प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
वैदिक वृत्तांतून लौकिक वृत्तांची उत्पत्ति.- वैदिक वृत्तांपासून लौकिक वृत्तांचा विकास स्वाभाविक आहे. वृत्तांची अक्षरसंख्या निश्चित आहे पण तें अक्षर लघु असावें किंवा गुरु असावें यांविषयीं मात्र नियम नाहीं. अशा पध्दतीमुळें एकाच नांवाखालीं अनेक प्रकार होणार. वैदिक वृत्तांतील सर्व वृत्तें बहुधा ८, ११ व १२ अक्षरी चार चरणांचीं आहेत. आठ अक्षरी गायत्रीचा चरण, अकरा अक्षरी त्रिष्टुभाचा व बारा अक्षरी जगतीचा. याच चरणांची संख्येनें कमी जास्त वाढ केल्यानें बृहतीपंक्त्यादि वृत्तें तयार झाल्यासारखीं दिसतात.
वैदिक वृत्तांत गणांच्या साहाय्यानें वृत्त बनविल्याचें आढळत नाहीं परंतु पुढील गणसाहाय्यानें तयार झालेल्या वृत्तांचा उगम वैदिक वृत्तांतूनच झाला असावा असें वाटतें. कारण वैदिक ऋचांचें पठन चालू असतां कांहीं विवक्षित तालसुरांत म्हणतां येणाऱ्या सारख्या ऋचांची अथवा त्यांतील सारख्या चरणांची निवड करून लघु, गुरु भेदानें गणांचें प्रमाण ठरवून एकासारखाच दुसरा चरण बनविण्याच्या योगानेंच लौकिक वृत्तें तयार केलीं गेलीं असें दिसतें.
वैदिक वृत्तांत लौकिक गणवृत्तांचे आभास दृष्टीस पडतात ते पुढीलप्रमाणें:-
त्रिष्टुभ्:- या वृत्तांत इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा, वातोमीं वगैरे लौकिक वृत्तों आढळतात.-
उपेंद्रवज्रा :-
ज त ज ग ग
नम:पु रातेव रुणोत नूनं ( ऋ. २. २८, ८ चरण १ ला ).
इंद्रवज्रा :-
त त ज ग ग
सानोअ मासोअ रणेनि पातु ( ऋ. १० ६२, १६. चरण ३ रा ).
वातोर्मी:-
म भ त ग ग
आदेवा नामभ व:केतु रग्ने ( ऋ. ३. १, १७ चरण १ ला ).
शालिनी :-
म त त ग ग
सोमारु द्राधार येथाम सुर्यं ( ऋ. ६. ७४, १. चरण १ ला ).
जगती:- या वैदिक वृत्तांत आढळणारीं लौकिक वृत्तें
वंशस्थविल:-
ज त ज र
निधींप णीनांप रमंगु हाहितं ( ऋ. २. २४, ६. चरण २ रा )
इंद्रवंशा '-
त त ज र
संजागृ वद्भिर्ज रमाण इध्यसे ( ऋ. १०, ९१, १ ).
उष्णिह्.- या वृत्ताच्या कांहीं चरणांत चामर वृत्त आढळतें.
चामर अथवा प्रमाणिका:-
यइंद्रसोम पातमो मद:शविष्ठ चेतति । ( ऋ. ८. १२, १.).
सुमंगली रियंवधूरिमांसमेत पश्यत । ( ऋ. १०. ८५, ३३.).
अनेहसो व ऊत य:सु ऊतयोव ऊतय: ।
ऋ. ८.४७ या सूक्ताच्या महापंक्ति नामक वृत्ताच्या शेवटीं वरील पालुपद आहे.