प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            

संस्कृत छंद:शास्त्राच्या पुढील विकास.- संस्कृतमध्यें अक्षरप्राधान्यानें छंदोमापनाकडे प्रवृत्ति श्रौतसूत्र- कालापासून जी सुरू झाली तिचें पर्यवसान, करण्यास कठिण अशीं वृत्तें बनविण्याकडे झालें. या तऱ्हेचीं छंद:पध्दति मोठमोठे ग्रंथ करण्यास मुळींच उपयोगीं नाहीं. जेव्हां मोठमोठे ग्रंथ करण्याचा प्रसंग येई तेव्हां इतकी सूक्ष्म वृत्तपध्दति वापरून अर्थव्यक्ति करणें हें मोठमोठया कवींसहि जड जाई. ज्यास सांगावयाचें पुष्कळ असेल त्याला गद्यलेखन चांगलें. आणि पद्यलेखन जर करावयाचेंच झालें तर असें वृत्त पकडलें पाहिजे कीं तें करावयास सोपें जाईल. यामुळेंच कवींची आणि ग्रंथकारांची धांव अनुष्टुभ छंदाकडे असे. मोठमोठया कवींनां देखील ही श्लोकरचना त्रासदायक वाटत असली पाहिजे. यामुळें कालिदास भारवि इत्यादिकांनीं सर्गचे सर्ग एकएका वृत्तांतच लिहिण्याचा प्रयत्न केला. संस्कृत छंद:शास्त्रांत आलेलींच वृत्तों संस्कृत ग्रंथकारांनीं घेतलीं असें नाहीं. उलट निरनिराळया काळीं प्राकृत वृत्तांत छंदोरचना संस्कृत ग्रंथकारांनीं केली आहे. जयदेवानें तर पदेंच वापरलीं आहेत. आचार्यांनीं चर्पटपंजरीमध्यें प्राकृत वृत्ताश्रय केला आहे. विजयानगरचे मुडुंव नृसिंहाचार्य यांनीं आपल्या अनेक संस्कृत ग्रंथांत पुष्कळच देशी वृत्तांचा आश्रय केला आहे. '' मंदंमंदं  वायौ विचलति '' यासारखी पुष्कळशी अर्वाचीन काळीं होणारी संस्कृत कविता लोकप्रिय होण्यासाठीं प्राकृत वृत्तांचा आश्रय करते असें आपणांस दिसतें.