प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.          

वृत्ता आणि पाद यांत पूर्वोत्तारता.- संस्कृत वृत्ताचें स्वरूप पाहिलें असतां सामान्यत: असें वाटतें कीं पाद हा प्रथम शोधला गेला असावा आणि त्याच्या समुच्चयानें वृत्ता बनलें असावें. ही समजूत अनुभवांतीं खरी ठरत नाहीं. वाक्यास गाण्याच्या हेलावर गाण्याचा प्रयत्न व्हावा आणि त्याचे विटाळयासारखे तुकडे पाडले जावेत ही विकासपध्दति दिसते. संपूर्ण वृत्त अगोदर, नंतर त्याची पादांत विभागणी, पुढें त्याची पादांशांत विभागणी आणि शेवटीं पादांश घेऊन नवीन वृत्ताची योजना हा विकासक्रम मंत्रकालांतहि दिसून येतो. उत्तारकालीन वृत्ताविकासांत हा  क्रम स्पष्टपणानेंच दिसतो. शालिनीच्या पहिल्या चार गुरू अक्षरांनंतर एक नगण व एक सगण घातला म्हणजे मंदाक्रांता झाली. मंदाक्रांतेंत थोडासा फेरबदल झाला ( पहिल्या चार गुरू अक्षरांनंतर एक यगण व एक लघु  अक्षर घातलें ) म्हणजे स्त्रग्धरा झाली. शिखरिणीचा पूर्वभाग घेऊन मंदाक्रांतेचा उत्तारभाग जोडला म्हणजे मेघविस्फूर्जितावृत्त झालें. या प्रकारचाच क्रम वैदिक कालांतसुध्दां दिसून येतो.

'' सप्तच्छंदांसि चतुरुत्ताराणि '' ही पध्दति जरी प्रत्येक वृत्ताची एकता स्पष्ट करिते, तरी अर्धपाद आणि पद अशा  तऱ्हेची वृत्तविभागणी बरीच प्राचीन कालापासून चालत आली असावी. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलामध्यें जगत्पदं याचा गौण अर्थ जगती छंदांतील पाद असा आहे व ' द्विपाद ’ आणि ' चतुष्पाद् ' ह्यांचा दोन पाद असणाऱ्या व चार पाद असणाऱ्या ऋचा असा अर्थ आहे. अथर्ववेद ९. १०, १९ मध्यें असें म्हटलें आहे कीं, ' प्रमाणानें ऋचांचें पादनियमन करण्यांत त्यांनीं अर्ध्या ऋचेनें सर्व चालणाऱ्या वस्तू नियमित केल्या. ' येथें ' प्रमाण ' शब्दानें वृत्ताच्या अक्षरांची संख्या समजली पाहिजे. जंगम पदार्थाचें नियमन ह्यानें एका विशिष्ट पादाच्या मानानें बरेंच मोठें वृत्तांच्या घटनेचें नियमन असा अर्थ दृष्ट आहे. वाजसनेयि संहिता १९. २५ (अर्धऋचै-
रुक्थानां रूपं पदैराप्तोति निविद:) येथें असें म्हटलें आहे कीं, अर्धऋचा उक्थांचें स्वरूप निश्चित करतात आणि पद हें निविद् नामक अरिष्टशांतिप्रार्थनांचें स्वरूप ठरवितें. येथें 'पद' ह्या शब्दाचा अर्थ ऋचेचा चतुर्थ भाग असा नसून ऋचेचा अवयव असा त्याचा सामान्य अर्थ आहे. कारण निविद् ह्या जरी लहान आहेत तरी त्या ऋचेच्या सुमारें चतुर्थ भागाइतक्या मोठया असतात. पद या शब्दाचा हाच सामान्य अर्थ सगळीकडे दिसून येतो. उदाहरणार्थ, जेव्हां एकपदा, द्विपदा, त्रिपदा, पञचपदा, षट्पदा किंवा सप्तपदा असें आपण म्हणतों, तेव्हां त्या त्या ऋचांचा एक, दोन, तीन, पांच, सहा, किंवा सात असे अवयव असतात.  अर्धऋचा, किंवा ऋचांचे अवयव कसे म्हणावेत ह्यासंबंधानें ब्राह्मण आणि सूत्र वगैरे विधिविषयक ग्रंथांतून बरेच नियम आले आहेत. यावरून असें स्पष्ट होतें कीं वृत्ताचें सामुच्चयिक एकत्व आणि त्याचे स्वाभाविक यती पाहून विभाग करणें आणि विभागांची ' पुनरुक्ति ' व आलटापालट इत्यादि क्रिया करणें वगैरे गोष्टी वैदिक वाडमयाच्या पूर्णतेपूर्वी प्रचलित होत्या. आणि त्या क्रिया आपण जाणूनबुजून करीत आहों अशी तत्कालीनांची भावनाहि होती.