प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.          
 

वेदग्रंथांत उपयोगांत आलेलीं वृत्तांचीं नांवें.-  वृत्तांचीं नांवें सांपडणें व त्यांचा उपयोग होणें या क्रियांत अंतर मोठें आहे. ज्या वृत्ताचें नांव प्राचीन तें वृत्त प्राचीन असा प्रकार मुळींच नाहीं. ऋक्संहितेमध्यें जरी वेदकालीन बहुतेक सर्व वृत्त उपयोगांत आणलीं आहेत तरी नामनिर्देशपूर्वक उल्लेख असा थोडयाच वृत्तांचा केला आहे, हें पूर्वीच्या अवतरणांवरून कळून येईल. वृत्तनामें सर्व प्रचलित स्वरूपांत सांपडत नाहींत. एका वृत्ताचें नांव अनुष्टुभ् असें न येतां निराळया स्वरूपांत आलें आहे. म्हणजे अनुष्टुभ् हें वृत्तनाम हळू हळू स्थिर झालें असावें. हें विकृत नांव आलें तें तरी '' आनुष्टभ '' असें आलें आहे; व तें प्राचीनतेच्या दृष्टीनें कमी महत्तवाच्या अशा उत्तरकालीन दहाव्या मंडलांत आढळतें. बाकीच्या छंदांपैकीं ' जगती ' हें वृत्ता पहिल्या मंडलांतल्या एकाच सूक्तांत सांपडतें आणि हें सूक्त ब्राह्मण काळांतलें धरलें जातें. सबंध ऋक्संहितेंतील उत्तरकालीन भागांतसुध्दां ' गायत्री ' व ' त्रिष्टुभ् ' हीं नांवें फारच कमी वेळां सांपडतात.

वृत्तानामें यजुर्वेदांतील निरनिराळया शाखांत व इतर वेदांच्या ब्राह्मणांत पुष्कळ ठिकाणीं सांपडतात. ब्राह्मण ग्रंथांच्या वेळीं छंद:शास्त्राला बरेंच परिणत स्वरूप आलें
होतें. वृत्तांचें आध्यत्मिकदृष्टया महत्वमापन करण्याचाहि प्रयत्न वैदिक वाडमयांत दिसून येतो; आणि त्या प्रयत्नाचा परिणाम, वृत्तांची यादी व अनुक्रम यांवरहि झालेला
आहे. गायत्री, त्रिष्टुभ् व जगती हीं तीन मुख्य वृत्तें होत असें मानीत. चार दिशांप्रमाणें चार वस्तू काय आहेत अशा विधिविषयक कूट प्रश्नांच्या उत्तरांमध्यें चार दिशा
व चार वृत्तांचीं नांवें येतात; व अनुष्टुभ् हेंच येथें चवथें वृत्त धरतात. काठक १९४.२०, १ या उल्लेखांत वृत्तांची संख्या चार आहे असा सामान्य निर्देश आहे. पुढें वृत्तसंख्या
आणि वृत्तनामें वाढलेलीं दिसतात. पांचवें वृत्त ' पंक्ति ' व सहावें वृत्त ' अतिच्छंदस् ' हें होय. कधीं कधीं ' उष्णिह ' हें सहावें वृत्ता दिलें आहे. शेवटचीं वृत्तें सोडून दिलीं तर गायत्री, त्रिष्टुभ्, जगती, अनुष्टुभ् व पंक्ति ( अतिच्छंदस् ) असा अनुक्रम मांडतां येईल. हा अनुक्रम सर्वांत जुना असून त्यांत वृत्तांची कमी अधिक पवित्रता विचारांत घेतलेली दिसते.