प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
संगीताच्या इतिहासाची कल्पना.– भारतीय संगीतशास्त्राचा इतिहास द्यावयाचा म्हणजे ज्या वाड्मयाचा गाण्याकडे उपयोग केला तें वाङमय व गाण्याच्या इतिहासावर प्रकाश पाडतील अशा शास्त्रीय ग्रंथाचा इतिहास हीं द्यावयाची. हें केवळ बाह्य विवेचन झालें. त्यांपेक्षांहि महत्वाचें अंग म्हटलें म्हणजे निरनिराळया प्रकारची संगीतसृष्टि भारतीयांनी कशी अवलोकिली आणि तीत कांही पद्धत बसविण्याचा त्यांनी कसा प्रयत्न केला याचा इतिहास द्यावयाचा. स्वर, राग, ताल, मेंढ, मूर्च्छना, आरोह, अवरोह, श्रुति इत्यादि कल्पनांच्या विकासाचा इतिहास द्यावयाचा. याशिवाय भारतीय संगीतास विशिष्ठ मर्यादा कां उत्पन्न झाल्या त्याचा सकारण इतिहास दिला पाहिजे.