प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
शास्त्ररचना आणि संहितीकरण:- मनुष्यप्राण्यास लिहिण्याची कला, अकाचें ज्ञान, अंकदर्शनाचें ज्ञान, कालमापनाचें ज्ञान, हीं अत्यंत प्राचीन काळी लाभली नसून त्याची बरीचशी प्रगती झाल्यानंतर लाभलीं असें मागील विवेचनावरून दिसून येईल. ज्योतिषज्ञान कठिण वाटतें व तें उत्तरकालीं स्थापन झालें असावें असें स्वाभाविकपणें वाटणार. पण तें दिसतें तितकें अर्वाचीन नाही हेंहि अंशत: स्पष्ट केलेंच आहें.
बुद्धपूर्व जगाचा इतिहास देतांना असुरसंस्कृति स्थापन होण्यापूर्वी मनुष्यप्राणी कोणकोणत्या क्रिया करूं लागला होता याचीहि स्थूल कल्पना दिलीच आहे. जें त्यानें कार्य केलें त्यावरून त्याच्या व्यावहारिक ज्ञानाचा इतिहासहि आपणांस दृष्ट झालाच आहे. व्यावहारिक ज्ञानास शास्त्र ही संज्ञा आपण दिली नाहीं याचें कारण तें झान व्यवस्थित तर्हेने तो मांडावयास लागला नव्हता. मनुष्यास जें कांही व्यावहारिक ज्ञान असतें तें तो व्यवस्थित स्वरूपांत मांडावयास लागला म्हणजे त्याच्या ज्ञानास शास्त्राचें स्वरूप येऊं लागलें असें समजतात.
शास्त्रविकासाचा प्रारंभ कांहींतरी साहित्य जमविल्यानें होतो. साहित्य जमविणें ही पहिली क्रिया आणि त्याला व्यवस्थित स्वरूप देणें ही दुसरी क्रिया.संहितीकरण हे प्रत्येक शास्त्ररचनेचा प्रांरभ होय; आणि आपण ज्या वाङ्मयास संहिता हा शब्द लावतों तें वाङ्मय अनेक शास्त्रांचा प्रारंभ होय भौतिक शास्त्रांच्या आणि वाङ्मयमूलक शास्त्रांच्या घटनेची हीच रीत आहे. संहितीकरण करतांना जमलेल्या मालाचे निरनिराळे कर्तव्यग्रंथ उर्फ ‘ वेद ’ पाडून संहिती करणें करण्यांत आलीं ही दुसरी क्रिया होय . हा शास्त्र रचनेचा इतिहास दुसर्या विभागांत यथास्थित वर्णन केलाच आहे.
वेदांपासून ज्ञानेतिहासास वेदविद्येमध्यें सुरूवात झाली. ज्या ज्ञानांगांच्या विकासपरंपरा तेथें दाखविल्या गेल्या तीं ज्ञानांगें म्हणजे वाङ्मयविकास, व दैवतकल्पनाविकास हीं होत. याबरोबरच ज्ञानवाङ्मय आणि दैवतकल्पना यांचे स्थान असलेल्या ऋत्विजांच्या वर्गाचा सामाजिक विकासहि दाखविण्यांत आला आहे.