प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
वेदोत्तार ग्रंथांतील खास छंद:शास्त्रीय भाग.- अशा ग्रंथांच्या पूर्वोत्तरतेविषयीं जें कांहीं आपणांस ठाऊक आहे तें हें कीं, ( १ ) शांखायन श्रौतसूत्रांतील अध्याय ( ७, २७ ) सर्वांत जुना आहे असें वेबरचें मत असून त्यानंतर ( २ ) निदानसूत्रांतील पहिली दोन पटलें येतात. त्याच्या मागून ( ३ ) ऋक्प्रातिशाख्यांतले शेवटले तीन अध्याय येत असून पुढें मग ऋग्वेदांतील ( ४ ) दोन अनुक्रमणींचा वृत्तविषयक भाग व ( ५ ) शुक्लयजुर्वेदांतील कांहीं भाग येतात. सर्वांच्या शेवटीं ( ६ ) पिंगलाच्या छंद:शास्त्रांतील वेदवृत्ताविषयक भाग येतो. अशी ही अनुक्रमवार रचना आहे. ही पूर्वापार कालविशिष्ट मांडणी ह्या ग्रंथांच्या योग्यतेवर कांहीं अंशानें अवलंबून आहे; व आंत असणाऱ्या वृत्तविषयक माहितीवरहि बरीच अवलंबून आहे. त्याचप्रमाणें त्या ग्रंथांच्या वेळीं छंद:शास्त्र कोणत्या अवस्थेप्रत आलें होतें ह्या गोष्टीवरहि ती अवलंबून आहे.
यज्ञकर्मप्रसंगीं होत्यानें जें शंसन करावयाचें तें करतांना निरनिराळया वृत्तांतील ऋचांचें शंसन कोठें पदश: तर कोठें अर्धर्चश: करावें लागतें. म्हणून कोणत्या ऋचेचे किती चरण हें समजण्याकरितां शांखायनानें केलेलें स्पष्टीकरण देतों.
शांखायन श्रौतसूत्रांतील उतारा.-
१ त्रिपदा गायत्री. २ उष्णिह्. ३ पुरउष्णिह्. ४ ककुभ्. ५ विराट्च पूर्वा. ६ चतुष्पदोत्ताराविराट्. ७ बृहती. ८ सतोबृहती. ९ जगती. १० अनुष्टुभ्. ११ त्रिष्टुभ्च. १२ पंचपंक्ते. १३. षट्सप्तेत्यतिच्छंदसां. १४ सहिशर्धोनमारुतमित्यष्टौ. १५ द्वौ द्विपदाया:. १६ तेऽष्टाक्षरा: प्रायेण. १७ द्वादशाक्षरा जगत्या. १८ तृतीयौ चोष्णिगृबृहत्यो:. १९ सतोबृहताश्च प्रथमतृतीयौ. २० मध्यम: ककुभ: २१ प्रथमपुरउष्णिह:. २२ एकादशाक्षरा त्रिष्टुब्विराजो:. २३ उत्तारस्यादशाक्षरा. २४ तामक्षरपंक्तिरित्यप्याचक्षते. २५ पंचभि: पंचाक्षरै:पदपंक्ति: षळप्यष्टाक्षरा जगत्या:. २७ एकेन द्वाभ्यामित्यूनके निचृत्. २८ अतिरिक्ते भुरिक्. २९ संपाद्य पादभागेनाहार्यस्यर्च: संमितास्तस्य पादभागेन संपन्ना:. ३० गायत्र्युष्णिहावनुष्टुब्बृहत्यौ पंक्तिश्च त्रिष्टुब्जगत्यावित्यानुपूर्व्ये छंदसां चतुर्विशत्यक्षरादीनां चतुरुत्ताराणां ( शांखायन श्रौ. सु. ७।२७ ).
अर्थ.- गायत्री छंदाचे आठ आठ अक्षरांचे तीन चरण. उष्णिह् छंदाचे आठ अक्षरी दोन चरण व बारा अक्षरी तिसरा चरण. विराट्पूर्वा नामक छंदाचे दहा दहा अक्षरी तीन चरण. उत्ताराविराट् छंदाचे चार चरण. त्याचप्रमाणें बृहती, सतोबृहती, जगती, अनुष्टुभ, त्रिष्टुभ् या छंदांचे चार चरण. पंक्ति छंदाचे पांच चरण. अतिच्छंद नामक छंदाचे सहा अथवा सात चरण. द्विपदा नामक दोन चरणांच्या ऋचेचे आठ अक्षरी दोन चरण. गायत्री छंदापासून द्विपदा छंदापर्यंतच्या सर्व छंदाचे चरण बहुधा आठ आठ अक्षरी असतात. जगती छंदाचे बारा अक्षरी चार चरण. उष्णिह् आणि बृहती छंदाचे तीन चरण; पैकीं तिसरा बारा अक्षरी व पहिला आणि दुसरा आठ अक्षरी. सतोबृहती छंदाचे चार चरण; पैकीं पहिला, तिसरा बारा अक्षरी आणि दुसरा, चौथा आठ अक्षरी. ककुभ् छंद तीन चरणी. पैकीं दुसरा बारा अक्षरी. व पहिला, तिसरा आठ अक्षरी. पुरउष्णिह् छंद तीन चरणी; पैकीं पहिला बारा अक्षरी व बाकीचे आठ अक्षरी; तीन चरण असून प्रत्येक चरणांत अकरा अक्षरें असलेलें पूर्वाविराट् नामक वृत्त होय. चार चरण असून प्रत्येक चरणांत दहा अक्षरें असलेलें वृत्ता उत्ताराविराट्. या वृत्ताला अक्षरपंक्ति हेंहि नांव आहे. पदपंक्ति छंदाचे पांच पांच अक्षरी पांच चरण. हा गायत्रीचा पोटभेद आहे. जगती छंदाचे बारा अक्षरी चार चरण; परंतु केव्हां केव्हां आठ अक्षरी सहा चरणहि होतात. गायत्रीच्या अक्षरांपैकीं एक अथवा दोन अक्षरें कमी असल्यास त्या छंदास निचृत् व अक्षरें जास्त असल्यास त्यास भुरिक् असें म्हणतात.
एखाद्या छंदाच्या अमुक ऋचांचा संग्रह करावयाचा असल्यास, अक्षरांच्या संख्येच्या योगानें दुसऱ्या एखाद्या छंदाचा संग्रह करून भरती करतात. उदाहरणार्थ, बृहती छंदाच्या सहा ऋचा घ्यावयाच्या असल्यास गायत्री छंदाच्या नऊ ऋचा घेतात. कारण गायत्रीच्या नऊ ऋचांचीं २१६ अक्षरें होतात, व बृहती छंदाचीं ३६ अक्षरें असल्यामुळें २१६ अक्षरांत बृहती छंदाच्या ६ ऋचा होतात. गायत्री, उष्णिह्, अनुष्टुभ्, बृहती, पंक्ति, त्रिष्टुभ् आणि जगती या वृत्तांचीं अक्षरें उत्तारोत्तर चार चार संख्येनें अधिक आहेत. उदाहरणार्थ, गायत्री छंदाचीं २४, उष्णिह् छंदाचीं २८, अनुष्टुभ् छंदाचीं ३२, याप्रमाणें उत्तारोत्तार अधिक अक्षरें जाणावीं.
नि चृ त् व भु रि ज्.- एखादें वृत्त जर एक दोन अक्षरांनीं कमी असेल तर त्यास ' निचृत् ' म्हणजे कापलेलें म्हणावें व जर एखाद्या वृत्तांत एक दोन अक्षरें जास्त असतील तर त्यास 'भुरिज्' म्हणजे लादलें गेलेलें असें म्हणावें.
हा शांखायनी नियम अगदींच नवीन आहे. कारण, ब्राह्मण ग्रंथांमध्यें पुष्कळ ठिकाणीं असें म्हटलें आहे कीं एक दोन अक्षरें कमी असल्यास कांहीं बिघडत नाहीं; व येथें तर विशिष्ट अक्षरांचा नियम आहे. म्हणून हा नियम छंद:शास्त्राच्या परिभाषेची वाढ होत आहे ही गोष्ट दाखवतो. ही वाढ अशीच सारखी चालू राहून वर लिहिलेलीं दोन नांवें ( निचृत् व भुरिज् ) हीं ' एकच ' अक्षर जेथें कमी किंवा अधिक असेल तेथें लावण्यांत आलीं. आणि ' दोन ' अक्षरें कमी किंवा अधिक असतील त्यांनां ' विराज् ' व ' स्वराज् ' अशीं नवीन नांवें देण्यांत आलीं. हा वृत्तविषयक माहितीचा गाभा ब्राह्मण ग्रंथांसंबंधानें विचार करतांनाच आपल्या निदर्शनास आला. वरील उल्लेखांशिवाय ' निचृत् ' व ' भुरिज् ' हीं नांवें प्रथम ' देवताध्याय ' ग्रंथामध्यें ह्या अर्थानें आलेलीं आहेत.
वरील ग्रंथांत आपणांस पूर्वी माहीत नसलेला असा फारच थोडा भाग आहे. परंतु ' निदानसूत्रांतल्या बऱ्याच भागांत अगदीं अलीकडे केलेलीं अशीं छंद:शास्त्राविषयींचीं विधानें सांपडतात व ह्यावरून निदानसूत्र, ह्या शास्त्राची वाढ होत असतां नि:संशय सर्वांत शेवटीं झालें असें सिध्द होतें. वरील प्रत्येक ग्रंथाचा ऋक्प्रातिशाख्याशीं असणारा निकट संबंध वेवरनें दाखविला आहे.