प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            
 
शारंगदेव व त्याचा संगीतरत्नाकर.– आतां प्राचीन हिंदी संगीत शास्त्रज्ञांपैकी सर्वांत श्रेष्ठ संगीतज्ञाबद्दल माहिती देऊं.  याचे नांव शारंगदेव.  याच्याबद्दल हिंदी संगीतज्ञांच्या मनांत पूर्ण आदर वास करीत आहे.  हा १३ व्या शतकाच्या पूर्वार्धांत ( इ.स. १२१० ते १२४७ ) दक्षिणेंतील देवगिरीच्या यादव राजांच्या दरबारीं होऊन गेला.  हेमाद्रीच्या व्रतखंडावरुन लोक विलासी झाले होते असा सिध्दंत राजवाडे ज्या काळस्थळाविषयीं काढतात तोच काळ व तेंच स्थळ शारंगदेवाचे.  त्या वेळी यादवांच्या मराठी साम्राज्याचा विस्तार दक्षिणेंत कावेरी नदीपर्यंत पसरलेला होता आणि त्यामुळें उत्तरेकडील व दक्षिणेकडील अशा दोन्ही संगीत पद्धतीशीं शारंगदेवाचा परिचय झाला असावा.  कारण, त्याच्या संगीतरत्नाकर नामक ग्रंथांत याबद्दल बराच पुरावा आढळतो.  या दोन्ही पद्धतीच्या मुळाशीं असलेलीं शास्त्रीय तत्वें देण्याचा त्यानें प्रयत्न केला असावा असें दिसतें.  त्यामुळें या पुस्तकांत कोणत्या पद्धतीचें वर्णन केलेले आहे याबद्दल  आणि त्यांत वर्णन केलेल्या रागांच्या स्वरुपाबद्दल वाद विवाद उत्पन्न झालेला आहे.  या रागांबद्दल आज कोणाहि विद्वानाला पूर्ण समाधानकारक असा खुलासा करतां येत नाही.  या ग्रंथात पद्यांची रचना आणि प्रकार यांबद्दल परिपूर्ण माहिती दिली आहे, आणि प्राचीन संगीत शास्त्रीय उपपत्तीबद्दल विस्तृत विवेचन केलेलें आहे.  शिवाय या ग्रंथात आद्य भरतमुनि आणि ग्रंथकर्ता यांच्या दरम्यानच्या काळांत होऊन गेलेल्या अनेक संगीत ग्रंथकारांचा नामनिर्देश केलेला आहे.  शारंगदेवाचा शुद्ध राग मुखारी हा होय.  यालाच आधुनिक नांव कनकांगी असे आहे.  प्रचलित कर्नाटक संगीत पद्धतीत यालाच शुद्ध राग समजतात.