प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
संहितीकरण आणि शास्त्रीकरण.– सामवेदकालीन शास्त्र किंवा कला आपणांस शोधतां यावयाची नाही. शास्त्रकल्पना म्हणजे व्यवस्थित मांडणीची कल्पना थोडीशी तरी असल्याशिवाय संहितीकरणहि होणार नाही. तर संहितीकरण करण्यांत काही शास्त्रकल्पना वापरली गेली आहे काय हें आपणांस प्रथम पाहिलें पाहिजे. हें पहातांना आपणांस असे दिसतें की सामवेदसंहितेत शास्त्राची व्यवस्थित मांडणी नसून मंत्रसाहित्याचीच मांडणी केली आहे. सामवेदीय संहिताभागांमध्ये १ छन्द, २ आरण्यक, ३ महानाम्न व ४ उत्तर असे चार आर्चिक ग्रंथ आहेत व शिवाय एक स्तोभ ग्रंथ आहे. गेय, आरण्य, ऊह व ऊह्य असे चार गानविषयक प्रधान ग्रंथ असून यांचेच परिशिष्टरुप असे महानाम्न, भारुंड, तवश्यावीय व गायत्र हे आणखी चार ग्रंथ आहेत. मिळून एकंदर तेरा ग्रंथांना `संहिता’असे म्हणण्याचा व्यवहार प्रचलित आहे.
गानविषयक प्रधान ग्रंथांपैकी [१ ] `गेयगान’हा ग्रंथ छंदआर्चिकमूलक आहे. [२] `आरण्यगान’ हे थोडेंसें आरण्यकार्चिकमूलक आहे; परंतु त्यांतील क्रमाहून या गानग्रंथाचा क्रम भिन्न आहे. हा गानग्रंथ थोडासा स्तोभमूलक असल्याचे दिसतें. परंतु त्यांतील सामांचा क्रमहि या ग्रंथांत द्दष्टीस पडत नाही. आरण्यगानामध्ये छंदार्चिकमूलकतेचीहि छटा द्दष्टीस पडते. [३] `ऊहगान’हे उत्तरार्चिकमूलक आहे. परंतु यांतील सामांचा क्रम उत्तरार्चिकाप्रमाणे नसून `दर्शरात्र’`पर्व’ इत्यादि प्रकारे ग्रथित केलेला आहे. शेवटचे [४] `ऊह्यगान’हेहि उत्तरार्चिकमूलक आहे व त्याचा क्रमंहि त्यांतीलच द्दष्टीस पडतो. फक्त एका ऊहापुरता क्रमभंग आहे, पण तो जमेस धरण्यासारखा नाही. पूर्वार्चिक किंवा छंदआर्चिक ग्रंथामध्ये एक एक सामाची एक एकच ॠचा दर्शित केली आहे. सामाच्या उद्भवास एक ॠचा पुरेशी होते. परंतु स्तोमनिष्पतीकरिता आणखी दोन किंवा तीन ॠचांची जरुर असते. उत्तरार्चिक ग्रंथात अशा प्रकारच्या [उत्तर -म्हणजे पूर्वर्चिक द्दष्ट ॠचेच्या पुढे जोडावयाच्या ] दोन दोन अगर तीन तीन ॠचा दर्शित केल्या आहेत.