प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
वेंकट मखीची चतुर्दंडीप्रकाशिका:- या सुमाराचा दक्षिण संगीत पद्धतीवरील ग्रंथ पंडीत वेंकट मखी यानें लिहिलेला चतुर्दंडीप्रकाशिका हा होय. हा पंडीत गोविंद दीक्षिताचा पुत्र व तानप्पाचार्यांचा शिष्य होता. याची गुरुपरंपरा मागे शारंगदेवापर्यंत लागलेली आहे. या ग्रंथात प्रचलित दक्षिण संगीत पद्धतीचा मूळ आधार दिलेला असून रागांचेहि वर्गीकरण दिलें आहे. यांत मूळ राग ७२ दिले असून त्यांनां मेलकर्त असें नांव आहे. दुसरे अनेक अन्य रागहि त्यांत दिले आहेत. या ग्रंथकारानें रागांचे वर्णन करताना कोमल स्वरांचा उपयोग केलेला आहे.