प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
श्रौतसंस्थांमुळें प्राचीन वाङ्मयावर झालेला परिणाम:- मंत्रोत्पत्तिकालापासून आजपर्यंत ज्ञानवर्धनविषयक क्रिया कोणकोणत्या झाल्या त्यांचें स्थूल विवेचन वेदोत्तर वाङ्मयाच्या समजवणुकीस अवश्य आहे. त्या क्रिया येणें प्रमाणें दिसतात.
(१) वैदिक वाङ्मयापैकी बहुतेक मंत्रवाङ्मय, स्वयंस्फूतींनें किंवा नक्कल करण्याच्या उद्देशानें पण वाङ्मय म्हणून अथवा काव्य म्हणून तयार झालें. यास कांही आथर्वण मंत्र अपवाद होत. हे विशिष्ट जादूटोण्यांच्या क्रिया करण्यासाठीं रचले असावेत. यजु:संहितेंतील कांही मंत्र क्रिया करण्यास मदत म्हणूनच उत्पन्न झालें असणें शक्य आहे.
(२) ब्राह्मणवाङ्मय यज्ञांतील क्रिया कशा कराव्या हें समजावून देण्यासाठीं किंवा त्यांचें समर्थन करण्यासाठीं क्रियाकर्त्यास साहाय्यक म्हणून रचलें गेले.
(३) मंत्रवाङ्मयाचें संहितीकरण झाले तें पुढें यज्ञ करणार्या निरनिराळ्या ऋत्विजांस आपआपलें कार्य़ करण्यास सोइस्कर कसें जाईल या दृष्टीनें झालें.
(४) शेवटचें संहितीकरण होण्यापूर्वी ज्या क्रिया होत असत त्या स्थूलत: येणेंप्रमाणें.
(अ) मंत्रांची मोङतोङ गोळा करुन एका मंत्राचा तुकङा दुसर्या मंत्रास लावणें.
(आ) मंत्र म्हणण्यास सोइस्कर किंवा कर्णमधुर किंवा चित्ताकर्षक होतील या दृष्टीनें त्यांची मांङणी करणें.
(इ) क्रियेला अनुरुप असे मंत्र अर्थाकङे पाहून किंवा अक्षरांकङे पाहून निवङणें.
(ई) प्रत्येक मंत्रास यज्ञानुरुपता य़ेण्यासाठी, त्याची देवता किंवा त्याचा मंत्रद्रष्टा सांपङत नसेल तर तो त्यास कांही तरी तत्व लावून निर्माण करुन जोङणें.
(उ) मंत्रांत आपल्या क्रियेला अनुरुप असा फेरबदल करुन घेणे.
(ऊ) यज्ञक्रियांत कांहीं फेरबदल करावासा वाटल्यास तो करणें आणि त्याचे समर्थन करणे.