प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.  

शास्त्रघटनेच्या इतिहासास वेदांपासून सुरूवात करण्याचें कारण:- वाङ्मयविशिष्ट शास्त्रांच्या घटनेच्या इतिहासाची सुरूवात वेदांसारख्या वेदांसारख्या केवळ भारतीय ग्रंथापासून करण्यांत आपल्या विवेचनास आपण एकदेशीय स्वरुप देत आहो. तथापि एकदेशीय विवेचनाचा उपयोग नाही असें नाहीं. क्रियांचा अन्योन्याश्रय आणि पौर्वापर्य यांजवर, कोणताहि एक विकास तपासून पहिला असतां, बराच प्रकाश पडतो. ज्या प्रकारच्या क्रिया हिंदुस्थानांत होऊन शास्त्ररचना झाली त्याच क्रिया इतर जगांत शास्त्ररचनेपूर्वी झाल्या असें नाहीं. तथापि सदृश क्रियांचे सदृश परिणाम दृष्टीस पडतातच. उदाहरणार्थ, यहुदी लोकांच्या वाङ्मयाचा अभ्यास होऊन जें वाङ्मय उत्पन्न झालें त्यांत भारतीय विकासाशी सदृश क्रियापरंपरा झालेल्या दृष्टीस पडतात. शिवाय, हेंहि लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, ज्ञानेतिहास लिहावयाचा म्हणजे ज्या ठिकाणी ज्ञान उत्कट स्वरूप पावतें तेथील विकास घेऊन तो इतरत्र झालेल्या वाढीशीं जोडावयाचा. एका विकासांत एखादें शास्त्र उदयास आलें म्हणजे त्या विकसितज्ञानाचा दुसर्‍या स्शलीं संबंध येतो आणि त्यामुळें जगाच्या ज्ञानसमुच्चयास एक तर्‍हेचे सातत्य येतें. या विधानाबरोबर हेंहि सांगितलें पाहिजे कीं, जगाच्या निरनिराळ्या ठिकाणी उत्पन्न झालेले ज्ञान एकीकृत होऊन त्याच्यापासून सर्वसामान्य ज्ञानफलक केला जाण्याची क्रिया अत्यंत अर्वाचीन आहे. कां कीं, दुसर्‍याच्या प्रगतींतील ज्ञान निर्विकारपणें शोधून त्याचें ग्रहण करण्याची क्रिया एकसारखी चालू नव्हती. ज्यांच्यापाशीं जें उपयुक्त ज्ञान असेल तें त्यांनी लपविणें, आणि दुसर्‍याच्या ज्ञानाविषयीं मत्सरबुध्दि उत्पन्न झाल्यामुळें ज्ञानाचें ज्ञानत्व नाकबूल करणें या तर्‍हेच्या क्रियांमुळें झानविकासाचें सातत्य दूषित झालें होतें.

ज्ञानवर्धनाचा इतिहासहि कांहीं अंशी सर्व जग एकच क्षेत्र आहे असें समजून लिहिला पाहिजे; आणि जेव्हां एखादी गोष्ट प्रथम उद्भवली तेव्हां तिला महत्व दिलें पाहिजे. या दृष्टीनें भारताच्या अत्यंत प्राचीन ज्ञानाच्या इतिहासास महत्व आहे.