आधारभूत म्हणून घेतली आहे.