प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
शास्त्रीकरणार्थ प्रथम प्रयत्न.– संगीतशास्त्रीकरणाच्या यत्नांतील एक महत्वाची क्रिया म्हटली म्हणजे आपण गातो तेव्हां गाताना छंदावर काय क्रिया करतो हे तपासणे. या तऱ्हेचा शोध देखील प्राचीनांनी केला आहे.
कोणतीहि ॠचा साम म्हणून गावयाची म्हणजे त्या ॠग्मंत्रांतील अक्षराच्या उच्चारणांत कोणकोणते फेरफार करावे लागतात याविषयी जैमिनिसूत्रभाष्यकार शबरस्वामी याने जै. सू. ९.२, २७ ह्या सूत्रावर भाष्य लिहिताना बरेच स्पष्टीकरण केलें आहे. त्यांपैकीं मुख्य क्रिया सहा प्रकारच्या असून त्यांची नांवे पुढे दिल्याप्रमाणे आहेत:-
(१) विकार.
(२) विश्लेष.
(३) विकर्षण.
(४) अभ्यास.
(५) विराम.
(६) स्तोभ.
(१)विकार.– ही क्रिया सामान्य तऱ्हेची आहे. अक्षराच्या कसल्याहि फेरबदलास विकार हें सामान्य नांव देतात. उ. `अग्न’ या शब्दाचे `ओग्नायि’ हे सामांतर्गतरुप विकार होय.
(२)विश्लेष.– ही क्रिया उदाहरण घेऊन अशा रीतीने दर्शवितां येईल. सामाच्या मूळ मंत्रातील `वीतये’ ह्या अक्षराचा `वोयितोया २ यिे’ असा उच्चार करतात. येथे `वी’चे `वोयि’व `त’ चे `तोया’ हे जे वर्णांचे दीर्घीकरण झाले त्यास `विश्लेष’ ही संज्ञा देतात.
(३)विकर्षण.– किंवा आवाज ओढण्याची क्रिया. `वोयितोया २ यिे’ ह्यातील `या २ यिे’ हे विकर्षण होय,
(४)अभ्यास.– त्याच अक्षरांचा पुनरुच्चार करण्याची जी क्रिया तीस अभ्यास म्हणतात. उदाहरणार्थ, वरील सामांत `वोयितोया २ यिे’ ह्या पदामागून `तो या २ यिे’ एवढया पदांशाचा पुरुच्चार करतात तो अभ्यास होय.
(५)विराम.– ही क्रिया म्हणजे सामें म्हणताना एका पदांतील एकच अक्षर उच्चारुन त्या ठिकाणीं कांहीं वेळ थांबणे. छंद:शास्त्रातील `यतभिंग’नामक दोषासारखाच हा प्रकार आहे. परंतु सामगायनात हा दोष मानण्यांत येत नाही. उ. `हव्यदातये’ ह्यातील `ह’ हे अक्षर पूर्वीच्या `गृणानो’ ह्या पदास जोडून घेऊन उच्चार करणे व थांबणे (`गृणानोह’) ही विरामक्रिया झाली.
(६)स्तोभ.- ह्याचे लक्षण “अधिकत्वे सत ॠग्विलक्षवर्ण: स्तोभ:” असे शास्त्रकारांनी दिले आहे. `त्सि’ ह्या मूळ ॠगक्षराचे `त्सा २ यिे’असे जे रुप त्याला `स्तोभ’ म्हणतात.
याखेरीज, `बर्हिषि’ या ॠक्पदांचा साम म्हणतांना रेफवर्ज `ही २३ षी’ असा उच्चार करणें, त्याचप्रमाणे उच्चारणांत `औहोवा’ इत्यादि वर्ण नवीन घालणें असे लोप, आगम इत्यादि किरकोळ प्रकार आहेतच.