प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
श्रौतसंस्था आणि औद्गात्र उर्फ संगीतशास्त्र.– संहिताचतुष्टय तयार झालें आणि यज्ञसंस्था सोमयागाच्या पूर्ण विकासानें प्रगल्भ झाली तेव्हां सामवेद हा उद्गात्यांचा वेद म्हणून त्याचे स्थान वाङमयात निश्चित झाले. तथापि या परिस्थितीचा पूर्वावलोक कसा करता येईल हा प्रश्न आहे.
सोमयागाच्या विकासामुळे हौत्रवेदाची पहिली मांडणी करण्यांत आली, तर त्याच सुमारास औद्गात्राची मांडणी झाली काय ? हा प्रश्न सोडविता येत नाही.
हवि:संस्थांमध्ये औद्गात्र फारसे नाही. औद्गात्राचा उपयोग अग्न्याधानामध्ये येतो. तथापि अग्न्याधान अशा वेळेस सुरु झाले की घरोघरच्या श्रौतांचा संकोच होऊन त्या वेळेस सोमयाग स्वरुपाने वाढला होता. सोमाचा आणि सामकांचा संबंध अत्यंत निकट आहे; आणि हौत्राचा आणि औद्गात्राचाहि संबंध निकट आहे.