प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
लोचन.– लोचन कवीकृत रागतरंगिणी हा ग्रंथहि याच काळांतला होय. या ग्रंथातंला बराचसा भाग विद्यापति नामक कवीनें केलेल्या पद्यांच्या चर्चेला दिलेला आहे. विद्यापति हा कवि पंधराव्या शतकांत तिऱ्हूतचा राजा शिवसिंग याच्या दरबारी प्रसिध्दि पावलेला होता. लोचनकवीनें तत्काली प्रचलित असलेल्या अनेक संगीत पद्धतीचें वर्णन केलेले आहे आणि एकंदर राग बारा थाटांमध्ये बसवून दाखविले आहेत.
उत्तर हिंदुस्थान आणि बंगाल यांमध्ये चैतन्य नामक साधूच्या ( इ.स. १४८२-१५३३ ) प्रयत्नानें भक्तिपंथाचा प्रसार झाला. त्याबरोबर संगीत कलेलाहि बरेंच चालन मिळालें, आणि त्याच वेळी संकीर्तन आणि नगर कीर्तन हे प्रकार प्रथम प्रचारांत आले.