प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
संगीतेतिहासाचे कालविभाग.– वरील कारणांवरुन भारतीय संगीताच्या इतिहासांत परकीय विकृति हे कालभाग पाडण्यास मोठें महत्वाचे कारण नाहीं. रा. बरवे भारतीय संगीताचे काल येणें प्रमाणें पाडतात. ( केसरी ३।९।१२ )
(अ) वेदकालापासून ते बुद्धकालापर्यंत ( इ.पू. ५०० ). या कालास आपण “सामसंगीत युग”असे म्हणू.
(आ) बुद्धकालापासून ते इ.स. १-२ शतकांपर्यंतच्या कालास “मार्गसंगीत युग” म्हणू.
(इ) इ.स. ३ पासून १४-१५ शतकापर्यंतच्या काळास “देशी संगीताचा उष:काल”म्हणण्यास हरकत नाही.
(ई) १६ व्या शतकापासून १९ व्या शतकापर्यंतचा काल हाच काय तो देशी संगीताच्या उत्कर्षाचा काळ म्हटला पाहिजे. हा कालविभाग लक्षांत ठेवला म्हणजे, जे जे ग्रंथ उपलब्ध होतील ते कोणत्या कालमर्यादेतील आहेत हे ठरुं शकेल आणि समग्र उपलब्ध ग्रंथांचे कालद्दष्टया वर्गीकरण करतां येईल.